शेवटची वेळ आल्यानंतर काय काय दिसतं, हे माऊलींनी लिहून ठेवले आहे. आता केव्हा तरी जायचेच आहे. हा नरदेह सहज मिळत नाही. पूर्ण अनुभव घ्यावा, ज्ञान प्राप्त करावे, मगच देह सोडावा. माऊली सांगतात, "कानी घालूनिया बोटे, नाद जे ऐकावे. न ऐकता जाणावे नऊ दिवस.” कानात बोटे घातली की, काही नाद ऐकू येतात. त्याला म्हणतात, अनाहत नाद. नाद ऐकू नाही आले की, समजायचे की आता माझे फक्त नऊ दिवस राहिले आहेत. जी काही निरवानिरव करायची आहे, ती करून घ्या. पुढे म्हणतात, "डोळे घालूनिया बोटे, प्रकाश जे पाहावे, न दिसता जाणावे तीन दिवस.” डोळे बंद करून डोळ्यांवर बोटे ठेवल्यानंतर प्रकाशाची वलये दिसतात. ती दिसली नाहीत तर समजा, आपल्याकडे तीन दिवस अजून आहेत. शेवटी सांगितले आहे, ‘नासाग्रे एकचित्त करावे.’ नासाग्राकडे लक्ष एकाग्र करावे. जर नासाग्र दिसत नसेल, तर ‘तेची दिनी म्हणा रामकृष्ण हरी.’
संत तुकारामांचे सूक्ष्म शरीराचे अनुभव
‘आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम’ - मी माझे मरण पाहिले आहे. कोणता डोळा? या जड डोळ्यांनी नाही, लिंग देहाने म्हणजे सूक्ष्म देहाने. जड शरीरातून सूक्ष्म शरीर ज्यावेळी बाहेर येते, साधारणतः तीन फूट अंतरावर आपले सूक्ष्म शरीर वर तरंगत असते. सगळीकडे सर्व दिसते. जड, सूक्ष्म, कारण व महाकारण शरीर. या सर्व अवस्था आहेत. भगवंत अर्जुनाला म्हणतात, "अर्जुना, तुला दिव्य डोळ्यांची आवश्यकता आहे. ती मी तुला प्रदान करतो. ती ही दिव्यदृष्टी आहे. सर्वांनी हा अनुभव व आनंद जरूर घ्यावा. श्वास, रक्तप्रवाह, हृदय सगळं बंद असतं.सूक्ष्म शरीराने बाहेर पडता येते. आपली इच्छा व साधना असेल, तर कुठेही नेता येते, तेसुद्धा त्याच क्षणात.” ’There is no time and space’ त्या अवस्थेत काल नाही.
पुढे महाराज म्हणतात, ‘तो हा सोहळा अनुपम| आनंदे दाटिली तिन्ही त्रिभुवने’ आपल्या वृत्तीला धरून बाह्य अवस्था असेल, तर आनंद होतो. त्रिभुवने तीन मानली आहेत. पृथ्वी, स्वर्ग व पाताळ. स्वर्ग म्हणजे वर नाही व पाताळ म्हणजे खाली नाही. व्यास म्हणतात, इथेच स्वर्ग व नरक आहे. या अवस्था आहेत. एखादा बेसूर गाणे म्हणत असेल, तर ज्याला गाणे कळते, त्याला दु:ख होईल. पण, तोच सुरात गायला तर आनंद होईल. सम अवस्था ही आनंदाची असते. ‘सर्वात्मकपणे भोग झाला’. याचा अर्थ, सर्व ठिकाणी माझे वास्तव्य आहे, याचा त्यांना अनुभव आला. मी जड शरीरात तर आहेच; पण सूक्ष्म शरीरातसुद्धा आहे. जवळ आहे, दूर आहे, सर्वत्र आहे, विश्वात्मक आहे, हा अनुभव आहे. या कल्पना नाहीत. काय पराकोटीचा आनंद झाला असेल त्यांना? जड शरीर मृत दिसत असते. या अवस्था शब्दांच्या पलीकडील आहेत.
‘एकदेशी होतो, अहंकारे’ मी फक्त जड शरीरापुरताच मर्यादित होतो. मी, माझे शरीर, माझे घर याच अहंकाराच्या मायेत होतो.त्याच्या पलीकडे मी गेलो नव्हतो. कारण, मी मेलो नव्हतो. मरणे म्हणजे वरच्या अवस्थेत जाणे. आपण दुःख मानतो. ‘त्याचा त्याग झाला सुकाळू हा’ शरीर सोडून मी बाहेर पडलो, सारं विश्व मी पाहिलं. मरणोत्तर अनुभव म्हणजे सुकाळ आहे. त्यांनी हे सगळे अनुभव त्यांच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
‘फिटले सुतक जन्ममरणाचे’ सोयर व सुतक कोणाला? ज्याच्या घरी कोणी मेले किंवा जन्मले त्याला. आता तुकाराम महाराज या दोन्ही संस्कारांच्या वर निघून गेले. मग, कशाचं सुतक? किती सुंदर वर्णन आहे. ‘मी माझ्या संकोचे दूरी झालो.’ माझा दृष्टिकोन संकुचित होता. मी व माझे यातून मी आता वर आलो. मी आता ‘सर्वात्मक’ झालो. ज्याने ते जाणले, त्याला कशाचे सुतक? मरणानंतर या गतीतून त्या दिव्यगतीत जातो.
सुतक का पाळावे?
शरीरामध्ये प्रवेश करताना आपण जीवनात प्रवेश करत असतो. शरीरात आल्यानंतर हृदय सुरू होऊन जाते. रक्तप्रवाह सुरू होतो. श्वास सुरू होतो. शरीरातून अमृतधारा वाहत असतात. मग, आपण उठून बसतो. हे मरणाचे व पुन्हा जन्माचे अनुभव आहेत. उठून बसल्यानंतर त्या दिव्य-जगतामधून आल्यामुळे या जड-जगताशी आपण एकदम जमवून घेऊ शकत नाही. जसे भरधाव आगगाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरलो, तर तो प्लॅटफॉर्मच सरकताना आपल्याला वाटतो. तसेच शरीरातून बाहेर गेल्यावर व शरीरात आल्यावर होते. याच्यात समन्वय साधण्यासाठी सोयर व सुतक पाळतात. काळाच्या वर असल्याने समाधी अवस्थेत दाढीमिशा वाढत नाहीत. आपण सुतक असले तरी दाढी करत नाही. सुत म्हणजे समोर या अवस्थेतून त्या अवस्थेत येणे. एखादी मोटार गाडी वेगाने चालवीत असताना अचानक बंद केली, तर गाडी उलटून जाईल. ब्रेक हळूहळू लावावा लागतो. तो जीवात्मा त्या अवस्थेतून आपल्या घरी येतो, त्याच्या वेगाशी स्वतःला जोडायचे असते, म्हणून आपण सुतक पाळतो व त्या दिव्य अवस्थेप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करतो.
‘नारायणी दिला वसतीस ठाव, ठेवूनिया भाव ठेलो पायी.’ त्यांची देवता पांडुरंग. सारे विश्व एका सूक्ष्म तत्त्वाने भारलेले आहे. त्याला म्हणतात अयन. अयन म्हणजे मार्ग. नारा (जलतत्त्व) + अयन = नारायण, जसे राम+अयन = रामायण. राम म्हणजे आत्मा. ज्या मार्गाने प्राप्त करता येईल, तो मार्ग म्हणजे रामायण. त्या अवस्थेत मला नारायणाने मला ठाव म्हणजे जागा दिली, राहावयास दिले. आता मी या जड देहभावाच्या वर गेलो आहे. आता मी तिथेच वस्ती करतो. मी या जगाचा राहिलो नाही. ‘ठेवूनिया भाव, ठेलो पायी’ तुकाराम महाराज भक्त होते. भक्त भगवंताच्या पायी राहू इच्छितो. ‘तुका म्हणे पडलो पाया, करा छाया कृपेची’, ‘घेतले ते अंगी लावूनिया’. मला या अनुभवाचा अर्थ समजला. आता मला कोणतीच माया बांधू शकत नाही. सर्व मायेच्या मी वर आहे. ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम’ हे अनुभव लिहायला शब्द कमी पडतात. पण, त्यांनी सुंदर प्रयत्न केला आहे. हे सर्व दिव्य अनुभव आपण साधना म्हणजे ध्यान, प्राणायाम, योगनिद्रा करून घेऊ शकतो.
- योगिराज हरकरे