गोवा मुक्तिसंग्राम : राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय

    19-Dec-2025
Total Views |

Goa
 
तब्बल ४५० वर्षं पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली राहिलेला गोवा हा अखेरीस दि. १९ डिसेंबर १९६१ रोजी परकीय जोखडातून मुक्त झाला. आज या घटनेला ६४ वर्षे पूर्ण झाली. असा हा गोव्याचा मुक्तिसंग्राम केवळ एका प्रदेशाचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय होता. यानिमित्ताने भारतीय राष्ट्रभावनेला प्रेरणा देणार्‍या या मुक्तिसंग्रामाचे, त्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करणारा हा लेख...
 
एस्तादो दा इंडिया पोर्तुगेझाया’ नावाने गोमंतक भूमीतील क्रूर, जुलमी व हुकूमशाही पोर्तुगीज वसाहतवादी साम्राज्य सुमारे साडेचारशे वर्षे चालले. हे राज्य स्थानिक जनतेसाठी दडपशाहीचे प्रतीक होते. हिंदू समाजावर विशेषतः अमानुष अत्याचार करण्यात आले. जबरदस्तीने धर्मांतर, देवळांची तोडफोड, हिंदू धार्मिक विधींवर बंदी, जमिनींची जप्ती, जुलमी करप्रणाली आणि ‘इनक्विझिशन’सारख्या अमानवी न्यायसंस्था यांमुळे गोमंतकीय जनतेचे जीवन असह्य झाले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय हक्क आणि मानवी सन्मान यांचा पूर्ण अभाव होता. या अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरी विरुद्ध उठलेला संघर्ष म्हणजेच ‘गोवा मुक्तिसंग्राम’ होय.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वार्‍यांद्वारे पोर्तुगीजांवर जरब बसवली होती. त्यामुळे धार्मिक अत्याचार मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी १६८३च्या स्वारीत तर पोर्तुगीजांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले होते. त्याच वेळी औरंगजेबाच्या मुघली फौजांनी स्वराज्यावर आक्रमण केले. संभाजी महाराजांना नाईलाजाने गोवा स्वारी आवरती घ्यावी लागली, अन्यथा पोर्तुगीज सत्तेची इतिश्री निश्चित होती. तरीही, संभाजी महाराजांनी एकतृतीयांश गोमंतकावर मराठ्यांचे वर्चस्व स्थापन केले होते. ‘आता हे हिंदू राज्य जाहले...’ असा उल्लेख असणारा संभाजी महाराजांचा ‘शिलालेख’ सध्या गोवा राज्य संग्रहालयात जपून ठेवण्यात आला आहे. पुढे १७३९ साली चिमाजी अप्पा यांनी वसई जिंकून उत्तर फिरंगणातून पोर्तुगीज राज्य संपवले.
 
इतर भागातून हे प्रयत्न सुरू असतानाच, गोमंतकातील स्थानिक जनतेने आपली स्वातंत्र्यकांक्षा कायम राखली होती. गोमंतकाच्या विविध भागांतून वेळोवेळी उठाव झाले. ‘राणे उठाव’ हा त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. सत्तरी आणि आसपासच्या भागातील राणे घराण्याने पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. हा लढा जरी निर्दयीपणे दडपण्यात आला, तरी त्याने गोमंतकीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी कायम जिवंत ठेवली. त्याचप्रमाणे ‘कुंकळी उठावा’त स्थानिक वीरांच्या साथीने स्थानिक शेतकरी, सामान्य जनता आणि समाज नेत्यांनी अन्यायी करप्रणाली व प्रशासनाच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला. या प्रारंभिक उठावांनी पुढील मुक्तिसंग्रामासाठी पोषक मानसिकता तयार केली.
 
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या पूर्वार्धात सुशिक्षित वर्गातून वैचारिक आंदोलनाला चालना मिळाली. यामध्ये त्रिस्ताव द ब्रागांसा कुन्हा ऊर्फ टी. बी. कुन्हा यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि दिशादर्शक ठरले. टी. बी. कुन्हा हे ‘गोवा मुक्तिसंग्रामा’चे वैचारिक शिल्पकार मानले जातात. त्यांनी ‘गोवा इंडिया आहे,’ ही भूमिका निर्भीडपणे मांडली. त्यांच्या लेखनातून, विशेषतः ‘Denationalisation of Goans’ सारख्या ग्रंथातून, पोर्तुगीजांच्या फसव्या धोरणांचा पर्दाफाश झाला. त्यांनी गोव्याच्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आणि संयुक्त राष्ट्रांसह विविध मंचांवर भारताच्या भूमिकेला बळ दिले.
 
त्यांच्या विचारांनी गोव्यातील, तसेच बाहेरील तरुण पिढीला प्रेरणा दिली आणि मुक्तिसंग्रामाला वैचारिक अधिष्ठान मिळाले.
१९४० नंतर ‘गोवा मुक्तिसंग्रामा’ला खर्‍या अर्थाने गती मिळाली. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहणे, हे राष्ट्रीय अस्मितेला मोठे आव्हान होते. याच काळात डॉ. राम मनोहर लोहिया यांचे गोव्याच्या लढ्यातील योगदान अत्यंत निर्णायक ठरले. १९४६ साली त्यांनी गोव्यात येऊन नागरी स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह पुकारला. ‘स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे,’ हा संदेश त्यांनी गोमंतकीय जनतेच्या मनात रुजवला. त्यांच्या आंदोलनामुळे गोव्याचा प्रश्न अखिल भारतीय पातळीवर चर्चेत आला. गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महान कवी बा. भ. बोरकर यांनी ‘गोयान लोहिया आयलो रे’ ही कविता रचून लोहियांच्या योगदानाचा गौरव केला.
 
सत्याग्रह चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे दि. १५ ऑगस्ट १९५५ रोजीचा ‘पत्रादेवी सत्याग्रह’. गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवी येथे भारतभरातून आलेल्या हजारो सत्याग्रहींनी शांततामय मार्गाने गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोर्तुगीजांनी या निःशस्त्र सत्याग्रहींवर अमानुष लाठीमार व गोळीबार केला. शंभराहून अधिक सत्याग्रहींनी हौतात्म्य पत्करले. या घटनेमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आणि ‘गोवा मुक्तिसंग्राम’ अधिक तीव्र व निर्णायक झाला. या काळात सशस्त्र लढ्यालाही महत्त्व प्राप्त झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊन सांगलीहून गोव्यात गेलेले मोहन रानडे यांच्या नेतृत्वाखाली ‘आझाद गोमंतक दल’ स्थापन झाले.
 
या संघटनेने सशस्त्र संघर्षाच्या माध्यमातून पोर्तुगीज सत्तेला मोठे आव्हान दिले. जंगलातून गनिमी काव्याने हल्ले, पोर्तुगीज शस्त्रसाठ्यांवर धाडी, दळणवळण यंत्रणांवर हल्ले आणि गोपनीय संदेशवहन यामुळे पोर्तुगीज प्रशासन हादरून गेले. मोहन रानडे यांनी अनेक वर्षे भूमिगत राहून अत्यंत धाडसाने हा लढा चालवला. या सशस्त्र संघर्षातील एक तेजस्वी बलिदान म्हणजे हुतात्मा बाळा राया मापारी यांचे. एका धाडसी कारवाईदरम्यान पोर्तुगीज सैन्याशी झालेल्या चकमकीत ते जखमी झाले. शत्रूच्या हाती पडू नये आणि सहकार्‍यांची माहिती उघड होऊ नये, म्हणून त्यांनी अपार धैर्याने प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदान ‘गोवा मुक्तिसंग्रामा’तील शौर्याचे आणि त्यागाचे प्रतीक बनले.
 
दादरा-नगर हवेली येथील सशस्त्र कारवाई हादेखील लढ्याचा महत्त्वाचा टप्पा ठरला. या कारवाईत सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या अनेक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. या भागातून पोर्तुगीज सत्ता हद्दपार करण्यात आली आणि गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला. १९५०च्या दशकाच्या अखेरीस सत्याग्रह, सशस्त्र संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय दबाव यांच्या एकत्रित परिणामामुळे परिस्थिती निर्णायक वळणावर आली. अखेर भारत सरकारने लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. डिसेंबर १९६१ मध्ये ‘ऑपरेशन विजय’अंतर्गत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने समन्वित कारवाई केली. अवघ्या ३६ तासांत पोर्तुगीज सैन्याने शरणागती पत्करली.
 
दि. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा, दमण आणि दीव भारतात विलीन झाले. २०२१ मध्ये गोवा सरकारने या ऐतिहासिक घटनेच्या ६०व्या वर्षानिमित्त भव्य सोहळ्यांचे आयोजन केले. देशभरातून ‘गोवा मुक्तिसंग्रामा’तील हुतात्म्यांच्या पत्नी, कुटुंबीय व नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. तसेच, राज्याच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘गोवा मुक्तिसंग्रामा’चा इतिहास अधिक सविस्तरपणे समाविष्ट करून त्यात प्रेरणादायी घटनांवर भर देण्यात आला, जेणेकरून भावी पिढीला स्वातंत्र्याचे मोल समजेल.
 
या संग्रामातील ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील आणि गोव्याच्या इतिहासाला, तसेच भारतीय राष्ट्रभावनेला प्रेरणा देत राहील. ‘गोवा मुक्तिसंग्राम’ हा केवळ प्रदेशाचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय होता. सर्व भारतीयांसाठी १५ ऑगस्ट - ‘स्वातंत्र्य दिन’, १७ सप्टेंबर - ‘हैदराबाद मुक्ती दिन’ आणि १९ डिसेंबर - ‘गोवा मुक्ती दिन’ हे राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस आहेत. संपूर्ण भारतातील जनतेने हा गौरवशाली इतिहास अभ्यासावा आणि हे दिवस ‘राष्ट्रीय दिवस’ म्हणून साजरे करावेत. यातून भारतीय एकात्मता अधिक बळकट होणार आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत, विकसित भारत’कडची वाटचाल अधिक वेगवान, गौरवशाली होणार आहे.
 
- शौनक कुलकर्णी