Kirti Azad E-Cigarette : संसदेत टीएमसीच्या खासदाराने ओढली ई-सिगरेट, भाजपचा व्हिडिओ शेअर करत थेट सवाल

संसदेत ई-सिगरेट (Vaping) ओढल्याच्या आरोपावरून राजकीय वाद पेटला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ति आझाद यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत गंभीर आरोप केले आहेत.

    18-Dec-2025   
Total Views |
Kirti Azad E-Cigarette : संसदेत टीएमसीच्या खासदाराने ओढली ई-सिगरेट, भाजपचा व्हिडिओ शेअर करत थेट सवाल
 
मुंबई : (Kirti Azad E-Cigarette) लोकसभेत कामकाज सुरू असताना ई-सिगरेट ओढल्याचा कथित प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भाजपने या प्रकरणात थेट तृणमूल काँग्रेसच्या खासदारावर आरोप करत, एक व्हिडिओ शेअर केला असून, यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
 
कीर्ति आझाद यांच्यावर भाजपचा थेट आरोप
 
भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत संसदेत ई-सिगरेट ओढणारे खासदार म्हणजे तृणमूल काँग्रेसचे कीर्ति आझाद असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मालवीय यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अनुराग ठाकूर यांनी ज्या खासदारावर संसदेत ई-सिगरेट ओढल्याचा आरोप केला होता, ते कीर्ति आझाद आहेत. अशा लोकांसाठी नियम आणि कायद्याला काहीच अर्थ नाही. सभागृहात बसून हातात ई-सिगरेट लपवण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. धूम्रपान वैयक्तिक बाब असू शकते, पण संसदेत असे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या खासदाराच्या या वर्तणुकीवर स्पष्टीकरण द्यावे.”

अनुराग ठाकूर यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार
 
या प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी मागील आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. सभागृहाचे कामकाज सुरू असताना तृणमूल काँग्रेसचा एक खासदार आपल्या जागेवर बसून उघडपणे इलेक्ट्रॉनिक सिगरेटचा वापर करत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. अनेक खासदारांनी हा प्रकार पाहिल्याचा दावा करत, हे संसदीय शिस्तीचे गंभीर उल्लंघन असल्याचे अनुराग ठाकूर यांनी म्हटले होते.
 
‘व्हॅप’ किंवा ई-सिगरेट म्हणजे काय?
 
व्हॅप किंवा ई-सिगरेट हे बॅटरीवर चालणारे उपकरण असून, त्याद्वारे निकोटीन किंवा इतर द्रव पदार्थ वाफेच्या स्वरूपात ओढले जातात. महत्त्वाचे म्हणजे, भारतात इलेक्ट्रॉनिक सिगरेटवर केंद्र सरकारने पूर्ण बंदी घातलेली आहे. त्यामुळे संसदेत अशा उपकरणाचा वापर होणे हा केवळ शिस्तभंग नाही, तर कायद्याचे उल्लंघनही मानले जाते.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.