गेल्या काही भागांपासून आपण ‘क्रोध’ या धारणीय वेगाविषयी सविस्तर जाणून घेत आहोत. आजच्या लेखात क्रोधाच्या शरीरावर होणार्या विविध परिणामांचा सविस्तर ऊहापोह करुया.
क्रोध/अति संताप ही एक नकारात्मक भावना आहे. त्याचबरोबर त्याचा स्वभाव विद्ध्वंसक आहे. ही खूप तीव्र प्रखरतेची भावना असते, जिला नियंत्रण करणे, रोखणे कदाचित अशक्य होते. माणसाला अति क्रोध आला की तो संयम सोडून तीव्र प्रतिक्रिया देतो. या शाब्दिक/वाचिक किंवा शारीरिक असतात. या प्रतिक्रियांमुळे कलह, भांडण-तंटा ते पराकोटीचा द्वेष उत्पन्न होतो. रागाच्या भरात केली गेलेली टीका(कमेंट) ही एक ठिणगी असते, याने स्वतःला मानसिक त्रास तर होतोच, पण नात्यांमध्येही दुरावा व कटुता येते, वैर निर्माण होते, अहंकार दुखावला गेल्यामुळे शत्रुता, गैरसमज आणि नात्यांमध्ये ताटातूट होते. रागाच्या आवेगात मनुष्य स्वतःची ओळख बरेचदा विसरून जातो आणि एक वेगळाच मुखवटा लावतो.
हे सगळे टाळणे गरजेचे आहे. अति रागाने केवळ तात्पुरता त्रास (शारीरिक-मानसिक) होत नाही, तर दीर्घकालीन क्षति होऊ शकते. रागावर नियंत्रण मिळविण्याची सर्वांत पहिली पायरी म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःला समजणे, स्वतःच्या आवडी-निवडी, स्वभाव माहीत असणे, आपल्या मर्यादा-सीमा जाणून वागावे. कारण, राग दर वेळेस चिड-संतापामुळे नसतो. काही वेळेस इतर भावना त्याच्या खाली दडून असतात. जशी भीती, निराशा, दुःख या भावना लपविण्यासाठी रागाचा आवेग आणला जातो, दाखविला जातो. काही वेळेस क्षुल्लक कारणानेही राग येतो. जसे भूकेने व्याकूळ व्यक्तीला काम करण्यास/अभ्यास करण्यास सांगितले की, तो बेचैन होऊन त्रस्त होतो. अति उकाड्यात किंवा अति थंडीत, शारीरिक क्षमतेच्या, सहनशक्तीच्या पलीकडे सहन करायला लावले, तरी चिडचिड होते. थकून आल्यावर घरामध्ये सर्वत्र विस्कटलेल्या वस्तू बघून मनुष्य चिडचिड करू लागतो किंवा अशा जागी येणे टाळू लागतो. अर्धवट झोपेतून कर्कश्श गजराने किंवा भांडणाच्या उच्च स्वराने जर जाग आली, तर क्षणात तिडिक मस्तकात जाते. शाळकरी व महाविद्यालयीन वयोगटातील मुला-मुलींमध्ये चिडवा-चिडवी झाली, दिसण्यावरून, राहणीमानावरून संबोधले गेले, तर आधी वाईट वाटते. पण, असे वारंवार झाल्यास संताप येतो. तसेच सर्व एकत्र येऊन एखाद्या व्यक्तीचा समावेश करून घेतला नाही, तरीदेखील वाईट वाटते. पण, आतल्या आत चिडही येते. काही वेळेस गतकाळातील एखाद्या दुःखद स्मृतीशी निगडित वस्तू सापडल्यावरही असेच मन आधी खिन्न होते आणि निराशेतून राग उत्पन्न होतो. विशिष्ट दृष्ट, चव, वासानेही रागाची भावना उत्पन्न होते. भूतकाळातील एखाद्या व्यक्ती, परिस्थितीशी जर ते जोडले असल्यास त्याची तीव्रता अधिक असू शकते. काही वेळेस शारीरिक आजारांनी त्रस्त व्यक्ती हताश होऊन इतरांना घालून-पाडून बोलते, राग-राग करते. पण, यामागेदेखील दडलेली भावना राग नसून असाहाय्यतेची भावना ही आहे.
रागाच्या विविध रंगछटा आहेत. काही शारीरिक कारणे, काही मानसिक-भावनिक, काही वेळेस नात्यांमधील ताण तर इतर वेळेस आर्थिक अडचणींमुळेदेखील भय, Desporation, anxiety, restlessness इ. चंचल स्वभावाचे भाव उत्पन्न होतात, ज्यांचे पुढे जाऊन रागात रुपांतर होते.
रागीट व्यक्तीला ‘तू रागाविणे सोड’/‘रागवत जाऊ नकोस’ एवढा सल्ला देऊन पुरेसे होत नाही. त्या व्यक्तीलाही कळत असते, जाणवत असते की आपली रागाच्या भरातील प्रतिक्रिया चुकीची आहे. पण, त्यावर नियंत्रण कसं मिळवावं, हे कळत नसते. तर आपण आज त्यावरील विविध उपाय/युक्त्या आजच्या लेखातून बघूया.
संतापापासून शांततेपर्यंत पोहोचणे हा एक प्रवास आहे. ज्यात खूप टप्पे आहेत. संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी तो आतल्या आत तेवत असतो. ज्वालामुखी जसा आधी आतल्या आत वाढतो आणि मग योग्य काळी स्फोट होतो. तसेच, क्रोधाच्या बाबतीतही घडते. ती व्यक्ती आधी आतल्या आत चिडते, भावनांमध्ये पटकन बदल घडतो आणि मग ते अनावर झाले की त्याचा स्फोट होतो. बाचाबाची होते, आरडा-ओरडा होतो, तोडफोड होते, मारझोड होते किंवा अजून विद्ध्वंसक स्वरूप गाठले जाते. हे होत असताना चढा स्वर होणे, शिवीगाळ करणे, उलटसुलट बोलणे, तावातावाने भांडणे, छातीत धडधड वाढणे, घसा कोरडा पडणे, हाताच्या मुठी वळलेल्या असणे, डोळ्यांसमोर व्यक्ती न दिसता त्याने केलेली कृती दिसते व लाल रंग डोळ्यांपुढे दिसल्या समान होते, दात-ओठ खाणे, रक्तचाप वाढणे, अस्वस्थ, बैचेन होणे व त्यामुळे येर-झारे घालणे, चेहर्यांवरचे भाव आक्राळ-विक्राळ होणे, घाम फुटणे व श्वसनाची गति जलद होणे इ. बदल त्या मनुष्यात घडतात.
हृदयाची गतिदेखील वाढते. डोळे विस्फारलेले, कानशिलं गरम क्वचित प्रसंगी रागाच्या भरात आक्रोश किंवा रडू फूटणे हेदेखील घडते. या सगळ्याचा परिणाम शरीरातील विविध अवयवांवर होतो. पोटाची व आतड्यांची गति वाढून मळमळ होणे, उल्टी होणे, पोटात मुरडा मारून जुलाब होणे इ. लक्षणे उत्पन्न होतात. तापासारखे वाटणे, अति घाम येणे, पचन मंदाविणे डोकं जड-डोकेदुखी सुरू होणे. श्वसन गति वाढते व श्वसन उथळ होते. यामुळे धाप लागल्यासारखी वाटू लागते. अशा वेळेस तर्कशुद्ध विचार (रॅशनल थिंकिंग) होऊ शकत नाही व चुकीचे निर्णय घेऊन त्यानुसार वागले जाते (ज्याचा बरेचदा नंतर पश्चाताप होतो) रागामध्ये अंग तापू लागते व तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम अति प्रमाणात येतो. पचनशक्ती मंदावते. अजीर्ण मळमळ इ. लक्षणे उत्पन्न होतात. श्वसन-हृदय इ.ची गति वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, त्यांच्या मायग्रेनचे प्रमाण वाढते. (तीव्रता व प्रमाण म्हणजेच, इन्टेन्सिटी अॅण्ड फ्रीक्वेन्सी) डोळे जड होणे, थायरॉईडचे कार्य मंदावणे व वारंवार राग येणार्या व्यक्तींचे हाडांमधील ठिसूळताही लवकर निर्माण होते. जसे रक्तचाप वाढते, तसेच रक्तातील शर्करा (ब्लड, ग्लुकोज) देखील वाढते. या सगळ्या लक्षणांच्या उत्पत्तीचे वारंवार अति संताप हे कारण आहे.
अन्य कारणांनीदेखील वरील लक्षणे उत्पन्न होतात. पण, जेव्हा चिकित्सा करायची वेळ येते, तेव्हा त्या रोगाचे मूळ कारण शोधून, त्यावर मात करून चिकित्सा केल्यास, त्या रोगापासून कायमस्वरूपी सुटका मिळणे शक्य होते; रोगमुक्त होता येते. केवळ लाक्षणिक चिकित्सा केल्यास (म्हणजे डोकेदुखीवर केवळ डोकेदुखी थांबविणे इतकाच उपचार केला,) तर तो दरवेळेसच पुरेसा होईल, असे नसते. त्या लक्षणासाठीचे अंडरलाईंग कॉज शोधून त्यावर चिकित्सा, उपाय करणे महत्त्वाचे आहे.
अति राग ज्यांना येतो, त्यांनी राग आल्यावर त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडा आधी विचार करावा. चिंतन-मनन करावे. असे का घडते, असा मी का वागतो/वागते, याबद्दल थोडे आत्मचिंतन करावे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या सवयी व काही वाईट सवयी असतात. चांगल्या गुणांनी अवगुणांवर मात करता येणे, हे गरजेचे आहे. इतरांनी चुका केल्यावर, त्यांच्या अॅक्शन्सवर रिअॅट होऊन स्वतःला त्रास करून घेणे जेवढे टाळता येईल, तेवढे चांगले. यासाठी स्वतःशी संवाद, स्वतःची ओळख, स्वतःचे सकारात्मक गुण आणि मर्यादा तसेच सीमा जाणून घेणे व त्यानुसार वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इतरांना सुधारायला जाण्यापेक्षा स्वतःमध्ये स्थिरता सकारात्मकता उत्पन्न करणे खूप महत्त्वाचे आहे.
- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)