मुंबई : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या इथिओपियाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी आज आदिस अबाबा येथे इथिओपियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. या भाषणावेळी पंतप्रधान मोदींनी १४० कोटी भारतीयांच्या वतीने जगाला सहकार्याचा आणि सद्भावनेचा संदेश देत त्यांनी इथिओपियाकडून मिळालेल्या सर्वोच्च नागरी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला तीव्र विरोध करत त्याविरोध एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. इथिओपियाला पंतप्रधान मोदींनी Land of Lions (सिंहांची भूमी) म्हणत संबोधले.
भारत–इथिओपिया नात्यांची ऐतिहासिक मुळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथिओपियाच्या संसदेत भाषण करणारे जागतिक स्तरावरील महत्त्वाचे नेते ठरले आहे. इथिओपिया ही जगातील १८ वी संसद आहे. या संसदेतील भाषणात पंतप्रधान मोदींनी भारत आणि इथिओपियातील मैत्रीचा, सांस्कृतिक नात्याचा आणि मूल्यांचा उल्लेख करत म्हटले की, दोन्ही देशांतील संस्कृतीची मुळे ही अत्यंत प्राचीन आहेत, यामुळे दोन्ही देश राजकारणापलीकडे जाऊन एकमेकांशी जो़डले गेले आहेत. त्यांनी इथिओपियाच्या संसदेला लोकशाहीचे मंदिर म्हणून वर्णिले असून जनतेची इच्छा हेच राज्याचे धोरण असल्याचे अधोरेखित केले.
‘वंदे मातरम’ चा उल्लेख
इथिओपियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारताच्या राष्ट्रगीताचा वंदे मातरम आणि इथिओपियाच्या राष्ट्रागीतामधील साम्यतेचा देखील उल्लेख केला. दोन्ही गीतांमध्ये मातृभूमीचे गौरवगान असल्याचे त्यांनी म्हटले.
दहशतवादाविरोधात ठाम भूमिका
जागतिक पातळीवरील आव्हानांवर भाष्य करताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत, दहशतवादाविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्र उभे राहणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. शांतता आणि स्थैर्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
इथिओपियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार १४० कोटी भारतीयांना अर्पण
याच दौऱ्यात पंतप्रधान मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रेटर ऑनर निशान ऑफ इथिओपिया’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान स्वीकारताना त्यांनी तो वैयक्तिक नसून १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे सांगितले. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या तत्त्वांवर भारत भविष्याकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधानांनी ठामपणे नमूद केले.