जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला ‘हिमालया’ एवढा मोलाचा सल्ला

    16-Dec-2025
Total Views |

मुंबई : प्रा. वसंत कानेटकरांच्या लेखणीतून साकारलेले आणि मराठी रंगभूमीवर अजरामर ठरलेले ‘हिमालयाची सावली’ पुन्हा एकदा नव्या दमाने प्रेक्षकांसमोर येत आहे. राजेश देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली मोरया भूमिका आणि अथर्व निर्मित या नाटकाने रंगभूमीवर पुनरागमन करताना आजच्या तरुण पीढीशी संवाद साधला. यातील महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई दिसणार आहेत. पोंक्षे यांनी या नाटकाच्या आशयावर भाष्य करताना, आजच्या तरुण पिढीसाठी ‘हिमालयाची सावली’ किती समर्पक आणि आवश्यक आहे, हे मनमोकळेपणाने अधोरेखित केले आहे. नाटकात विघ्नेश जोशी, जयंत घाटे, सृजन देशपांडे, प्राची रिंगे, सोनाली राजे, चैतन्य राव, ओंकार कर्वे आणि विजय मिरगे या कलाकारांची सशक्त फळी असून, प्रत्येक व्यक्तिरेखा कथेला नवे आयाम देते. सशक्त विषय, अभिनय आणि संवेदनशील मांडणी यांमुळे ‘हिमालयाची सावली’ हे नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाले आहे.

नानासाहेब आणि त्यांच्या सावलीची वेदना

शरद पोंक्षे या नाटकात 'नानासाहेब' ही भूमिका साकारत आहेत, जे आपल्या जीवनात समाजकार्याला सर्वोच्च स्थान देतात. ते सांगतात, "आज आपण आजूबाजूला जे समाजकारण आणि राजकारण पाहतो त्यात नानासाहेब हे समाजकारण करणारे आहेत." पोंक्षे यांच्या मते, हे नाटक नानासाहेबांचे नसून, त्यांच्या 'सावली'चे आहे. ते एका अत्यंत महत्त्वाच्या सत्याकडे लक्ष वेधतात: "आयुष्यात बायका-मुलांचा तरी संसार करता येतो किंवा समाजाचा तरी प्रपंच करता येतो. या दोघांची मोट बांधू पाहणारे दोन्हीकडे पराभूतच होतात."

ते पुढे म्हणतात, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज, मोहनदास करमचंद गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी कर्वे यांसारखे अनेक 'हिमालय' होऊन गेले. त्यांच्या पत्नींच्या, म्हणजेच त्यांच्या 'सावल्यांच्या' वाट्याला जे भयानक आयुष्य आले, ते हे नाटक दर्शवते. "म्हणायला मोठ्या माणसाची बायको, पण सुख कितीसं पदरात पडलं? पण ही माणसं कधी एकाची नव्हतीच. ते समाजाचेच होते." हे नाटक त्याच सावलीची गोष्ट सांगते.

शृजा प्रभूदेसाई यांचे महत्त्वपूर्ण योगदान

नाटकातील नानासाहेबांच्या 'सावली'ची भूमिका अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई यांनी साकारली आहे. अनेक वर्षे आपल्या पतीच्या ध्येयासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणाऱ्या पत्नीची भूमिका त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने उभी केली आहे. नानासाहेबांच्या महानतेमागे असलेल्या त्यांच्या निस्वार्थी त्यागाला शृजा प्रभूदेसाई यांनी भावनिक अभिनयाने न्याय दिला आहे.

भव्यता, शिकवण आणि आवाहन

'हिमालयाची सावली' हे नाटक केवळ मनोरंजन नाही, तर ते 'खऱ्या आयुष्यात हिमालय व्हायला शिकवणारं' आहे. शरद पोंक्षे तरुण पिढीला उद्देशून सांगतात की, "भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते होत असताना, आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणाशी आणि कामाशी किती प्रामाणिक रहावं, किती बांधिलकी पाळावी, हे शिकवतं."

दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी १९१० सालचे हे नाटक अत्यंत उत्तम पद्धतीने बसवले आहे. तेव्हाची मराठी भाषा, लोकांचे बोलणे आणि राहणीमान, तसेच तेव्हाचा पेहराव हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, यावेळी शरद पोंक्षे नाट्य रसिकांना कळकळीची विनंती करतात की "हिमालयाची सावलीसारखी जी नाटकं असतात ती अत्यंत खर्चीक नाटकं असतात. सध्याची जी ५-६ पात्रांची नाटकं येतात त्यांच्या दोन प्रयोगांचा खर्च म्हणजे हिमालयाची सावली नाटकाच्या एका प्रयोगाचा खर्च आहे."

अशा दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांचा आशीर्वाद लाभणे फार आवश्यक आहे. नाटक कसं असतं, नाटक म्हणजे काय, कसं लिखाण, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय असावा हे सगळं पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर 'हिमालयाची सावली' नाटक पाहायलाच हवं.