लोकाभिमुख उद्योजक

    17-Dec-2025   
Total Views |
Ramdas Sargar
 
संघर्षाची काटेरी पायवाट चालत, कल्पकता आणि नावीन्याचा विचार मांडून व्यवसाय करणार्‍या रामदास सरगर यांची जीवनकथा...
 
आपल्या देशात सध्या उद्योजकता व व्यवसाय हे दोन परवलीचे शब्द. स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसायाचे क्षितिज विस्तारणार्‍या तरुणांची पिढी आज आपल्या देशामध्ये आहे. व्यवसायाकडे केवळ नफा कमावण्याचे साधन इतया संकुचित दृष्टीने न बघता, हे क्षेत्र म्हणजे समाजात परिवर्तन घडवण्याचे साधन आहे, हा विचार अनेकजण करत आहेत. सरकारचे सकारात्मक धोरण, नव्या आव्हानांना भिडणारी तरुण पिढी यांच्यामुळे विकसित भारताचे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल, यात शंका नाही. अशाच या नव्या भारतातील दिशादर्शक उद्योजक म्हणजे रामदास सरगर.
 
अहिल्यानगर जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातून रामदास सरगर यांच्या जीवनाची सुरुवात झाली. कधीकधी माणसाच्या आयुष्यात पावला-पावलांवर संघर्ष लिहिलेला असतो. सरगर यांच्या जीवनाकडे बघितल्यावर असे लक्षात येते की, प्रत्येक टप्प्यावर संघर्षाला सामोरे जाताना त्यांच्या जगण्याची जिद्द मात्र तिळभरही कमी झाली नाही. किंबहुना, ती जिद्द वाढतच गेली. दोन वेळेच्या भाकर तुकड्यासाठी मजुरी करणार्‍या आई-वडिलांच्या घरात गरिबी पाचवीला पुजली होती. अशा या कुटुंबामध्ये शिक्षणाचे धडे गिरवणारेसुद्धा कोणी नव्हते. अशातच रामदास सरगर यांनी पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकले श्रमाच्या संस्कारांबरोबरच! शाळेतील घोंगडे गुरुजींनी त्यांच्याकडून पाढे पाठ करून घेतले. त्यांनाही हे ठाऊक नव्हते, हे अंकगणित आपल्याला किती दूरपर्यंत नेणार आहे. इयत्ता चौथीपासूनच त्यांनी मोलमजुरी करत शिक्षण घेतले. एका बाजूला घराला हातभार लावत, दुसरीकडे त्यांचे शिक्षण सुरू होते. त्यांच्या या शिक्षणाचे श्रेय ते कर्मवीर भाऊराव पाटील यांना देतात. रयत शिक्षण संस्थेचे कार्य जर का उभे राहिले नसते, तर माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकता आले नसते. रामदास यांना लहानपणीच त्यांच्या आईने स्वयंपाक शिकवला. स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर जीवनाचा पाया अशा पद्धतीने रचला जात होता.
 
आपल्या शालेय शिक्षणानंतर, उच्चशिक्षणासाठी रामदासजी सातार्‍याला आले व सातारा हीच त्यांची कर्मभूमी झाली. इथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना त्यांना अनेकांचा सहवास लाभला. याच काळामध्ये त्यांनी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. स्वतःचा व्यवसाय उभा करताना ज्या अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, जे अपयश पचवावे लागते, त्या सार्‍या गोष्टींचा सामना करत रामदास सरगर यांनी ‘श्रीराज कन्स्ट्रशन’ची सुरुवात केली. काम करत असताना अपमानाचे अनेक प्रसंग त्यांनी सोसले. मात्र, त्यातून खचून जाण्यापेक्षा त्यावर मात करत पुढे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इमारतीचा पाया रचताना आपण केवळ एक वास्तू नाही, तर कुणाचे तरी घर, श्रद्धास्थान उभे करत आहोत, याची जाणीव मनात ठेवत त्यांनी काम केले. यातूनच पुढे ‘श्रीराज इन्फ्रा प्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेड’, ‘श्रीराज इंजिनिअरिंग वर्स’, ‘सरगर चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्था त्यांनी उभारल्या. पुण्याच्या नागेवाडी येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर त्यांनी नऊ कमानींची विहीर बांधली. ही विहीर म्हणजे आधुनिक स्थापत्य शास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. नक्षीकाम, शिल्पकला व वैज्ञानिक दृष्टिकोन या त्रिवेणी संगमातून या विहिरीची निर्मिती करण्यात आली आहे. आज असंख्य पर्यटक ही विहीर बघण्यासाठी येतात.
 
माणसे एकटी यशस्वी होत नाहीत, त्यांच्या यशामागे हजारो लोकांचा हात असतो, असे मत रामदास सरगर व्यक्त करतात. त्यांचे बंधू, त्यांचे आई-वडील, सोबत व्यवसायाच्या निमित्ताने भेटलेले मित्रगण आणि वेळप्रसंगी अपमान करणार्‍या आणि अन्याय करणार्‍या लोकांनीसुद्धा मला घडवले, असे मत ते व्यक्त करतात. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, कामाच्या निमित्ताने त्यांनी आतापर्यंत दहा लाख किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. या प्रवासामध्ये त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. अशातच एकदा त्यांचा अपघात झाला व मानेला ४० टाके लावावे लागले. याही परिस्थितीमध्ये खचून न जाता, त्यांनी सोबत जखमी झालेल्या लोकांना धीर दिला. मजुरी करणार्‍या आई-वडिलांचा मुलगा इथपासून ते यशस्वी उद्योजक असा प्रवास त्यांनी साकारला. आपल्या वाट्याला जे भोग आले, ते इतरांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांनी ‘सरगर चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली, जिच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च ते उचलतात. रामदास सरगर हे नाव म्हणूनच अनेकांसाठी विशेष आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.