मोठी बातमी! नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल पुन्हा लांबणीवर, मतमोजणी २१ डिसेंबरला; हायकोर्टाचा मोठा निर्णय

    02-Dec-2025   
Total Views |
Nagarparishad Election Result

मुंबई : (Nagarparishad Election Result) 
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय देत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या मतमोजणीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे उद्या अपेक्षित असलेले निकाल लागणार नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी एकत्रितपणे घेतली जाणार आहे. तसेच एक्झिट पोलही सध्या जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हे निकाल आता लांबणीवर गेले आहेत.

निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील दाखल अर्ज आणि तांत्रिक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, उमेदवार, मतदार आणि राजकीय पक्षांना निकालांसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील प्रशासकीय प्रक्रियांनाही विलंब होण्याची शक्यता आहे.नवीन तारखेप्रमाणे, २१ डिसेंबरला राज्यभरात सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.

मुख्यमंत्र्यांची निवडणूक प्रक्रियेवर नाराजी

"घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, त्याचा निकाल पुढे जातोय, हे पहिल्यांदाच होत आहे. हे यंत्रणांचे अपयश आहे. निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी. मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय. मतमोजणी पुढे ढकलणे हे मला तरी पटत नाही. हे अतिशय चूक आहे, माझी वैयक्तिक नाराजी मी व्यक्त केली होती. ती कायद्यावर आधारित होती. माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाही तर प्रक्रियेवर आहे", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\