भाजपच्या विजयाचे एक रहस्य

    21-Dec-2025
Total Views |
Nitish Nabin
 
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नुकतीच बिहारचे तरुण, तडफदार नेते नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आली. नबीन यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी, उपलब्धीविषयी बरीच चर्चा रंगली. पण, ही नियुक्ती म्हणजे केवळ एका व्यक्तीची निवड नसून, भविष्यातील भाजपची दिशा स्पष्ट करणाराच हा पक्षाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय म्हणावा लागेल. कारण, कोणत्याही संघटनेला यशोशिखर गाठण्यासाठी उत्तम नेतृत्वाची आणि तितक्याच सक्षम मनुष्यबळाची सांगड घालावी लागते. मग, त्याला राजकीय पक्षही अपवाद नाही. भाजपसारख्या जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन ठरलेल्या पक्षात ही प्रक्रिया निरंतर सुरू असते. तेव्हा काँग्रेसी घराणेशाहीच्या एकदम विरुद्ध असलेले भाजपचे हे नेतृत्व घडवण्याचे, तरुणांना संधी देण्याचे मॉडेल भाजपच्या विजयाचे एक रहस्य म्हणावे लागेल. त्याचाच या लेखात केलेला ऊहापोह...
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने २०१७ मध्ये मुंबईमध्ये प्रवासासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होतो. "भाजपमध्ये आपल्यासारखा एकेकाळी बूथवर काम करणारा कार्यकर्ताही राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो,” असे अमितभाईंनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर त्यांनी विचारले की, "काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्यानंतर पक्षाचे नेतृत्व कोण करेल, हे सर्वजण सांगू शकतात. पण, आपल्यानंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल, हे कोणी सांगू शकेल काय?” अमितभाईंच्या प्रश्नानंतर उपस्थित निरुत्तर झाले. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, या पक्षाचा कोणीही मालक नाही. पक्षनिष्ठा, गुणवत्ता आणि परिश्रमाच्या आधारे कोणीही भाजपमध्ये सर्वोच्च पदावर जाऊ शकतो, असे अमितभाई यांना सांगायचे होते.
 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे पथनिर्माणमंत्री व ४५ वर्षांचे नेता नितीन नबीन यांच्या नावाची घोषणा झाल्यावर अमितभाई यांच्या मुंबई प्रवासात घडलेल्या घटनेची आठवण आली. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी नवा अध्यक्ष कोण होईल, याबद्दल प्रसिद्धिमाध्यमांमध्ये अनेकदा चर्चा झाली आणि अनेक संभाव्य नावांचा उल्लेख झाला. पण, माध्यमांच्या दृष्टीने अनपेक्षितपणे नितीन नबीन या नव्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून घोषणा झाली.
 
कर्तबगार नेता
 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड झाल्यावर या निवडीला माध्यमांनी ‘धक्कातंत्र’ म्हटले. त्यांच्या दृष्टीने नितीन नबीन हे बिहारच्या राजकारणातील प्रसिद्ध नेते असले, तरी राष्ट्रीय राजकारणात मात्र त्यांच्याबद्दल कधी चर्चा झाली नाही. नवी दिल्लीतील माध्यमवीरांची एक धारणा आहे की, ते ज्या नेत्यावर ‘राष्ट्रीय नेता’ म्हणून शिक्कामोर्तब करतात, तोच ‘राष्ट्रीय नेता’ असतो. त्यांना जो नेता माहिती नाही, तो ‘राष्ट्रीय नेता’ नाही. त्यादृष्टीने नितीन नबीन यांना अपरिचित ठरविले गेले.
राष्ट्रीय माध्यमांना नितीन नबीन यांच्याबद्दल कदाचित माहिती नसले, तरी ते अत्यंत कर्तबगार नेते आहेत. त्यांचे वडील नबीन किशोरप्रसाद सिन्हा हे बिहारच्या राजकारणातील भाजपचे प्रभावी नेते म्हणून परिचित होते.
 
वडिलांच्या निधनानंतर पाटण्याजवळ बांकीपूर या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून २००६मध्ये नितीन नबीन पोटनिवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी २०१०, २०१५, २०२० आणि २०२५च्या विधानसभा निवडणुकांमध्ये बांकीपूर मतदारसंघातून सलग विजय मिळविला. त्यांनी २०२०मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव सिन्हा यांना पराभूत केले होते. २०२१मध्ये बिहार सरकारमध्ये नितीन नबीन यांना पथनिर्माण विभागाचे मंत्री करण्यात आले. २०२४मध्ये त्यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि विधी विभागाची जबाबदारी मंत्री म्हणून मिळाली. २०२५मध्ये त्यांना पुन्हा पथनिर्माण विभाग देण्यात आला व त्यासोबत नगरविकास आणि गृहनिर्माण विभागांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.
 
नितीन नबीन यांना भाजपमध्ये संघटनात्मक अनुभवही आहे. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्य समिती सदस्य, युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. नितीन नबीन यांना विधानसभा निवडणुका जिंकण्याचा, मंत्री म्हणून प्रशासनाचा आणि संघटनात्मक कामाचा अनुभव आहे. प्रत्येक बाबतीत त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे.
 
नितीन नबीन यांनी पक्षाला निवडणुकीत यश मिळवून देण्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्यांची २०२१ ते २०२४ या कालावधीत पक्षाचे छत्तीसगढचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता आणि पक्षाच्या आमदारांची संख्या १५वर आली होती. विधानसभेतील एकूण सदस्यसंख्या ९० आहे. छत्तीसगढमध्ये २०२३च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल, असे अनेकांना वाटत होते. पण, प्रत्यक्षात या विधानसभा निवडणुकीत भाजपने ५४ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. पक्षाच्या या यशात सहप्रभारी म्हणून नितीन नबीन यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर भाजपने नितीन नबीन यांना छत्तीसगढचा प्रभारी म्हणून नियुक्त केले. लोकसभा निवडणुकीत भाजपने एकूण ११ पैकी १० जागा जिंकून दणदणीत यश मिळविले. नितीन नबीन यांचे निवडणूक रणनीतीचे आणि संघटनात्मक कौशल्य पुन्हा सिद्ध झाले.
 
संघटनेला पुन्हा बळकट करण्यासाठी...
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने २०१४ची लोकसभा निवडणूक पूर्ण बहुमत मिळवून जिंकली आणि त्यानंतर पक्षाची विजययात्रा सुरू झाली. त्यानंतर सातत्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत आणि विविध विधानसभा निवडणुकांत विजय मिळाला. २०१४ साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह यांची निवड झाली. त्यावेळी ते ४९ वर्षांचे होते. नितीन नबीन ४५ वर्षांचे असून, त्यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरून राष्ट्रीय अध्यक्षपदी बढती झाल्यास, ते आतापर्यंतचे सर्वात लहान राष्ट्रीय अध्यक्ष ठरतील. भाजपमध्ये तुलनेने कमी वयाच्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २०१० साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, त्यावेळी ते ५३ वर्षांचे होते. पक्षसंघटनेत सातत्याने नव्या नेतृत्वाला संधी देऊन संघटनेत काळानुसार फेरबदल करण्याचे व संघटना पुन्हा बळकट करण्याचे प्रयत्न आतापर्यंत यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपने २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांची निवड केली, त्यावेळी ते ४४ वर्षांचे होते आणि त्यांचे कर्तृत्व काळाच्या ओघात सिद्ध झाले. आताही संघटनेत कालसुसंगत बदल होणे नेतृत्वाला अपेक्षित असावे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांच्या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करताना जे ट्विट केले, त्यावरून त्यांना संघटनेची पुढील दिशा कशी अपेक्षित आहे, हे सूचित होते. मोदीजींनी नितीन नबीन यांच्याविषयी लिहिले आहे की, "नितीन नबीन यांनी एक कट्टर कार्यकर्ता म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ते एक युवा आणि परिश्रमी नेता आहेत. त्यांच्यापाशी संघटनेचा चांगला अनुभव आहे. बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचे कार्य प्रभावी राहिले. त्यासोबतच जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण समर्पण भावाने काम केले आहे. ते आपल्या विनम्र स्वभावाने जमिनीवर काम करण्यासाठी ओळखले जातात.”
 
मोदीजींनी नितीन नबीन यांचे अभिनंदन करताना, ‘कट्टर कार्यकर्ता’, ‘युवा परिश्रमी नेता’, ‘संघटनेचा अनुभव’, ‘आमदार व मंत्री म्हणून प्रभावी कार्य’, ‘जनतेसाठी समर्पण’, ‘विनम्रता आणि जमिनीवर काम करणे’ या वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे. आगामी काळात भाजपमध्ये या गुणांना अधिक महत्त्व मिळणे मोदीजींना अपेक्षित दिसते.
 
काळानुसार, पक्षसंघटनेत बदल करण्यासाठी ठिकठिकाणाहून चांगले कार्यकर्ते निवडणे व त्यांना योग्य जबाबदार्‍या देणे, हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. माध्यमांमध्ये चर्चा होत नसली, तरी भाजपमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सातत्याने असे नव-नव्या कर्तबगार नेत्यांना संधी देणे चालू असते. त्यातून पक्षाला मोठी ऊर्जा मिळते. भाजपला पुनःपुन्हा विजय मिळतो, त्याचे हे एक रहस्य आहे. एकीकडे काँग्रेस त्याच-त्या घराण्यातील ठरावीक नेत्यांमध्ये अडकून पडली असताना, भाजपची संघटना नव्या नेतृत्वाला संधी देणारी प्रवाही संस्था बनली आहे, हे विशेष आहे. भाजपमध्ये कोणत्याही वशिल्याशिवाय केवळ कर्तृत्वावर नेतृत्वाची संधी मिळते, याला मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व कारणीभूत आहे.
 
- डॉ. दिनेश थिटे
(लेखक राजकारणाचे अभ्यासक आहेत.)