_202512181248547723_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
परिक्षीणा मध्ये परिणत शरच्चन्द्र-वदना|
धनुर्बाणान् पाशं सृणिमपि दधाना करतलैः
पुरस्ता दास्तां नः
पुरमथितु राहो-पुरुषिका ॥ ७ ॥
शब्दार्थ - या श्लोकात देवीच्या स्थूल स्वरूपाचे वर्णन केले आहे. हा देवीच्या सगुण स्वरूपाचे ध्यान करण्यासाठी रचलेला श्लोक आहे. या श्लोकाचे आवर्तन करत भगवतीच्या स्वरूपाचे ध्यान करणे, हे समस्त वासनांची पूर्तता साधून मोक्षानुगामी होण्याचा मार्ग प्रशस्त करते. देवीच्या या सगुण स्वरूपाचे वर्णन करताना निर्गुण ब्रह्म असलेल्या शिवाला तिचे स्वरूप कसे दिसते, या दृष्टिकोनातून आचार्य शब्दबद्ध करतात.
आचार्य म्हणतात, भगवती श्री ललिता त्रिपुरसुंदरी ज्यावेळी शिवाच्या सन्मुख पदन्यास करत येते, त्यावेळी तिच्या रूपाला बघून शिवाच्या मुखातूनही आश्चर्यचकित होऊन ‘अहो रूपं’ असा भाव प्रकट होतो. यात ‘श्लेष’ आहे. आपली पत्नी इतकी सुंदर आहे, अनुपम गुणांची स्वामिनी आहे, याचा एक सार्थ अभिमान शिवाच्या मुखातून प्रकट होतो. यात स्वतःच्या पुरुष असण्याचा आणि भगवतीचा पती असल्याचा अभिमानसुद्धा व्यक्त होतो आहे.
देवी नखशिखांत सुवर्ण, रत्न, पोवळे जडवलेल्या दागिन्यांनी अलंकृत आहे. देवीने रत्नजडित सुवर्णाचा कंबरपट्टा धारण केला आहे. त्यातील साखळ्यांना घुंगरू बसवले आहेत. ती चालत असताना त्यांचा अत्यंत मधुर असा स्वर प्रकटतो आहे. देवी जगन्माता आहे. संपूर्ण जगतातील बालकांचे पोषण करण्यासाठी तिचे स्तनद्वय हे अमृतरूपी दुग्धाने भरले आहेत. तिची कंबर मात्र अत्यंत सिंहकटी स्वरूपाची आहे. देवीच्या या सौंदर्याचे वर्णन ‘श्री ललिता सहस्रनामा’त अत्यंत अनुपम पद्धतीने केले आहे.
श्री ललिता सहस्रनाम
कामेश्वर प्रेमरत्न मणि प्रतिपण स्तनी|
नाभ्यालवाल रोमालि लताफल कुचद्वयी॥१४॥
लक्ष्यरोम लताधारता समुन्नेय मध्यमा|
स्तनभार दलन्मध्य पट्टबंध वलित्रया॥१५॥
नाम क्रमांक ३३ : कामेश्वर प्रेमरत्न मणि प्रतिपण स्तनी
शब्दार्थ : श्री ललिताम्बिकेने आपल्या पतीच्या, कामेश्वराच्या मणी - स्वरूप प्रेमरत्नाच्या प्राप्तीसाठी त्याला आपले दोन्ही स्तनयुग्म दिले आहेत. प्रतिपण म्हणजे देवाणघेवाण - एका गोष्टीच्या प्राप्तीसाठी दुसरी गोष्ट प्रदान करणे. शिवाचे प्रेम हा हृदयस्थळी अभिमानाने धारण करण्याजोगा मणी आहे. त्याच्या प्राप्तीसाठी भवानी आपले स्तनद्वय त्याला प्रदान करते. त्याचे स्वामित्व त्याला देते.
नाम क्रमांक ३४ : नाभ्यालवाल रोमालि लता फल कुचद्वयी
शब्दार्थ : श्री ललितादेवीच्या नाभीजवळ सूक्ष्म अशी रोमावली अर्थात, बारीकसे केस आहेत. ते केस जणू एखाद्या वेलीप्रमाणे ऊर्ध्व दिशेने, तिच्या स्तनद्वयापर्यंत गेलेले आहेत. श्री भवानीचे स्तनद्वय हे तिच्या रोमावली स्वरूप वेलीच्या दोन्ही अंगाना लगडलेली फळे भासत आहेत. देवीचे नाभी चक्र (मणिपूर चक्र), ज्यात जलतत्त्व प्रधान आहे. तिथेच देवीची कूस आहे आणि ऊर्ध्वगामी रोम हे साधकाला या गोष्टीची जाणीव करून देतात की, आत्मज्ञान असेच सूक्ष्म आहे आणि त्याच्या प्राप्तीचा मार्ग ऊर्ध्वगामी आहे. स्तनांच्या जवळ हृदय चक्र आहे. आपण श्री ललिताम्बिकेच्या गर्भातील बालक आहोत, तर आपल्यासाठी हे रोम जणू आपल्याला सांगतात की, तुमच्या क्षुधेची पूर्ती करून घेण्यासाठी तुम्ही ऊर्ध्वगामी प्रवास करा. तुमच्या भुकेची पूर्तता हे स्तन करतील. अर्थात, साधकाच्या आत्मज्ञान प्राप्तीच्या भुकेच्या पूर्ततेचा मार्ग मणिपूर चक्रातून हृदय चक्राच्या दिशेने जातो.
नाम क्रमांक ३५ : लक्ष्यरोम लताधारता
समुन्नेय मध्यमा
शब्दार्थ : तिच्या नाभी सभोवतालचे केस अत्यंत सूक्ष्म आहेत आणि ते खूप निरीक्षण करून पाहिल्यावरच नजरेस पडतात. आत्मा हा आपल्या शरीरातसुद्धा असाच अत्यंत सूक्ष्मावस्थेत असतो. त्याचे अस्तित्व जाणवण्यासाठी आणि त्याला कर्मप्रवण करण्यासाठी आपल्याला ध्यान करणे अत्यंत आवश्यक आहे. साधक अंतर्मुख झाला आणि तितयाच प्रखरतेने तो आपल्या जीवात्माच्या अस्तित्वाला आपल्या शरीरात शोधू लागला, तर त्याला ते नक्कीच जाणवेल. ही सूक्ष्मदर्शी वृत्ती साधकाच्या अंगी श्री ललिताम्बिका विकसित करते, म्हणून तिला वंदन असो.
नाम क्रमांक ३६ : स्तनभार दलन्मध्य पट्टबंध वलित्रया
शब्दार्थ आणि भावार्थ : श्री ललिताम्बिकेचे स्तन अत्यंत पुष्ट, उन्नत आणि पयोधर असे आहेत. ते तसे असणे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण, ती जगन्माता आहे. संपूर्ण विश्वाचे भरणपोषण ती आपल्या स्तनांद्वारेच करते. तिचे स्तन पुष्ट आहेत आणि तिची कंबर अत्यंत निमुळती आहे आणि तिच्या पोटावर तीन आडव्या रेखा/वळ्या आहेत. तिच्या पोटावरील या तीन वळ्या एखाद्या पट्ट्याप्रमाणे तिच्या शरीराला आधार देत आहेत. कारण, या स्तनांच्या ओझ्याने ती जणू कोसळेल, अशी कवीने कल्पना केलेली आहे. या तिन्ही गोष्टी पराकोटीच्या सौंदर्य निदर्शक आहेत. भारतीय सौंदर्यशास्त्राची जी मानके आहेत, त्यात अत्यंत लावण्यवती स्त्री या पद्धतीच्या शरीराची स्वामिनी असते. श्री ललिताम्बिका ही जगन्माता आहे आणि अत्यंत सुंदर आहे. किंबहुना, हे सौंदर्याचे मापदंड तिला पाहूनच निर्माण झालेले आहेत. या तीन वळ्या आपण उत्पत्ती, स्थिती आणि लय सूचक म्हणून व्यक्त करू शकतो आणि या तिन्ही कार्यांच्यापेक्षा संपूर्ण विश्वाचे भरणपोषण हे अधिक मुख्य कार्य असल्याने स्तन अधिक पुष्ट आहेत, असासुद्धा याचा अर्थ होऊ शकतो.
श्री ललिता देवीची निमुळती कंबर आणि तिच्या पोटावरील तीन रेखा, यावरसुद्धा कवीने कल्पना अशी केलेली आहे की, तुझी निमुळती कंबर म्हणजे जणू एखादी कुंडी आहे. तुझ्या नाभीतून रोमावली एखाद्या वेलीप्रमाणे ऊर्ध्वगामी आहे आणि तिच्या दोन्ही बाजूंना तुझ्या पुष्ट स्तनद्वयांची फळे लगडलेली आहेत. परंतु, या फळांच्या प्राप्तीचा ते विचारसुद्धा करू शकत नाहीत. कारण, ती फळे तू तुझा पती शिवाच्या प्रेमाचा रत्नमणी मिळावा, म्हणून त्यालाच प्रदान केलेली आहेस.
देवीने आपल्या चार हातांच्या मध्ये अनुक्रमे पाश, अंकुश, पुष्पबाण आणि उसापासून तयार केलेले धनुष्य धारण केलेले आहे. पाश हा भक्ताच्या भौतिक सुखाच्या लालसेवर बंधन घालतो. अर्थात, भौतिक सुख मिळवणे आणि त्याचा उपभोग घेणे हे योग्य आहे. परंतु, त्याचा अतिरेक होऊ नये, हे बंधन हा पाश घालतो. अंकुश हा भक्ताच्या षड्रिपूंवर (काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सहा गुण म्हणजे षड्ररिपू) ठेवला जातो आणि षड्ररिपू नियंत्रणात राहिल्याने त्याची आध्यात्मिक आणि आधिभौतिक प्रगती होते.
तिच्या हातात असणारे पाच पुष्पबाण म्हणजे पंच तन्मात्रा आहेत. पंच तन्मात्रा ही पंचमहाभूते आहेत, ज्यांची श्री ललिता देवी ही स्वामिनी आहे. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि अंतरिक्ष. तिच्या हातात असणारे उसाचे धनुष्य हे मनोवस्थेचे प्रतीक आहे. हा ऊस ‘पौंड्र’ या विशिष्ट जातीचा आहे, जो रंगाने पूर्ण लाल असतो आणि तो अत्यंत लवचीक असतो. इतका लवचीक की, त्याचे धनुष्य बनवले जाऊ शकते. ऊस ज्याप्रमाणे आतून अत्यंत मधुर असतो, त्याप्रमाणे श्री ललिता देवीची उपासना करून आपण अत्यंत मधुर चित्ताने आपल्या पंच तन्मात्रांच्या साहाय्याने सगळ्या भौतिक सुखांचा आस्वाद घेऊन तृप्त होऊ शकतो. या भौतिक आणि आध्यात्मिक सुखांच्या प्राप्तीसाठी हे देवी भवानी मी तुझ्या या वरदायिनी रूपाला माझ्या चित्तामध्ये स्थिर करतो आहे.
हे देवीच्या सौंदर्याचे वर्णन साक्षात निर्गुण ब्रह्म शिवाला मोहात पाडणारे आहे आणि सामान्य साधकासाठी हे वर्णन मातृभाव आणि सौंदर्यासक्त दृष्टी जागृत होऊन शरण येण्यासाठी उद्युक्त करणारे आहे. देवीच्या या स्वरूपाचे ध्यान साधकाची आत्मउन्नती घडवते आणि त्याच वेळेस त्याला सर्व प्रापंचिक सुखसुद्धा प्राप्त होतात.