कोकणच्या लाल मातीशी असलेली आपली नाळ घट्ट जोडून, बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय भरारी घेणार्या लांजा गावच्या प्राची रोहित सुर्वे यांच्याविषयी...
काही स्वप्ने मोठ्या शहरांत जन्म घेतात, तर काही आयुष्ये मातीशी नाळ जोडून घडतात. रत्नागिरीमधील लांजा तालुक्यातील प्राची रोहित मयेकरसुर्वे यांचे आयुष्यसुद्धा मातीशी असलेले घट्ट नातं सांगणारं आहे. बुद्धिबळासारख्या बुद्धिप्रधान खेळाला ग्रामीण भागात रुजवण्याचं स्वप्न पाहणारी ही तरुणी, आज अभियंता, बुद्धिबळ खेळाडू, प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय पंच म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. प्राची यांचा जन्म रत्नागिरीमध्यच झाला.
बालपण, शिक्षण, संस्कार सगळंच रत्नागिरीच्याच लाल मातीत घडलं. त्यांच्या आयुष्यातील एक लहानशी; पण निर्णायक आठवण आजही त्या आवर्जून सांगतात. नाताळच्या सणानिमित्त वडील नेहमीच घरातील सर्व लहान मुलांसाठी भेटवस्तू आणत. एका वर्षी प्राची यांना भेटवस्तू म्हणून मिळाला तो बुद्धिबळाचा पट. त्यावेळी बुद्धिबळ म्हणजे काय? याची फारशी कल्पनाही त्यांना नव्हती. मात्र, आजोबा आणि वडिलांना बुद्धिबळ खेळताना त्यांनी बघितलं होतं. प्राची यांचे वडील बुद्धिबळाचे उत्तम खेळाडू असल्याने, बुद्धिबळाचे पहिले धडे घरातच गिरवले गेले. बहिणीसोबत चाली रचत सुरू झालेला प्राची यांचा हा प्रवास, पुढे त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारा ठरेल याची तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती.
वडिलांच्या बदलीनंतर कुटुंब रत्नागिरी शहरात स्थायिक झालं. प्राची यांना शहरातील फाटक हायस्कूल या एका नामांकित शाळेत प्रवेश मिळाला. शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगाचा विकास करण्यास प्राधान्य दिले जाई. शाळेत होणार्या बुद्धिबळ स्पर्धांनी, प्राची यांच्यातील खेळाडू जागा केला. वडिलांशी चर्चा करून, प्राची यांनी शाळेत बुद्धिबळ खेळण्यासाठी नाव नोंदवले. सहाव्या इयत्तेत असतानाच त्यांनी पहिल्याच स्पर्धेत प्रथम क्रमांकही पटकावला. हा केवळ विजय नव्हता, तर आत्मविश्वासाचा पहिला टप्पाही होता. यानंतर जिल्हास्तरीय आणि शालेय स्पर्धांमध्ये, प्राची यांनी सातत्याने यश मिळवत स्वतःचे आणि शाळेचेही नाव उज्ज्वल केले. या काळात त्यांना प्रशिक्षक शिरधनकर सर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. पुढे अकरावीत प्राची यांनी राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभाग घेतला. मात्र, बारावीला विज्ञान शाखेतील अभ्यासाचा ताण वाढला आणि बुद्धिबळ काहीकाळ मागे पडलं. तरीही, मनातली बुद्धिबळाची ओढ तशीच राहिली.
बारावीनंतर प्राची यांनी रत्नागिरीमधील फिनोलेस महाविद्यालयात, रासायनिक अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घेतला. अभ्यासाच्याबरोबरच महाविद्यालयीन आणि विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धांमध्येही त्यांनी चमकदार कामगिरी केली. अभ्यास आणि छंद यांचा समतोल साधत पुढे जाणं, हेच त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य ठरलं. बुद्धिबळात मुलींची संख्या कमी का असते? यावरही प्राची यांचा ठाम विचार आहे. त्या सांगतात, ”मुलं आपल्या आवडी जपतात पण, मुली दहावी-बारावीनंतर अनेकदा आपले छंद मागेच ठेवतात. सुरक्षित वातावरणाचा अभाव, समाजाची अपेक्षा आणि आवडीला दुय्यम स्थान ही यामागची मुख्य कारणे आहेत. मात्र, आता हळूहळू परिस्थिती बदलतेही आहे.”
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राची यांनी, बुद्धिबळाशी संबंधित असलेल्या संधींचा शोध घेतला. याच काळात ‘महाराष्ट्र चेस असोसिएशन’च्या ‘चेस इन स्कूल’ या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती त्यांना मिळाली. ‘वर्ल्ड चेस असोसिएशन’ अर्थात ’फिडे’ आणि ‘महाराष्ट्र चेस असोसिएशन’ यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि द्वितीय क्रमांक पटकावला. यानंतर ‘रत्नागिरी चेस असोसिएशन’चे चैतन्य भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी, शाळांमध्ये बुद्धिबळ प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. या काळात त्या स्वतःही स्पर्धांमध्ये सहभागी होत राहिल्या. या सातत्याचा परिणाम म्हणजे त्यांना फिडे रेटिंगही मिळाले. पुढे २०१७मध्ये, पुण्यात पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या एका कंपनीत त्यांना नोकरी मिळाली.
पाणी शुद्धीकरण क्षेत्रातील कामातून पुणे आणि मुंबई येथे अनुभव घेत, त्यांनी पदोन्नती मिळवली. मात्र, कोरोनाच्या काळात गावाकडची ओढ त्यांच्या मनात पुन्हा तीव्र झाली. नंतरच्या काळात पुण्यातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत असणारी नोकरी, विवाह आणि रत्नागिरीतेल कुटुंब अशी तारेवरची कसरत सुरूच होती. अखेरीस शहरापेक्षा गाव महत्त्वाचं वाटलं आणि त्यांनी लांज्याला परतण्याचा निर्णय घेतला.
माघी गणेश जयंतीच्या मुहुर्तावर दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी प्राची यांनी, लांजा येथेच स्वतःची बुद्धिबळ अकादमी सुरू केली. लांज्यातील ही पहिलीच स्वतंत्र बुद्धिबळ अकादमी ठरली. सुरुवातीला बुद्धिबळाबाबतची अल्पसाक्षरता हे मोठे आव्हान होते मात्र, आज त्यांच्या अकादमीमध्ये २० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. इतकंच नव्हे, तर ‘चेस इन युअर स्कूल’ उपक्रमाच्या माध्यमातून लांज्याच्या जिल्हा परिषद शाळेतील तब्बल ८० विद्यार्थ्यांनाही प्राची बुद्धिबळाचे प्राथमिक धडे देत आहेत. नव्या खेळाडूंनी बुद्धिबळाकडे केवळ छंद म्हणून नव्हे तर करिअर म्हणून पाहावं, हा त्यांचा आग्रह आहे. पालकांमध्येही या खेळाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी त्या विशेष प्रयत्न करत आहेत.
उत्तम प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय पंच म्हणून प्राची मयेकर-सुर्वे आज लांज्यामध्ये बुद्धिबळाची नवी चळवळच उभी करत आहेत. कोकणच्या लाल मातीशी असलेले नातं जपत, बुद्धीचा हा खेळ रुजवणार्या या तरुणीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!