ऑस्ट्रेलियाचे आता तरी डोळे उघडणार का?

    16-Dec-2025   
Total Views |
 
Australia
 
रविवारी सिडनीच्या बाँडी समुद्रकिनार्‍यावर दोन इस्लामिक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १६ ऑस्ट्रेलियन नागरिक ठार झाले. ‘हनुका’ सण साजरे करणारे ते बहुतांशी ज्यूच! यानिमित्ताने ऑस्ट्रेलियामधील वाढते इस्लामीकरण आणि कट्टरवादी मानसिकतेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्याविषयी...
 
मागे ‘हिज्बुत-तहरीर’ या दहशतवादी संघटनेचा एक नेता म्हणाला होता की, "ज्यू हे दुष्ट प्राणी आहेत.” ऑस्ट्रेलियाचाच माजी मुफ्ती शेख ताज अल-दीन अल-हिलाली म्हणतो, "ज्यू लोक हे लैंगिक संबंधांद्वारे जगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. नंतर लैंगिक विकृती, नंतर हेरगिरी, देशद्रोह आणि आर्थिक साठवणुकीचा प्रचार करतात. ख्रिश्चन आणि ज्यू हे देवाच्या निर्मितीतील सर्वात वाईट घटक आहेत.” ज्यांची ज्यू धर्मियांशी इतकी पराकोटीची विषारी मते असतील, त्यांच्या मनात ज्यूद्वेष किती हिंस्र पातळीवर भिनलेला असेल, याचा रविवारी पुनश्च प्रत्यय आला. सिडनीच्या बाँडी समुद्रकिनार्‍यावर ‘हनुका’ हा सण साजरा करणार्‍या ज्यू-बांधवांवर दोन इस्लामिक दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला, ज्यात १६ जणांचा मृत्यू झाला आणि ४०हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेमुळे २०२३ साली जे इस्रायलमध्ये घडले आणि एप्रिलमध्ये जे पहलगाममध्ये घडले, त्याचीच ही पुनरावृत्ती म्हणावी लागेल. यानिमित्ताने ऑस्ट्रेलियामधील इस्लामीकरणाचा संक्षिप्त इतिहास आणि कट्टरतावादातून पोसलेला दहशतवाद यांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरावे.
 
ऑस्ट्रेलिया हा तसा जगापासून दुरावलेला देश. पण, तरीही या खंडात अगदी १७व्या शतकापासूनच इस्लामची पाळेमुळे फोफावण्यास प्रारंभ झाला. इंडोनेशियामधून ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनार्‍यावर इस्लामच्या अनुयायांनी आधी व्यापारी म्हणून शिरकाव केला व त्यानंतर काहींनी निकाह करून तिथेच कायमचे बस्तान बसवले. ऑस्ट्रेलिया हा तसा वाळवंटी, शुष्क प्रदेश. तेथील उंटांचा सांभाळ करण्यासाठी बलुचिस्तान, अफगाणिस्तानमधूनही मोठ्या संख्येने मुस्लीम ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले. कालांतराने १८६१ साली दक्षिण ऑस्ट्रेलियातील मॉरी येथे पहिली मशीदही उभी राहिली. त्याचप्रकारे ऑस्ट्रेलियावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांनी शिंपल्यांची शेती करण्यासाठी खास मलय लोकांना गुलाम म्हणून या भूमीवर आणले.
 
विविध लहान-मोठ्या बेटांवरून दाखल झालेले हे मलयदेखील मुसलमानच. १९०१ मध्ये ‘व्हाईट ऑस्ट्रेलिया पॉलिसी’ अंतर्गत केवळ गौरवर्णीय युरोपीय वंशाच्या नागरिकांनाच ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेशाचा नियम लागू झाला. त्यामुळे वर्णाने गोरे; पण युरोपातील मुस्लीमही ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. दुसर्‍या महायुद्धानंतर अल्बानिया, बोस्निया, हर्जेगोविना, लेबेनॉन, तुर्कीये या देशांमधून मोठ्या संख्येने मुस्लीम लोकसंख्या ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाली. जवळपास १९७३ पर्यंत हे धोरण राबविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने हा वर्णद्वेषी निर्णय मागे घेतला आणि सरसकट सगळ्याच देशांतील नागरिकांसाठी प्रवेश सुकर केला. उद्देश हाच की, मोठ्या संख्येने कुशल कामगारवर्ग ऑस्ट्रेलियात दाखल होईल आणि या देशाची भरभराट होईल. नंतर पाकिस्तान, बांगलादेश, भारतातूनही हजारोंच्या संख्येने मुस्लिमांनी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण, नोकरीसाठी स्थलांतर केले. परिणामी, २०११च्या जनगणनेनुसार, चार लाख ६६ हजार इतकी ऑस्ट्रेलियन मुसलमानांची अधिकृत संख्या नोंदवण्यात आली. आज या देशात ३५०हून अधिक मशिदी उभ्या असून, ख्रिश्चॅनिटीनंतर इस्लाम हाच येथील दुसर्‍या क्रमांकाचा धर्म आहे. यावरून गेल्या चार-पाच दशकांत या अख्ख्या देशाचीच डेमोग्राफी किती झपाट्याने बदलली, याचा एक अंदाज यावा.
 
अमेरिकेप्रमाणेच ऑस्ट्रेलियामध्येही स्थलांतरितांच्या माध्यमातून देशाची प्रगती निश्चितच झाली. पण, इस्लामिक स्थलांतराचे जसे भीषण चटके युरोपीय देशांना सोसावे लागले, ते ऑस्ट्रेलियाच्याही वाट्याला आलेच. यामध्ये देशभर मशिदी उभारण्याचा झपाटा लावणे, हलाल उत्पादनांचा प्रचार-प्रसार करणे, इस्लाम अन्य धर्मियांवर लादण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रयत्न करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, महिलांवरील अत्याचार या सगळ्यांचे प्रमाणही पराकोटीचे वाढले. एवढेच नाही तर ‘इसिस’मध्येही ऑस्ट्रेलियातून कित्येक मुस्लीम तरुण रुजू झाले आणि कालांतराने याच भूमीत दहशत माजवण्यासाठी उजळ माथ्याने परतलेही. समाजमाध्यमांचा हा आणखीन एक दुष्परिणाम.
 
युरोपप्रमाणेच जे ऑस्ट्रेलिया मुक्त विचारांचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे माहेरघर म्हणविले जात होते, तेही हळूहळू इस्लामच्या लोकसंख्यात्मक आक्रमणाला बळी पडत गेले. या सगळ्यात कहर केला, तो सिडनीमधील सामूहिक बलात्कारांच्या विषण्ण करणार्‍या घटनांनी. सन २००० मध्ये १४ मुस्लीम नराधमांनी ऑस्ट्रेलियन मुलींवर अनन्वित सामूहिक अत्याचार केले. २००२ साली १४ नराधमांपैकी नऊ जणांविरोधात सबळ पुराव्यांच्या आधारे एकूण २४० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा न्यायालयातर्फे सुनावण्यात आली. पण, ही अशी एकच घटना नाही. यानंतरही विशेषकरून सिडनी आणि आसपासच्या उपनगरात इस्लामिक कट्टरतावादाची विषवल्ली फोफावतच गेली.
 
२००५च्या क्रोनुला भागातील दंगली असो किंवा २०१४ साली मॅन हेरॉन मोनीस या मूळच्या इराणी निर्वासित; पण ऑस्ट्रेलियन नागरिकाने एका कॅफेमध्ये १८ जणांना १६ तासांसाठी ओलीस ठेवण्याचा केलेला धक्कादायक प्रकार, यांमुळे मुस्लिमांविषयी ऑस्ट्रेलियातील जनमतही कलुषित झाले. त्याशिवाय वेळोवेळी इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून झालेल्या चाकुहल्ल्यांच्या प्रकरणांनंतरही ऑस्ट्रेलिया कित्येकदा हादरला. दि. १५ एप्रिल २०२४ रोजी तर सिडनीतील वॉकेले येथील चर्चमध्ये एका इस्लामिक माथेफिरूने थेट बिशप आणि प्रीस्टवरच जीवघेणा चाकुहल्ला केला.
 
तसेच, गेल्याच वर्षी डिसेंबरमध्ये मेलबर्नमधील ज्यू-धर्मियांचे प्रार्थनास्थळ असलेले सिनेगॉग पेटवून देण्यात आले. म्हणजेच काय, तर ऑस्ट्रेलियामधील ४३ टक्क्यांहून अधिक असलेले ख्रिश्चन असतील किंवा ०.४ टक्के इतकेच ज्यू असतील, इस्लामिक कट्टरतावादापासून कुणीही सुरक्षित नाही. परिणामी, ‘रिक्लेम ऑस्ट्रेलिया’सारख्या उजव्या संघटनांच्या मंडळींनी वेळोवेळी ‘शरिया नको’ म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शनेही केली. पण, याबाबतीत जसे युरोपियन देशांमध्ये अजूनही मुस्लिमांविषयी मानवतावादी वगैरे गटांना पराकोटीची सहानुभूती वाटते, तीच गत ऑस्ट्रेलियातही! काही ऑस्ट्रेलियन नागरिक या मुस्लिमांच्या आणि विशेषकरून गाझामधील इस्रायलच्या अत्याचारांविरोधातही मोठ्या संख्येने यावर्षी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे भूतकाळात असो अथवा वर्तमानातही, इस्लामिक दहशतवाद्यांकडून घडलेल्या अशा घृणास्पद घटनांनंतरही ऑस्ट्रेलियामध्येही मुस्लिमांना पाठीशी घालणारे नागरिक बहुसंख्येने आहेतच, हे सर्वस्वी दुर्दैवच!
 
सिडनीतील दोघेही पिता-पुत्र हल्लेखोर साजिद आणि नवीद अक्रम हे पाकिस्तानी वंशाचे होते. त्यामुळे या घटनेने पुनश्च ‘पाकिस्तानची पैदाईश’ जगासमोर आलीच. असो. या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया सरकार खडबडून जागे झाले असले, तरी मुस्लीम स्थलांतरितांविरोधात जोपर्यंत कडक पाऊले उचलली जात नाहीत, तोवर हे जिहादी हल्ले थांबणे नाही!
 
 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची