
मुंबई : नाशिक सदनिका गैरव्यवहार प्रकरण क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना चांगलेच भोवले आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनुसार राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे या संदर्भातील पत्र दिले. दरम्यान, कोकाटेंकडील अतिरिक्त खाते हे तूर्त अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
काय आहे कोकाटेंचे नाशिक सदनिका गैरव्यवहार प्रकरण ?
१९९५ साली माणिकराव कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकात असल्याचे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील दहा टक्के आरक्षित असणारी एक सदनिका मिळवली होती. या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. ही सदनिका मिळविण्यासाठी कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर केली होती. याच प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी कॅनडा कॉर्नर व्ह्यू अपार्टमेंटमध्ये चार जणांना अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवून दिल्याचा त्यांचा आरोप आहे. तत्कालीन राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल होती. यानंतर सदनिका वाटपाची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात आता जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटेंना शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा आता कायम ठेवण्यात आली आहे. याच कारणास्तव कोकाटेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.