...म्हणून जॉर्डन महत्त्वाचा!

    18-Dec-2025   
Total Views |
Narendra Modi
 
जॉर्डन... पश्चिम आशियातील एक महत्त्वपूर्ण देश. हा देश इस्रायलच्या पूर्वेला, सीरियाच्या दक्षिणेला, सौदी अरेबियाच्या उत्तरेला आणि इराकच्या पश्चिमेला वसलेला. यावरून या देशाचे भौगोलिक महत्त्वही लक्षात यावे. या मोक्याच्या भौगोलिक स्थानामुळे जॉर्डन पश्चिम आशियातील एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून उदयास आला. त्यामुळे आखाती देश, उत्तर आफ्रिका आणि पुढे युरोपमधील प्रवेशाचा मार्गही जॉर्डनमधून जातो. जॉर्डनची महती अधोरेखित करण्याचे कारण म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच यशस्वीरित्या संपन्न झालेला जॉर्डन दौरा.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १५ ते १८ डिसेंबरदरम्यान जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौर्‍यावर आहेत. त्यापैकी जॉर्डन आणि इथिओपिया या दोन्ही देशांमधील अभूतपूर्व स्वागतानंतर ते काल ओमानमध्ये दाखल झाले. पण, पंतप्रधानांचा जॉर्डन दौरा हा सर्वार्थाने विशेष म्हणावा लागेल. यापूर्वी, फेब्रुवारी २०१८ मध्येही मोदींनी जॉर्डनला भेट दिली होती. पण, यंदा भारत-जॉर्डनमधील राजनयिक संबंधांनाही ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि व्यापारासह अन्य क्षेत्रातील सहकार्याच्या दृष्टीने मोदींनी जॉर्डनची निवड केली. जॉर्डनचे पंतप्रधान जाफर हसन यांनी मोदींचे विमानतळावर प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वागत केले. त्यानंतर मोदींची जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी अक्षयऊर्जा, जलव्यवस्थापन, सांस्कृतिक देवाणघेवाण, डिजिटल सोल्युशन यांसारख्या क्षेत्रातील पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. जॉर्डन हा भारतासाठी फॉस्फेट आणि पोटॅश खतांचाही आघाडीचा पुरवठादार देश. तसेच, भारत हा जॉर्डनचा तिसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार. हे लक्षात घेता, आगामी पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्टही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
 
भारत आणि जॉर्डनच्या संबंधांना एक भावनिक किनारही लाभली आहे. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांचे चुलत बंधू हसन बिल तलाल यांची पत्नी राजकुमारी सर्वथ अल हसन यांचा जन्म कोलकात्याचा. सर्वथ यांचे काका, मोहम्मद हिदायतुल्लाह हे १९६८ ते १९७० पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून, नंतर १९७९ ते १९८४ पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती आणि दोनदा भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे जॉर्डनच्या राजघराण्याची ही भारताशी जुळलेली नाळही तितकीच विशेष म्हणावी लागेल. आजही जॉर्डनमध्ये भारतीय नागरिकांची संख्या दखलपात्र आहे. सध्या या देशात सुमारे १७ हजार ५०० भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. यांपैकी बहुतांश भारतीय कापड, बांधकाम, उत्पादन, आरोग्यसेवा इत्यादी क्षेत्रांत कार्यरत आहेत. १९९० मध्ये सद्दाम हुसेनने कुवेतवर हल्ला चढवल्यानंतर, तेथील जवळपास एक लाख भारतीयांनी जॉर्डनमध्ये आश्रय घेतला होता आणि त्यानंतर राजधानी अम्मानवरून ‘एअर इंडिया’च्या विमानांनी त्यांना सुखरूप भारतात आणण्यात आले. त्यामुळे जॉर्डन आणि भारताचे संबंध हे तसे प्रारंभीपासूनच सौहार्दाचे आणि सहकार्याचे राहिलेले दिसतात.
 
जॉर्डन हा आखाती देश ९५ टक्के सुन्नी लोकसंख्येचा असला, तरी तिथे अन्य अरब देशांप्रमाणे मुस्लीम कट्टरतावाद फोफावला नाही. याचे एक कारण म्हणजे, जॉर्डन हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि १९४६ साली तो स्वतंत्र देश म्हणून जगाच्या नकाशावर आला. तसेच, जॉर्डन हा इस्रायलला मान्यता देणारा दुसरा अरब देश ठरला. त्यामुळे इराक, सीरिया, इस्रायल, पॅलेस्टाईन अशा अशांत भौगोलिक परिस्थितीत, २०१०च्या ‘अरबक्रांती’ नंतरही जॉर्डनमध्ये मात्र कोणतीही उलथापालथ झाली नाही, हे विशेष. तसेच, भारत-मध्य पूर्व-युरोप कॉरिडोरमध्येही इस्रायलइतकीच जॉर्डनची भूमिकाही कळीची ठरणार आहे. कारण, आखाती देशांतून पुढे युरोपला जोडणारा मार्ग हा जॉर्डनमधून जातो. त्यामुळे जॉर्डनशी संबंध हे भारतासाठीही तितकेच महत्त्वाचे. जॉर्डनचे युवराज अल हुसेन बिन अब्दुल्ला-२ हे जातीने मोदींना निरोप देण्यासाठी विमानतळावरही उपस्थित होते. यावरून दोन्ही देशांमधील मैत्रिपूर्ण संबंध भविष्यात आणखीन दृढ होतील, हे निश्चित.
 
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची