Gogawale vs Jabre supporters fight : रायगडमध्ये राडा; गोगावले–जाबरे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी, भरत गोगावलेंच्या मुलावर रोखली बंदूक!

    02-Dec-2025   
Total Views |

Gogawale vs Jabre supporters fight
 
मुंबई : (Gogawale vs Jabre supporters fight) राज्यात आज (दि. ०२) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांसाठी आणि ६,०४२ सदस्यपदांसाठी मतदान होत आहे. दरम्यान अनेक मतदान केंद्रांवर वादग्रस्त घटना आणि तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान गोगावले आणि सुशांत जाबरे (Gogawale vs Jabre supporters fight) यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या राड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 
रायगडमध्ये राडा...
 
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील जुना वाद सर्वश्रुत आहे. मात्र, महाड नगरपरिषद निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युती झाल्याने शिवसेना विरुद्ध थेट संघर्ष तयार झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार व मंत्री भरत गोगावले यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
 
महाडमध्ये भरत गोगावले समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे समर्थक (Gogawale vs Jabre supporters fight) यांच्यात मोठी हाणामारी झाल्याची माहिती मिळाली आहे. मतदान सुरू असताना EVM मशीन बंद पडल्याने काही काळ मतदान थांबले. त्यानंतर सुशांत जाबरे बुथवर पाहणी करण्यासाठी आले आणि त्याचवेळी गोंधळ उसळला. गोगावले समर्थकांनी जाबरे (Gogawale vs Jabre supporters fight) यांना बेदम मारहाण केली, त्यांच्या वाहनांची तोडफोड केली आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकालाही मारहाण करण्यात आली.
 
विकास गोगावलेंचे तटकरेंना आव्हान
 
या घटनेनंतर भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "मी मतदान केंद्रावर पाहणीसाठी आलो असता तीन अनोळखी गाड्या आल्या. गाड्यांमध्ये काठ्या आणि हॉकी स्टिक होत्या. माझ्यावर रिव्हॉल्वर उगारण्यात आली. ही रिव्हॉल्वर माझ्यावर का रोखण्यात आली? सुनील तटकरेंमध्ये दम असेल तर त्यांनी समोर यावे; बगलबच्चे पाठवू नयेत."
ते पुढे म्हणाले, "मी भरतशेठची अवलाद आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा मावळा म्हणून आम्ही राज्यात काम करतो. याबाबत मी भरत गोगावले यांना माहिती दिली असून पोलिसांनी योग्य कारवाई करावी."

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.