ताण हा शांतपणे झिरपणारा शत्रू. आपण त्याची दखल घेत नाही, तोवर तो शरीर, मन, नाती आणि संपूर्ण जीवन ताब्यात घेतो. मोठी चूक आपण वारंवार करतो. ती म्हणजे, ताण आपोआप कमी होईल, असे समजणे. पण, ताण साठत जातो आणि अचानक स्फोट होतो. शरीर असह्य वेदना देतं, मन गोंधळून जातं आणि आयुष्यावरची पकड सुटते. त्यामुळे आपल्यावरील ताणाचा ताबा घ्या आणि आयुष्य पुन्हा जिंका!
कल्पना करा, सफारी करताना जहाजात छिद्रं पडली. पाणी आत येतंय आणि तुम्ही मात्र डेकवर आरामात बसून म्हणताय, "काही नाही, सगळं ठीक आहे!” ताणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे याच्यासारखंच. किती ते अज्ञान! पाणी जितकं वाढतं, तितकं जहाज पटकन बुडतं. तसंच ताण साचत जातो आणि अचानक आयुष्य कोसळतं.
ताणावर आपलं नियंत्रण नसतं, पण प्रतिसाद आपला असतो!
काही ताण बाहेरचे असतात. परिस्थिती, लोक, समस्या. पण, आपण कशी प्रतिक्रिया देतो, तीच आपल्या आरोग्याची दिशा ठरवते. ताण शरीराला कडक करतो. खांदे जखडलेले, डोकं ठणकणं, हृदयाचा वेग वाढणं. मन गोठलेलं एकाच विचाराच्या गिरया, भीती, राग, असाहाय्यता हेच भाव सतत पुढे वाढत जातात.
तुम्हाला वाटतं, मी मजबूत आहे, चालू दे, मी सांभाळून घेईन. पण, प्रत्यक्षात ताण तुम्हाला अजगरासारखा गिळत जातो. नाती ताणली जातात. झोप उडते, आयुष्य निस्तेज होतं. उत्पादकता नष्ट होते.
ताणाकडे दुर्लक्ष केल्याने होणार्या गंभीर चुका
शरीर म्हणतंय, थांब जरासा आणि आपणच ऐकत नाही
डोकेदुखी, पोटदुखी, सततचा थकवा, रोगप्रवणता, हे शरीराचे डजड सिग्नल्स. शरीर ‘थोडी विश्रांती घे’ म्हणतंय आणि आपणच ऐकत नाही. लहान विश्रांती, खोल श्वसन आणि आराम हीच शरीराची औषधे आहेत.
भावना गिळून ठेवणे
भावना दडपल्या की, मनात दररोज थोडीथोडी पुराची साठवण होते आणि एका दिवशी ते धरण फुटतं. बोला. लिहा. कोणाशी तरी मन मोकळं करा. भावनांना प्रवाह वाहायला हवा; पण दडपशाही नको.
मनावर धुकं - Brain Fog
निर्णय घेता येत नाहीत. कामावर लक्ष लागत नाही. स्वतःविषयी शंका वाढते. अशा वेळी थोडं थांबणं हेच ‘स्मार्ट’ काम असतं. मोकळ्या हवेत चालून या, ध्यान करा, गाढ झोपा आणि बघा, मानसिक धुकं हळूहळू विरतं.
नात्यांत दरी निर्माण होणे
ताण आपल्याभोवती भिंती उभ्या करतो. भांडणे, गैरसमज, एकटेपणा वाढवतो. पण, संवाद ताण वितळवतो. आपल्या माणसांना जवळ ठेवा. जोडलेपण हेच खरे औषध आहे.
उत्पादकता कोसळणे
कामाला हात जात नाही आणि मन म्हणतं ‘मी अपयशी आहे.’ अधिक ताण म्हणजे अधिक अडथळे. कामाला छोटे-छोटे टप्पे द्या. प्रत्येक छोटं पाऊल मोठ्या आत्मविश्वासाचा पाया असतं.
झोप बिघडवणे
रात्री झोप नाही, दिवसा मन बोथट, चिडचिड वाढते. शरीराची बॅटरी रात्रीच चार्ज होते. झोपेला प्राधान्य द्या, तीच दिवसाची ताकद आहे. आपल्या आयुष्यात येणारे अनेक ताण निर्माण करणारे घटक आपल्या नियंत्रणात नसतात. मात्र, त्या परिस्थितींना आपण कसा प्रतिसाद देतो. हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते. आपल्या प्रतिक्रियांमुळे ताण हलका होऊ शकतो किंवा उलट वाढूही शकतो. म्हणूनच, आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींकडे लक्ष देणे. ताण वाढवणार्या व त्याला कायम ठेवणार्या सवयी सोडणे आणि स्वतःला अधिक शांत व सैल वाटण्यासाठी काय करता येईल, यावर लक्ष केंद्रित करणे शहाणपणाचे आहे.
ताणाचे दीर्घकालीन परिणाम : एक अदृश्य, पण घातक धोका
ताण हा शांतपणे शरीर आणि मनावर ताबा मिळवणारा ‘निःशब्द शत्रू’ आहे. सुरुवातीला तो केवळ थकवा, चिडचिड, झोपेची अडचण यांसारख्या लहान लक्षणांत दिसतो. पण दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास तो गंभीर आजारांची दारं उघडतो. कायम वाढलेली तणाव प्रतिसाद प्रणाली ( stress response system ) मेंदूतील भावनांवर नियंत्रण ठेवणार्या भागांना कमकुवत करते, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमतेवर परिणाम करते आणि नैराश्य व चिंतेचा धोका वाढवते. शरीरात स्रवणार्या ताण-हार्मोन्समुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, पचनाचे विकार, त्वचेचे आजार आणि रोगप्रतिकारक शक्तीमध्ये घट अशा अनेक स्थिती उद्भवू शकतात. कालांतराने, ताण नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करतो, कामगिरी घसरते आणि जीवनातील आनंद हरवतो. ताण बाहेरून दिसत नसला, तरी आतून तो शरीर-मनाची गुपचूप झीज करतच असतो. म्हणूनच, ताणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आरोग्याशी धोका पत्करणे आणि ही जाणीव प्रत्येकाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
ताण ओळखणं म्हणजे नियंत्रण परत मिळवण्याची पहिली पायरी
ताणाला आपण जितका वाव देतो, तो तितकाच मनावर, शरीरावर आणि नात्यांवर अधिकार गाजवतो. पण आपण स्वतःला थोडं थांबवून, मनाचे ऐकून, आत्मदेखभाल ( self care ) सुरू केली, तर परिस्थितीचं चाक फिरू लागतं. तुमचं शरीर पुन्हा हलकं, मन शांत, विचार स्पष्ट, झोप गाढ, नाती बळकट आणि आयुष्य ऊर्जावान हे सगळं फक्त शयच नाही, तर तुमच्या हातात आहे. तणावाकडे बेफिकिरीने पाहू नका. ताणाचा ताबा घ्या आणि आयुष्य पुन्हा जिंका.
तुम्ही स्वतःवर इतकं प्रेम करू शकाल का?
ताण तुमचं आयुष्य काबीज करण्याआधी तुम्हीच त्याला ओळखा आणि थांबवा. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला हरवू नका. कारण तुम्हीही महत्त्वाचे आहात. ‘मी ठीक आहे’ या ढोंगाऐवजी ‘मला मदतीची गरज आहे’ हे स्वीकारणं, हेच खरं धैर्य. ‘सगळं सहन करायचंच’ हा गैरसमज सोडा आणि ‘मी शांत, सुरक्षित आणि आनंदी राहण्यास पात्र आहे,’ हे ठामपणे मान्य करा. आज तुम्ही घेतलेला छोटासा सकारात्मक निर्णय उद्या संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुमचं आनंदी, निरोगी, स्वच्छंद जीवन ते तुमच्यासाठीच आहे. ते उद्यावर ढकलू नका. आताच सुरुवात करा. आजचा एक निर्णय घ्या, ‘मी स्वतःसाठी उभा राहणार!’