लाट आहे...

    22-Dec-2025
Total Views |
 
BJP
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने दिमाखदार असेच यश मिळवले. भाजपने तर सर्वाधिक जागा पटकावल्या. भाजपची लाट ओसरली, असे म्हणणार्‍यांना ही सणसणीत चपराक आहे. लाट नुसती आहे असे नव्हे; तर ती मजबूत आहे, हेच या निकालांनी अधोरेखित केले आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सद्यस्थितीचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले. गेल्या काही काळापासून विरोधक जे भाजपची लाट ओसरल्याच्या कथा रंगवत होते, त्या कथांना या निकालांनी पूर्णपणे चुकीचे ठरवण्याचे काम चोखपणे केले. या निकालाच्या माध्यमांतून जनतेने स्पष्ट शब्दांत विरोधकांना ठणकावले आहे की, जनतेचा विश्वास हा अजूनही विकासावर, स्थैर्यावर आणि कार्यक्षम नेतृत्वावरच आहे. म्हणूनच, या निकालांकडे नगरपंचायती, पंचायत समित्या किंवा जिल्हा परिषदांच्या जागा ठरविणारे निकाल म्हणून पाहून चालणार नाही. हा निकाल जनतेची मनोवृत्ती, अपेक्षा दर्शवणारा असाच आहे.
 
या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाने पटकावल्या. त्यानंतर शिवसेना दुसर्‍या क्रमांकावर, तर राष्ट्रवादी काँग्रेस तिसर्‍या क्रमांकावर राहिली. महायुतीला मिळालेला हा जनादेश तिन्ही पक्षांवर एकत्रितपणे राज्यातील जनतेने जो विश्वास कायम ठेवला आहे, त्याचेच प्रतिबिंब. विशेष म्हणजे, भाजपबरोबरच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही घटकांनी, विरोधी महाविकास आघाडीपेक्षा चांगली कामगिरी केली. याचाच अर्थ जनतेने केवळ एका पक्षाला नव्हे; तर संपूर्ण महायुतीच्या कार्यालाच मान्यता दिली आहे. महाविकास आघाडीची अवस्था अधिकच केविलवाणी झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस स्वतःला मोठा भाऊ म्हणवून घेण्यात धन्यता मानत असताना, दुसर्‍या स्थानासाठी उबाठा आणि शरद पवारांच्या गटात मात्र स्पर्धा रंगली होती. राजकीय समन्वयाचा अभाव, परस्परांवरील अविश्वास आणि नेतृत्वातील संभ्रम याचा फटका ‘मविआ’ला बसल्याचे निकालांमधून स्पष्टपणे दिसते.
 
विरोधकांनी पुन्हा एकदा तेच ते, तेच ते रडगाणे परत गायले आहे. मतचोरी, निवडणूक यंत्रणा, ‘ईव्हीएम’ यावर त्यांनी संशय घेतला आहेच मात्र, हा सूर आता जनतेसाठीही कंटाळवाणा ठरत आहे. प्रत्येक पराभवानंतर तेच आरोप, तीच कारणे आणि तोच आत्मपरीक्षणाचा अभाव. जेव्हा-जेव्हा संविधानिक संस्थांवर आरोप झाले, तेव्हा-तेव्हा जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. हा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास व्यक्त करणारा जनतेचा निर्णय आहे. तथापि, विरोधक हे वास्तव मान्य करायलाच तयार नाहीत.
 
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या निकालांना विशेष असे महत्त्व आहे. त्यावेळी काही ठिकाणी योग्य नेतृत्वाच्या बाजूने उभे राहण्यात जेथे जनता कमी पडली होती, तेथे ती कसूर आता भरून काढली जात असल्याचेच चित्र या निकालांतून दिसते. लोकसभा निवडणुकीत आपण चुकलो, हे आता जनतेला कळून चुकले आहे. म्हणूनच, ती चूक त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत सुधारलेली दिसते. अर्थातच, हा बदल अचानक घडून आलेला नाही, तर गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारच्या तळागाळात पोहोचलेल्या योजनांचा, कामांचा आणि निर्णयांचा हा परिपाक आहे. या पार्श्वभूमीवर, उबाठाचे संजय राऊत यांनी केलेली पैसे वाटप आणि मशीन सेटिंगची टीका ही विरोधकांच्या असहायतेचे, अगतिकतेचे द्योतक ठरावी.
 
देशाला आणि राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेताना, ग्रामीण भागही बदलतो आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि डिजिटल सुविधांचा विस्तार गावागावांत पोहोचतो आहे. या बदलांचा अनुभव घेणारी जनता घोषणांवर किंवा आरोपांवर विश्वास ठेवत नाही; ती प्रत्यक्ष काम पाहते. त्यामुळेच विकासाची गंगोत्री पुढे जात असताना विरोधक मात्र मागे पडल्याचे, हे निकाल ठळकपणे दाखवतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे इतके पराभव स्वीकारूनही विरोधक आत्मचिंतनासाठी तयारच नाहीत. कुठे चूक झाली, जनतेचा विश्वास का गमावला? याचा शोध घेण्याऐवजी, सगळे खापर यंत्रणेवर फोडणे हा सर्वात सोपा मार्ग त्यांनी नेहमीप्रमाणे निवडला आहे.
 
भाजपविषयी असलेली लाट ओसरली, अशी चर्चा विरोधक सातत्याने करतात. मात्र, या विजयाने त्या लाटेचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. लाट म्हणजे केवळ निवडणुकीच्या काळात निर्माण होणारी भावना नव्हे; ती दीर्घकाळ टिकणार्‍या विश्वासाची प्रक्रिया असते. ती कधी वर येते, कधी शांत दिसते पण, पूर्णपणे नाहीशी होत नाही, हेच हे या निकालांनी स्पष्ट केले.
 
या संपूर्ण चित्रात देवेंद्र फडणवीस ऊर्फ देवाभाऊंवरील जनतेचा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला. देवाभाऊंच्या नेतृत्वावर जनेतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. कठोर निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासकीय पकड आणि राजकीय स्पष्टतेमुळे त्यांचे नेतृत्व दिग्विजयी ठरले आहे. या निवडणुका प्रामुख्याने ग्रामीण भागात झाल्या. त्यामुळे शेतकरी, गोरगरीब आणि ग्रामीण जनतेचा कौल अधिक महत्त्वाचा ठरतो. पूर असो की दुष्काळ, संकटाच्या काळात केलेली मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली आहे, याचीच साक्ष या निकालांनी दिली. विरोधकांचा अपप्रचार म्हणूनच टिकू शकला नाही. कारण, अनुभव हा प्रचारापेक्षा नेहमीच अधिक प्रभावी ठरतो. विरोधक प्रचारात कुठेच ठोसपणे दिसले नाहीत. उद्धव ठाकरे फारसे कुठे फिरले नाहीत, मनसे चर्चेतही नव्हती. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादीही निष्प्रभ ठरली. त्यामुळे निकालापूर्वीच त्यांनी हार मानली होती, असे म्हणता येते. आता पराभवानंतर ‘ईव्हीएम’वर होणारे दोषारोपण म्हणजे, स्वतःच्या अपयशापासून पळ काढणेच होय.
 
आजचे निकाल पाहता, आगामी महानगरपालिका निवडणुकांचाही कल त्यातून स्पष्ट होतो. जनता विरोधकांना आरसा दाखवत आहे. ट्रिपल इंजिन सरकारवर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला असून, केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर समन्वय असेल तर उत्तम काम होते, हे जनतेला आता नेमकेपणाने उमगले आहे. कोण कामाचे आणि कोण बिनकामाचे, हे ओळखण्याइतकी प्रगल्भता जनतेकडे आहेच. म्हणूनच विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपांकडे दुर्लक्ष करुन, विकासाला कौल दिला आहे. हिंदुत्व आणि विकास या दोन्हीला जनतेने स्वीकारले आहे; तर तुष्टीकरण, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला प्राधान्य देणार्‍यांना नाकारले आहे. म्हणूनच, या निकालांचे सार एकच आणि ते म्हणजे लाट आहे आणि ती अधिक सशक्त झाली आहे.