मुंबई : ( Devendra Fadnavis ) स्वदेशी शिवाय कुठलाच देश पुढे जाऊ शकत नाही. भारतात तयार होणारे उत्पादन हे देशासाठी आणि पुढे विश्वासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या परिकल्पनेतील स्वदेशी हे महत्वाचे पाऊल असून त्याची भूमिकाही महत्त्वाची आहे.", असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विश्व हिंदू इकोनॉमिक फोरमच्या दोन दिवसीय (१९-२० डिसेंबर) वार्षिक परिषदेला ग्रॅण्ड हयात, सांताक्रूझ येथे सुरुवात झाली असून परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेएसडब्लू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल, विश्व हिंदू इकोनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद, विश्व हिंदू इकोनॉमिक फोरम ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष राजेश शर्मा, सहसचिव शैलेश त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आज पुरातत्व विभागाचे पुरावे तपासून पाहिल्यास १० हजार वर्षांपूर्वी सुद्धा भारत पूर्ण विकसित रुपात अस्तित्वात होता, हे दिसून येईल. त्यामुळे आता हे फक्त पुस्तकातील गोष्टींपुरते सिमित राहिले नसून ते 'एविडन्स बेस' झाले आहे. त्याच्याच सहाय्याने आपण येत्या काळात विकसित राष्ट्राच्या दिशेने झेप घेऊ शकू.
पुढे ते म्हणाले, विश्वात जो समृद्ध देश आहे त्याचीच भाषा, त्याचेच विचार चालतात अशी एक समज आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे समृद्ध राष्ट्राच्या रूपात स्वतःला तयार करायचे आहे. चीनसारख्या राष्ट्राची जी स्वतःला विस्तार करण्याची पद्धत आहे, त्यामुळे इतर राष्ट्रांमध्ये चीनबाबतचा विश्वास कमी झाला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे भारताच्या नेतृत्वावर आणि भारतीय संस्कृतीवर असलेला विश्वास यामुळे चीनऐवजी सारे विश्व भारताच्या नेतृत्वाकडे पाहत आहे. लवकरच भारत आर्थिक सुव्यवस्थेचे नेतृत्व करेल अशी शक्यता आहे.
जेएसडब्लू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी 'उत्पादनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत' हा विषय मांडताना म्हणाले, उत्पादन ही लाँगटर्म इन्वेस्टमेंट आहे. मजबूत आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी उत्पादन क्षमतेवर विशेष भर द्यावा लागेल. आज महाराष्ट्र उत्पादनक्षमतेत प्रथम क्रमांकावर आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे लोक शर्थीने प्रयत्न करत आहेत. एमओयूवर सह्या करणे साधी गोष्ट आहे, परंतु ते प्रत्यक्षात उतरवणे हे फक्त फडणवीसांच्या कार्यकाळात शक्य झाले आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक