डोंबिवलीतील ज्येष्ठ स्वयंसेवक व भारतीय मजदूर संघाचे कुशल संघटक आणि ठाणे जिल्ह्याचे पालक बाळकृष्ण विश्वनाथ तथा बाळ पुराणिक यांनी दि. ९ डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. संघाच्या मुशीतून घडलेल्या या ज्येष्ठ स्वयंसेवकाचा व ध्येय समर्पित कार्यकर्त्याचा हा अल्पपरिचय करुन देणारा लेख...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिभेचे वैशिष्ट्य असे की, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र व संस्कृती, हिंदू समाज संघटन या विषयांची केवळ सोप्या भाषेत तात्त्विक-वैचारिक मांडणी त्यांनी केली नाही, तर ते विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, या व्यावहारिक बाजूंचीही कृतिरूप मांडणी केली. संघाच्या परिभाषेत या दोन्ही आयामांना ‘संघमंत्र’ व ‘शाखातंत्र’ असे म्हणतात. संघमंत्राने संघाचा मूळ विचार स्वयंसेवकाच्या मनात रुजतो, तर संघाच्या अभिनय कार्यपद्धतीने हा विचार प्रत्यक्ष व्यवहारात कसा आणायचा, याचे प्रशिक्षण त्याला दैनंदिन शाखेच्या कार्यक्रमातून म्हणजेच शाखातंत्रातून मिळत असते. ‘संघशाखा’ नावाचे अग्निहोत्र वर्षाचे ३६५ दिवस धगधगत असते. दैनंदिन शाखा व त्यात विकसित झालेले ‘शाखातंत्र’ हे व्यक्तिनिर्माणाचे ऊर्जाकेंद्र आहे.
या शाखातंत्राच्या माध्यमातून स्वयंसेवकाचा शारीरिक व बौद्धिक विकास होत असतो. संघाचा ध्येयवाद, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी शिस्त, समर्पणवृत्ती स्वयंसेवकांत छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून रुजवली जाते. त्याच्या जीवनाची, व्यक्तिमत्त्वाची राष्ट्रानुकूल जडणघडण होत असते. ‘संघमंत्र’ स्वयंसेवकाचा वैचारिक विकास करतो, तर शाखातंत्राचे कार्य कुशल शिल्पकार वा मूर्तिकारासारखे असते. ओबडधोबड दगडातून तो ’chiseling out the unessential’ या पद्धतीने सुरेख मूर्ती घडवतो. शाखातंत्रात याच प्रक्रियेने सामान्य स्वयंसेवकातून असामान्य कार्यकर्ता घडत जातो. असे लक्षावधी कार्यकर्ते संघाच्या या कार्यपद्धतीतून घडत गेले आहेत. हे कार्यकर्ते आपापल्या मगदुरीप्रमाणे, क्षमतेनुसार समाज व राष्ट्रजीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. आपापले योगदान देत आहेत. एका अर्थाने रा. स्व. संघ हा राष्ट्रउभारणीसाठी मनुष्यनिर्माण ’man-makingfor nation-building’ हे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याचेच कार्य गेली १०० वर्षे अव्याहतपणे करीत आहे. अशा लक्षावधी कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीतील ज्येष्ठ स्वयंसेवक व ‘भारतीय मजदूर संघा’चे कुशल संघटक आणि ठाणे जिल्ह्याचे पालक बाळकृष्ण विश्वनाथ तथा बाळ पुराणिक. दि. ९ डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संघाच्या मुशीतून तयार झालेल्या या ज्येष्ठ स्वयंसेवकाचा व ध्येय समर्पित कार्यकर्त्याचा हा अल्पपरिचय.
पुराणिक घराणे मूळचे आजच्या कर्नाटकातील. बाळासाहेबांचे आजोबा व वडील हे बेळगाव तालुक्यातील ‘रामदुर्ग’ या संस्थानाचे निवासी. भावे हे या संस्थानाचे प्रमुख. त्यांच्या घरी पूजाअर्चा करणारे अर्चक म्हणजे हे पुराणिक कुटुंब. विश्वनाथ पुराणिकांना पाच अपत्ये झाली. चार मुलगे आणि एक मुलगी. यातील चौथे अपत्य म्हणजे बाळ पुराणिक.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थाने खालसा झाली व पुराणिक कुटुंबाचे उपजीविकेचे एकमेव साधन हातातून गेले. अक्षरशः अठराविश्वे दारिद्य्राला या कुटुंबाला सामोरे जावे लागले. आई भागीरथी लोकांच्या घरी स्वयंपाक करून संसाराचा गाडा ओढीत होती. दोनवेळची भूक भागविण्यासाठी चारही भावंडे घरोघरी माधुकरी मागत असत. लोकांचे दळण दळून आणणे, नदीवरून पाणी आणणे, गणपतीच्या मूर्ती बनविणे यांसारखी कामे अर्थार्जनासाठी ही भावंडे करीत. रात्री घरात दिवा लावण्याइतकीही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे रस्त्यावरील दिव्याखाली बसून सर्व भावंडे अभ्यास करीत. असे असूनही या मुलांनी शिक्षण सोडले नाही वा रा. स्व. संघाच्या शाखेत नियमित जाणेही सोडले नाही. या लेखाच्या निमित्ताने ही माहिती मी मिळवली. पण, बाळासाहेबांनी कधीही या बिकट परिस्थितीचा उच्चार केला नाही, हे महत्त्वाचे!
बाळ लहानपणापासूनच इतर भावंडांबरोबर दररोज संघशाखेत जात असे. तेथील शारीरिक कार्यक्रमात व खेळांत त्याला विशेष गोडी होती. बाळ केवळ शरीरानेच नव्हे, तर मनानेही संघात रुजला. त्याला एक कारण घडले. १९४८ साली गांधीहत्येनंतर स्थानिक संघकार्यात पदाधिकारी असणार्या त्यांच्या थोरल्या बंधूंना दामोदर अण्णांना अटक झाली व त्यांची रवानगी बागलकोट येथील तुरुंगात झाली. त्यावर्षी ते मॅट्रिकच्या वर्गात शिकत होते. त्यामुळे त्यांचे आई व मामा त्यांची तुरुंगातून परीक्षेसाठी पॅरोलवर सुटका व्हावी, अशी विनंती करण्यासाठी बागलकोट कारागृहाच्या अधिकार्यांकडे गेले. तेव्हा तुरुंगाधिकारी त्यांना म्हणाले, "दामोदरने माफीपत्र लिहून दिले, तर त्याला पॅरोलवर सोडता येईल.” पण, दामोदर अण्णांनी ती अट मान्य करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. दामोदर या वयातसुद्धा बाणेदार, स्वाभिमानी व तत्त्वनिष्ठ होता. या घटनेचा लहानग्या बाळच्या मनावर खोल परिणाम झाला. संघसंस्कार काय करू शकतो, यांचे प्रत्यंतर म्हणजे, हा प्रसंग. पुढे जवळजवळ ७० वर्षे बाळने स्वत:ला संघ व संघपरिवाराच्या कार्यात झोकून दिले; त्याची मूळ प्रेरणा या प्रसंगातून त्याला मिळाली असावी.
पुढे दामोदर अण्णांनी मुंबईत पोस्ट व तार खात्यात नोकरी सुरू केली. डोंबिवली येथे छोट्या घरकुलात ते राहात. त्यांनी सर्व भावंडांना डोंबिवलीत आणले व त्यांचे शिक्षण सुरू ठेवले. येथून पुढे बाळ पुराणिक या युवकाचा डोंबिवलीतील संघकार्याचा प्रवास सुरू झाला. तो परवापरवा म्हणजे ८५व्या वर्षी शेवटचा श्वास घेईपर्यंत अखंडपणे, निष्ठापूर्वक व समर्पण भावनेने सुरू होता. सामान्य स्वयंसेवक असामान्य धैर्याने संघकार्य कसे उभे करू शकतो, याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे बाळासाहेब पुराणिक!
प्रथम डोंबिवली नगर परिषद परिसरातील गुजराती शाळेच्या पटांगणात भरणारी सायं-शाखा, नंतर नेहरू मैदानात भेटणारी छत्रपती प्रभात-शाखा आणि अखेरच्या टप्प्यात टिळकनगर शाळेच्या प्रांगणात भरणार्या रात्र-शाखेचे ते स्वयंसेवक होते. प्रथम संघशाखा व पुढे संघपरिवारातील भारतीय मजदूर संघ या संघटनांत चढत्या क्रमाने त्यांचे पदाधिकारी म्हणून कर्तृत्व फुलले, बहरले.
संघाच्या शारीरिक कार्यक्रमावर विशेष प्रेम असलेले बाळासाहेब त्यांच्या कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध होते. संघशाखेत चालणार्या विविध कार्यक्रमांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वतः घडत असताना इतर स्वयंसेवकांना घडाविण्याचे कामही त्यांनी निष्ठेने केले. पुढे आजीवन प्रचारक झालेले तात्या जोगळेकर हे त्यांच्याच शाखेचे स्वयंसेवक. ते आपल्या आठवणी सांगतात, "बाळासाहेबांनीच मला सर्वप्रथम ध्वज लावायला शिकविले. ते अतिशय कडक शिस्तीचे शिक्षक होते.”
अर्थार्जनासाठी बाळासाहेब ‘एमएसईबी’मध्ये नोकरीला लागले. संघकार्य सुरूच होते. मनात इच्छा होती, संघाच्या प्रचारक म्हणून काम करण्याची. पण, त्यांचे शिक्षण फक्त मॅट्रिकपर्यंत झाले होते. संघाचे तत्कालीन सरसंघचालक प. पू. श्री. गोळवलकर गुरुजींचा आग्रह होता की, प्रचारक किमान पदवीधर असला पाहिजे. म्हणून बाळासाहेब जिद्दीने पदवीपर्यंत शिकले. त्यानंतर नोकरीतून रजा टाकून प्रचारक म्हणून बाहेर पडले. दोन वर्षे प्रचारक म्हणून त्यांनी नगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोले तालुक्यांत काम केले. संगमनेर तालुका वा नगर जिल्हा ही संघकार्यासाठी खडकाळ भूमी. पण, बाळासाहेबांनी संपूर्ण तालुका पिंजून काढून त्या खडकाळ भूमीत संघ रुजवला.
प्रचारक असतानाच त्यांनी संघाचे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रथम व द्वितीय वर्ष संघ शिक्षावर्ग, पुणे येथे ते या वर्गात होते. अशाप्रकारे प्रचारकी जीवनाचा अनुभव घेण्याची आपली मनीषा त्यांनी पूर्ण केली. १९७४ साली चिक्कोडी येथील अंबुजा पेशवे या युवतीशी बाळासाहेबांचा विवाह झाला. संघाची पार्श्वभूमी नसलेल्या अंबुजाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निगुतीने व जबाबदारीने संसार केला. बाळासाहेबांचा एक पाय संसारात व दुसरा संघकार्यात. अशा परिस्थितीत अंबुजा वहिनींनी संसारात बाळासाहेबांना मनापासून साथ दिली. ज्येष्ठ प्रचारक नाना ढोबळे यांच्या स्वयंसेवकांची ‘वहिनी’ या पदाला त्यांनी पुरेपूर न्याय दिला. त्यांचे घर हे स्वयंसेवकांचे घर झाले. १९७५च्या आणीबाणीच्या काळात भूमिगत झालेल्या दादा चोळकर व तात्या जोगळेकर यांचा मुक्काम बाळासाहेबांकडेच होता. १९८३ साली तळजाई शिबिरात डोंबिवलीतून एक हजार स्वयंसेवक गेले होते. त्या प्रयत्नात बाळासाहेबांचा महत्त्वाचा वाटा होता.
पुढे अयोध्या श्रीराम मंदिर आंदोलनात कारसेवेत ते सहभागी झाले होते. धडाडी व व्यापक जनसंपर्क ही त्यांच्या शिस्तबद्ध कामाची वैशिष्ट्ये होती. दैनंदिन संघकार्यात झोकून देऊन विविध जबाबदार्या सांभाळत असताना बाळासाहेबांचे आक्रमक, धाडसी व लोकसंग्रही व्यक्तिमत्त्व पाहून ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी त्यांना विचारपूर्वक ‘भारतीय मजदूर संघा’चे काम करण्यास सांगितले. प्रचारक म्हणजे संघात पत्ता न घातलेल्या पोस्टकार्डचा धनी असतो. हा अनुभव घेतलेल्या बाळासाहेबांनी श्रीकांतरावांची इच्छा प्रमाण मानली. संघाचे ज्येष्ठ प्रचारक व ‘भारतीय मजदूर संघा’चे वरिष्ठ अधिकारी कै. बाळासाहेब साठे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी वीज कामगार महासंघ व मजदूर संघाचे काम सुरू केले. त्यासाठी या जिल्ह्यातील संपूर्ण भाग व विशेषतः औद्योगिक विभाग पिंजून काढला व कामगार संघटनाबांधणीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. असंघटित क्षेत्रातील घरेलू कामगारांचे संघटन बांधण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. प्रथम ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून व पुढे ठाणे जिल्हा ‘भारतीय मजदूर संघा’चे पालक म्हणून संघटनाबांधणीचे कार्य त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. हे सर्व सुरू असताना त्यांची संघशाखा कधीच चुकली नाही.
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक व ‘भारतीय मजूदर संघा’चे संस्थापक मा. दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीचे २०२०-२१ हे वर्ष. त्यानिमित्ताने ‘भारतीय मजदूर संघा’चे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीनिवास जोशी व बाळासाहेब पुराणिक यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत एक व्याख्यानमाला दत्तोपंतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करावी, असे मी सुचविले. त्याची जबाबदारी माझ्यावर टाकल्यामुळे, मी पाच विषय व पाच वक्ते अशी योजना केली व त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. परंतु, ‘कोरोना’ महामारी सुरू झाल्यामुळे ती व्याख्यानमाला रद्द करावी लागली.
पुढे ‘कोरोना’ साथ ओसरल्यानंतर झालेल्या बैठकीत मी दत्तोपंतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैचारिक ग्रंथ तयार करावा, असे सुचविले. ते मान्य झाल्यानंतर त्या ग्रंथाच्या निर्मितीची व संपादनाची जबाबदारी माझ्याकडे आली. सहा महिने मेहनत करून व उत्तम विषय आणि अभ्यासू लेखक यांची सांगड घालून, मी ४०० पानांचा ‘दत्तोपंत ठेंगडी - द्रष्टा विचारवंत’ हा निखळ वैचारिक ग्रंथ सिद्ध केला. त्याचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह मा. दत्ताजी होसबाळे यांच्या हस्ते व प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका दिमाखदार सोहळ्यात पार पडले. या प्रकल्पात मी सहभागी होऊ शकलो, याचे श्रेय श्रीनिवास जोशी व बाळासाहेब पुराणिक यांनाच जाते.
तर, असे निष्ठावंत व कार्यकुशल कार्यकर्ते होते, बाळासाहेब पुराणिक. दीर्घकाळ त्यांचे मैत्र मला लाभले, हे माझे भाग्य. त्यांच्या पुण्यपावन स्मृतींना विनम्र अभिवादन व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
- प्रा. श्याम अत्रे