सुदृढ आरोग्यासाठी गरज भरणपोषणाची !

    16-Dec-2025
Total Views |
 
India’s Nutrition
 
भारत आज एका गंभीर, पण दुर्लक्षित आरोग्यविषयक विरोधाभासाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एका बाजूला अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरतेकडे आपली वाटचाल सुरू असताना, दुसर्‍या बाजूला कुपोषण, पोषक घटकांची कमतरता आणि उपासमार अजूनही समाजाच्या मोठ्या घटकाला ग्रासून आहेत. त्याच वेळी शहरी आणि निमशहरी भागांत लठ्ठपणाचे प्रमाणही वेगाने वाढत असून, त्यातून उद्भवणारे आजार आरोग्यव्यवस्थेवर दीर्घकालीन ताण निर्माण करत आहेत. ही परिस्थिती केवळ आहाराची समस्या नसून, बदलत्या जीवनशैलीचा, सामाजिक असमतोलाचा आणि अपुर्‍या पोषणजाणिवेचा परिणाम आहे.
 
गेल्या काही वर्षांत भारतात लठ्ठपणा हा एक ‘जीवनशैलीजन्य आजार’ म्हणून उदयास आला आहे. उच्च कॅलरी असलेले, पण पोषणमूल्य कमी असलेले प्रक्रिया केलेले अन्न, बसून काम करण्याची वाढती प्रवृत्ती, व्यायामाचा अभाव आणि मानसिक तणाव यांचा थेट परिणाम शरीराच्या चयापचयावर होत आहे. लठ्ठपणा म्हणजे केवळ वजन वाढणे नव्हे; तर शरीरातील चरबीच्या पेशींमध्ये होणार्‍या जैविक बदलांची साखळी आहे. या बदलांमुळे इन्सुलिन-प्रतिरोधकता वाढते आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, फॅटी लिव्हर यांसारखे आजार हळूहळू शरीरात स्थिरावतात. या आजारांचा उगम अनेकदा तरुण वयातच होतो, पण त्याची जाणीव मात्र उशिराने होते.
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर वजन कमी करण्याच्या नावाखाली वाढत चाललेली ‘डाएट संस्कृती’ ही आणखीच एक चिंतेची बाब ठरताना दिसते. झपाट्याने वजन कमी करण्याच्या अपेक्षेने अनेकजण अतिशय कमी कॅलरीचा आहार घेतात किंवा उपासमारीसारख्या टोकाच्या पद्धती अवलंबताना दिसतात. वैद्यकीयदृष्ट्या हे अत्यंत घातक असल्याचे अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. शरीराला दीर्घ काळ पुरेसे अन्न न मिळाल्यास चयापचय प्रक्रिया मंदावते, स्नायूंची झीज होते आणि आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजांची शरीरात कमतरताही निर्माण होते. परिणामी थकवा, चक्कर येणे, केस गळणे, हाडे ठिसूळ होणे, हार्मोन्सचे असंतुलन आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे असे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. विशेषतः तरुणींमध्ये अशा उपासमारीमुळे निर्माण होणार्‍या समस्या अधिक गुंतागुंतीच्या ठरतात.
 
एकीकडे ही समस्या असताना दुसरीकडे मात्र देशातील मोठ्या लोकसंख्येला अजूनही पुरेसे पोषण मिळत नसल्याची वस्तुस्थिती बदललेली नाही. पोट भरणारे पण पोषणमूल्य कमी असलेले अन्न, प्रथिने आणि सूक्ष्मपोषक घटकांची कमतरता, ही छुप्या उपासमारीलाच चालना देतात. याचे परिणाम विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांमध्ये गंभीर स्वरूपाचे दिसतात. वाढ खुंटणे, रक्तक्षय, वारंवार आजारी पडणे आणि शिकण्याच्या क्षमतेवर होणारा परिणाम हे त्याचे थेट वैद्यकीय परिणाम आहेत. त्यामुळे पोट भरण्याबरोबरच भरणपोषण करणारा आहार घेण्याकडेच प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.
 
या दोन्ही टोकांच्या समस्यांचा मुळाशी विचार केला असता, चुकीचा आहारदृष्टिकोन आणि पोषणविषयक अपुरी जाणीव हे एक समान कारण दिसून येते. लठ्ठपणा आणि उपासमार या परस्परविरोधी वाटणार्‍या समस्या, प्रत्यक्षात एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे त्यावर उपायही समान आणि वैज्ञानिक असणे आवश्यक आहे. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अतिरेकी डाएटऐवजी, संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाल हेच प्रभावी औषध ठरणार आहे. धान्यांसोबत प्रथिनेयुक्त पदार्थ, ताज्या भाज्या, फळे, दूध-दुग्धजन्य पदार्थ आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असलेला आहार शरीराच्या गरजांशी सुसंगत ठरतो. शेवटी, आरोग्य म्हणजे केवळ वजनकाट्यावर दिसणारे वजन नसून, शरीराची कार्यक्षमता, रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक तंदुरुस्ती यांचा एकत्रित परिपाक आहे. लठ्ठपणा आणि उपासमार या दोन्हींचे धोके ओळखून, संतुलित जीवनशैली स्वीकारणे हीच आजच्या भारताची खरी सुदृढ आरोग्यासाठीची योग्य दिशा ठरू शकते.