‘बॉर्डर 2’चा टीझर प्रदर्शित, क्षणातच गाठले लाखो व्ह्यूज; सोशल मीडियावर एकच चर्चा
16-Dec-2025
Total Views |
मुंबई : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘बॉर्डर 2’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या देशभक्तीपर चित्रपटाचा टीझर नुकताच १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला असून, रिलीज होताच त्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली आहे. सनी देओल, दिलजित दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांसारख्या कलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाच्या टीझरवर प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. तर टीझरला लाखो व्ह्यूजसुद्धा काहीच मिनिटांत आल्याचं पाहायला मिळत आहे.
टीझरची सुरुवातच “1971 चं भारत–पाकिस्तान युद्ध…” या शब्दांनी होते आणि क्षणातच वातावरण भारावून जातं. युद्धाचे सायरन, रणभूमीची दृश्यं आणि पार्श्वसंगीतासोबत सनी देओलचा पोलादी आवाज कानावर पडतो. “तुम जहां से भी घुसने की कोशिश करोगे… सामने एक हिंदुस्तानी फौजी खड़ा पाओगे… हिम्मत है तो आ, ये खड़ा है हिंदुस्तान,” हा संवाद ऐकताना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. या दमदार संवादांसोबतच वरुण धवन, दिलजित दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिकांची झलक पाहायला मिळते, ज्यामुळे चित्रपटातील तरुण सैनिकांची ताकद आणि जोश अधोरेखित होतो. टीझरमधील आणखी एका प्रभावी क्षणात सनी देओल सैन्याला विचारतो, “आवाज कहां तक जानी चाहिए?” आणि क्षणातच सैनिकांचा एकमुखी आवाज घुमतो — “लाहोरपर्यंत…”. हा संवाद आणि त्यामागील दृश्ये प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक तीव्र करतात.
एकूणच, युद्धाचे भव्य दृश्य, सशक्त पार्श्वसंगीत आणि सनी देओलचा दमदार आवाज यामुळे ‘बॉर्डर 2’चा टीझर प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या भारावून टाकतो. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर “देशभक्तीचा थरार परत आला”, “खरा सीक्वेल वाटतो” अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून, 2026 मध्ये येणाऱ्या या चित्रपटाबाबतची अपेक्षा आता अधिकच वाढली आहे. 23 जानेवारी 2026 ला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.