खर्या कलाकाराचा खरा आनंद असतो तो कलेच्या सादरीकरणामध्ये आणि कलेच्या सादरीकरणासाठी संधी जर मोठी असेल, तर कलाकार सुखावतोच. अशीच संधी बालकलाकारांना चालून आली आहे. दिल्लीमधील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये आयोजित २५व्या ‘भारत रंग महोत्सवा’त, ‘सियावर रामचंद्र की जय’ या बालकलाकारांच्या महानाट्याची निवड झाली आहे. त्यामुळे मुलांची आणि त्यांच्या पालकांची सर्व प्रकारची तयारी सुरु आहे. या तयारीचा आणि बालकलाकारांच्या दिल्लीवारीच्या उत्साहाचा घेतलेला आढावा....
भारतीय ओळखले जातात ते त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी, त्यांच्या प्रामाणिकतेसाठी, त्यांच्या कष्ट करण्याच्या स्वभावामुळे. कितीतरी विदेशी कंपन्यांचे बॅकऑफीस भारतात आहे. म्हणजे कंपन्या मूळतः परदेशातल्या, कल्पना त्यांची, मालक ते, पण सगळी महत्त्वाची कामे करण्यासाठी भारतीय हवेत. भारतात स्वस्तामध्ये, वेळेत काम करून देणारे आणि विश्वासार्ह कामगार मिळतात म्हणून तेव्हा हा ट्रेंड सुरू झाला, तो आजही सुरू आहे. आता मात्र वेगाने देशातील स्टार्टअप्सची संख्या वाढत चालली आहे. एक काळ होता जेव्हा भारतातल्या प्रत्येक तरुणाला वाटायचे की परदेशात जावं, तिथेच राहावं आणि तिथलं सगळं चांगलं, आपलं काय ते कमीपणाचं. हे आपल्या सिनेमामधून, अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातून आणि रोजच्या व्यवहारातूनही दिसायचं, पण आता भारत बदलत आहे. जुनं ते न सोनं, आपलं ते चांगलंच नव्हे, तर तेच उत्तम! निदान जुनं नेमकं काय होतं, याचा तरी शोध घ्यायला लागली आहे नवीन पिढी. जुन्या वाटणार्या गोष्टी आता हव्याहव्याशा वाटायला लागल्या आहेत. बालकलाकारांनासुद्धा हॅरी पॉटर आवडतो, तसा हनुमानसुद्धा माहीत करून घ्यायचा आहे. श्रीराम हे अयोध्येचे राजकुमार होते एवढंच न वाटता, ते नेमके कोण होते, हे सुद्धा जाणून घ्यावेसे त्यांना वाटते. गोष्टी बदलत आहेत, विचार बदलत आहेत, वागणूक बदलते आहे आणि देशही बदलत आहे.
पुण्याला ‘ऑसफर्ड ऑफ ईस्ट’ न म्हणवता, ‘विद्येचे माहेरघर’ म्हणायचा मुलांना आनंद आहे. हा बदल मला एक नाट्यप्रशिक्षक म्हणून सातत्याने जाणवत असतो. हा बदल लॉकडाऊननंतरचा आहे हेसुद्धा मी सांगू शकते. पुणे हे ’विद्येचे माहेरघर’ तर आहेच, पण ते कला आणि संस्कृतीचेही माहेरघर आहे. इथल्या मुलांना विचारले की, ’लायन किंग’ करूया की, रामायणावर आधारित नाटक करूया? तर त्यांचं उत्तर ‘रामायण’ असे आहे. कारण स्पष्ट आहे, ‘सियावर रामचंद्र की जय’ हे नाटक आपल्या मातीतलं आह, ही आपली कहाणी आहे.
ठरलं तर मग, आम्ही ‘सियावर रामचंद्र की जय’ हे नाटक बसवायला घेतलं. भव्यदिव्य, अद्भुत, अनंतकालातीत, अप्रतिम सुंदर, देखणं आणि सुमधुर पार्श्वसंगीत असलेलं, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्यही उच्च कोटीचे, तसेच दहा नवीन गाणी आणि नृत्याचा समावेश असलेलं २ तास, १५ मिनिटांचं महानाट्य बसवायला घेतलं ते सुद्धा ७५ मुलांना घेऊन. असे नाटक यापूर्वी झालेले नसल्याने, अभूतपूर्व असे नाटक बसवायला घेतले. यात भूमिका करणार्या छोट्यातल्या छोट्या कलाकारापासून, तर सीता, राम, लक्ष्मण, हनुमान, रावणाची भूमिका करणारे सगळेच धुरंधर ठरले. कारण या धुरंधरांचं हे नाटक, ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ने आयोजित केलेल्या ‘२५व्या भारत रंग महोत्सवा’मध्ये निवडले गेले आहे. संपूर्ण भारतामधून साधारणतः दोन हजार नाट्यकलाकृती यासाठी अर्ज करतात; त्यांतून आमचे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले महानाट्य निवडण्यात आले.
तर आता हे धुरंधर कलाकार लवकरच, दिल्लीत प्रभू श्रीरामाची गोष्ट नाट्यस्वरूपात प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी जाणार आहेत. दिवस जवळ आला आहे. दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा प्रयोग दिल्लीत होणार असल्याने लगीनघाई सुरू झाली आहे. कलाकार धुरंधर आहेत, कारण या नाटकाचे पुण्यात पाच आणि नागपुरात एक प्रयोग झाला आहे. यातल्या प्रत्येक कलाकाराने, हे महानाट्य उत्तम होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. तसेच यातील प्रत्येक धुरंधर कलाकाराने एकच नव्हे, तर अनेक भूमिका नाटकात साकारल्या आहेत. हे नाटक म्हणजे ‘मास्टरपिस’ आहे. आजपर्यंत इतया मोठ्या प्रमाणात एकच नाटक झाले आहे, ते म्हणजे ‘दुर्गा झाली गौरी.’ पण नाटकाच्या आधी, नाटकाची तयारी महत्त्वाची असते आणि हाच प्रवास मजेशीर आहे.
पुणे-दिल्ली हा रेल्वेचा प्रवास २० तासाचा आहे. यामध्ये ७५ बालकलाकार आणि त्यांच्याबरोबर २५ पडद्यामागील कलाकार असणार आहेत. अशी १०० कलाकारांची फौज घेऊन आम्ही, दिल्लीला पोहोचणार आहोत. यात वयवर्ष पाच ते १५ वयोगटातील मुलं आहेत. ही सगळी पहिल्यांदाच आईवडिलांशिवाय येणार आहेत. किती किती तयारी केली आहे मुलांनी, अभ्यास आम्ही कसा आधीच करून ठेवणार, आईवडिलांना रडू आलं तर काय करणार! याचे आराखडे मांडून तयार आहेत. सगळीच मुलं एका पायावर दिल्लीला यायला तयार आहेत. मुलं तर केव्हाच दिल्लीत पोहोचली आहेत! त्यांच्या आईवडिलांचीच तयारी होत नाही आहे. आमचा मुलगा, मुलगी कसा जाईल, जसा जेवेल, कसा राहील, अशा अनेक प्रश्नांचं निरसन करणं सुरू आहे. तालमींना सुरुवात झाली आहे आणि यावेळेला कोणालाही कोणतीही भूमिका मिळाली, तरी चालणार आहे; आपण जात आहोत या आनंदातच सगळे आहेत. प्रत्येकजण एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी सज्ज आहेत. आज प्रत्येक धुरंधर कलाकाराचे मला इथे थोडे कौतुक करायलाच हवे. माझे विद्यार्थी थकत नाहीत, हरत नाहीत, झुकत नाहीत अगदी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखेच. या नाटकाबरोबरच, ही मुलं अजून एका महानाट्याच्याही तयारीत आहेत. ‘राजे शिवबा’ नवं कोरं करकरीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येतं आहे दि. ८ फेब्रुवारी रोजी. त्याआगोदर ‘सियावर रामचंद्र की जय’चा एक प्रयोग पुण्यात योजला आहे. नाट्यप्रयोगाची तयारी एखाद्या साग्रसंगीत लग्नासारखीच असते. भावभावना, रंगरंगोटी, मानपान, आहेर, लग्नाचा बस्ता असतो तसं सगळंच असतं. यात पालकांचीसुद्धा मनाची तयारी लागते आणि पालकांना मुलांचीसुद्धा वेगळ्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते. यंदाची २०२६ ची सुरुवात जोरात होणार आहे. ‘भारत रंग महोत्सवा’त रंग बालकांचा आणि नाम रामाचे होणार एवढं मात्र नक्की. बोलो, सियावर रामचंद्र की जय, कारण पुण्याचे धुरंधर दिल्लीत लवकरच!
- रानी राधिका देशपांडे