PM Narendra Modi : जॉर्डन दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींना खास सन्मान: मोदींची गाडी जॉर्डनच्या क्राऊन प्रिन्सने स्वतः चालवली

    16-Dec-2025   
Total Views |
 

मुंबई : (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी जॉर्डनमधील अम्मानमध्ये जॉर्डन संग्रहालयापर्यंत त्यांना क्राऊन प्रिन्स अल-हुसैन बिन अब्दुल्ला द्वितीय यांनी स्वतः गाडी चालवून नेले. पंतप्रधान मोदींनी या क्षणाचे फोटो X वर शेअर केले. हा पंतप्रधान मोदींचा जॉर्डनमधील पहिला संपूर्ण द्विपक्षीय दौरा असून मागील ३७ वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांचा असा दौरा झाला आहे. हा दौरा भारत-जॉर्डन राजनैतिक संबंधांच्या ७५ व्या वर्षानिमित्त साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ डिसेंबर रोजी अम्मानमध्ये दाखल झाले होते. जॉर्डनचे पंतप्रधान डॉ. जाफर हसन यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. यामुळे दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध अधोरेखित झाले आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये पॅलेस्टाईनकडे जात असताना पंतप्रधान मोदी यांनी जॉर्डनला भेट दिली होती.
 
दहशतवादाविरुद्ध जॉर्डनचा भारताला पाठिंबा
 
पंतप्रधान मोदी आणि किंग अब्दुल्ला द्वितीय यांनी यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, अक्षय ऊर्जा, खत, कृषी, नवोन्मेष, डिजिटल तंत्रज्ञान, महत्त्वाच्या खनिजे, पायाभूत सुविधा, आरोग्य, औषधनिर्मिती, शिक्षण, पर्यटन, संस्कृती आणि जनसंपर्क यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आणि जॉर्डनच्या डिजिटल पेमेंट प्रणालीसह भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मध्ये सहकार्य सुचवले. दोन्ही नेत्यांनी दहशतवादाविरोधात सामायिक बांधिलकीची पुष्टी केली आणि दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा तीव्र निषेध केला. क्षेत्रीय घडामोडी आणि जागतिक प्रश्नांवर चर्चा करत शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याची गरज अधोरेखित केली.
 
भारत-जॉर्डन संबंध आणि व्यापार
 
भारत आणि जॉर्डनचे राजनैतिक संबंध १९५० ला प्रस्थापित झाल्यापसून उबदार आणि स्थिर संबंध राहिले आहेत. ज्यामध्ये राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्य समाविष्ट आहे. भारत जॉर्डनचा एक महत्त्वाचा व्यापार भागीदार असून, २०२३–२४ मध्ये द्विपक्षीय व्यापार २.८७५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला होता. खते, विशेषतः फॉस्फेट आणि पोटॅश, हे सहकार्याचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे, जॉर्डन हा भारताचा एक महत्त्वाचा पुरवठादार आहे आणि दोन्ही देशांमधील कंपन्यांमध्ये अनेक संयुक्त उपक्रम कार्यरत आहेत.
 
महत्त्वाचे करार
 
भारत आणि जॉर्डन यांच्यात एकूण पाच करारांवर सहमती झाली आहे. या करारांमध्ये संस्कृती, अक्षय व स्वच्छ ऊर्जा, जलसंपत्ती व्यवस्थापन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि ऐतिहासिक वारसा संरक्षण यांचा समावेश आहे. दोन्ही देशांनी सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांमध्ये संयुक्त प्रयत्न करणे आणि जलव्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक सेवांमध्ये भागीदारी पुढे नेण्यावरही सहमती झाली. याशिवाय, जॉर्डनमधील पेट्रा आणि भारतातील वेरूळ लेणी यांच्यात ‘ट्विनिंग’ करार करण्यात आला असून, यामुळे वारसा संवर्धन, पर्यटन आणि सांस्कृतिक सहकार्याला चालना मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींनी भारत-जॉर्डन बिझनेस फोरमला संबोधित करताना सांगितले, “किंग अब्दुल्ला द्वितीय आणि क्राऊन प्रिन्स अल-हुसैन यांची उपस्थिती कार्यक्रमाला अधिक विशेष बनवते. भारत आणि जॉर्डन व्यापार, व्यवसाय व गुंतवणुकीत सहकार्य वाढवू शकतात अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले.” पंतप्रधान मोदी यांनी भारत–जॉर्डन बिझनेस फोरमला देखील संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर पोस्ट करत म्हटले “किंग अब्दुल्ला द्वितीय आणि क्राऊन प्रिन्स अल-हुसैन बिन अब्दुल्ला द्वितीय यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिक विशेष बनला. त्यांनी भारत आणि जॉर्डन व्यापार, व्यवसाय आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्यासाठी शक्य असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले.”


पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यासाठी इथिओपियाकडे रवाना झाले. त्यावेळी विमानात चढताना क्राऊन प्रिन्स अल-हुसैन यांनी पंतप्रधान मोदींची गळाभेट घेत निरोप दिला.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.