‘एमआयएम’चे मनसुबे

    16-Dec-2025
Total Views |
Nashik Municipal Elections
 
नगर परिषद निवडणुकांचा धुरळा खाली बसतो न बसतो; तोच महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, आपले बळ जोखण्यास पदाधिकारी सज्ज झाले आहेत. या रणधुमाळीत नाशिकची महापालिका निवडणूक लढण्याचे ‘एमएमआय’ या धर्मांध राजकीय पक्षाने सूतोवाच केले आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत. वरवर पाहता, ‘एमआयएम’चा निवडणूक लढण्याचा हा निर्णय राजकीय वाटत असला, तरी त्यामुळे शांत आणि धार्मिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील राजकीय आणि धार्मिक वातावरण काहीसे गढूळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे मुख्य कारण, म्हणजे, नाशिकमध्ये बिलकूल जनाधार नसलेला हा पक्ष आपले लक्ष वेधून घेण्यासाठी नक्कीच उचापती करणार.
 
त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जाईल. परिणामी, इतर शहरांप्रमाणेच नाशिक धुमसत ठेवण्याचाही प्रयत्न केला जाईल. त्यात हवाबाजीसाठी प्रसिद्ध असलेले ‘एमआयएम’चे नेते इम्तियाज जलील यांनी सत्ताधार्‍यांना त्यांच्या जागा दाखवणार असल्याचे नाशकात वक्तव्य केले. यातून फक्त भारतीय जनता पक्षालाच विरोध करण्यासाठी ‘एमआयएम’ नाशिकमध्ये येत असल्याचे जलील यांच्या वक्तव्यावरून कोणाच्याही लक्षात येईल. मुळात ‘एमआयएम’ला नाशिकमध्ये अगदीच नगण्य जनाधार. त्यातही जुन्या नाशिकमधील काही भाग सोडला, तर इतर ठिकाणी त्यांच्या सभांना गर्दी होईल की नाही, याचीही भ्रांत. तरीही हवेत वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न जलील यांच्याकडून सुरू आहे. नुकतीच त्यांची शहरातील चौक मंडई येथील वाकडी बारव येथे सभा पार पडली. यामध्ये त्यांनी सरकारने मुस्लिमांना मिळणारे ‘हज’चे अनुदान बंद केले. मात्र, त्या मोबदल्यात एकही चांगल्या दर्जाची शाळा, महाविद्यालय किंवा रुग्णालय कुठल्याही जिल्ह्यात अल्पसंख्याकबहुल भागात उभारले नाही, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. यावरूनच ‘एमआयएम’चे मनसुबे लक्षात घ्यायला हवे.
एकास दहा उमेदवार
 
राज्य निवडणूक आयोगाकडून कालच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, नाशिक महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. त्या अनुषंगाने शहरात राजकीय रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असून, निवडणूक लढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. जवळपास ९६९ जणांनी भाजपकडे उमेदवारी मागितली असून, जवळपास एका जागेसाठी दहा जणांनी अर्ज केले आहेत. यावरून नाशिकमध्ये भाजपची ‘क्रेझ’ लक्षात येईल. याउलट, विरोधी पक्षांच्या गोटात मात्र स्मशान शांतता असल्याचे दिसून येत आहे. कधी एकदा भाजप उमेदवार घोषित करतो आणि नाराजांना गळाला लावून उमेदवारी देण्याचा केविलवाणा प्रयत्न पुढील काळात नाशिकमध्ये दिसून येईल. यामध्ये उबाठा गट सर्वात पुढे असेल.
 
कारण, एकनाथ शिंदे यांनी उबाठा गट पूर्ण रिकामा केल्याने त्यांच्याकडे निवडणुकीत तग धरतील, असे उमेदवारच नाहीत. त्यामुळे महायुतीमधील नाराजांवरच त्यांची मदार. एवढे करूनही प्रत्यक्षात किती उमेदवार निवडून येतील, हे सांगणे सध्यातरी अशक्य, तर इकडे भाजपकडे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचा सुकाळ आहे. त्यामुळे प्रबळ उमेदवाराची निवड करण्यासाठी परवापासून पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक ‘२०’, ‘२९’ आणि ‘१२’ मध्ये सर्वाधिक; तर ‘७’, ‘१९’ आणि ‘२२’ मध्ये सर्वात कमी इच्छुकांची संख्या आहे. एकूण १२२ जागांसाठी मुलाखतीची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी पक्षाची कोअर कमिटी ठाण मांडून बसली असून, निवडून येणार्‍या उमेदवाराची निवड करण्यात येत आहे. पक्षांतर्गत शिस्त, पारदर्शकता आणि संघटनात्मक निकषांच्या आधारेच उमेदवारांची निवड होईल, असे नाशिक भाजप महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला ‘१०० प्लस’चा नारा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असून, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी चांगलेच प्रयत्न सुरू आहेत.
 
- विराम गांगुर्डे