भाजपची ‘नबीन’ सुरुवात!

    16-Dec-2025
Total Views |
 
Nitín Nabin
 
४५ वर्षीय नितीन नबीन यांच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरील नियुक्तीने भाजपने अनेक कथित राजकीय जाणकार आणि विरोधी पक्षांचे अंदाज साफ धुळीत मिळविले. तसेच नबीन यांच्या नियुक्तीने पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना नवी उमेद आणि विश्वास मिळाला आहे, हे निश्चित!
 
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबद्दलची उत्सुकता अचानक संपुष्टात येऊन त्याची जागा विस्मयाने घेतली आहे. बिहारचे रस्ते बांधकाममंत्री व पाच वेळचे आमदार नितीन नबीन यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा रविवारी संध्याकाळी करण्यात आली. बर्‍याच लोकांनी त्यांचे नाव प्रथमच ऐकले असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला. मुख्यमंत्री असो की, आता पक्षाचे अध्यक्षपद; अशा पदांवर अनपेक्षित व्यक्तीची नियुक्ती करण्याची भाजपची ही सवय आता त्याचे व्यवच्छेदक लक्षणच बनले आहे. बहुसंख्य जनतेला असे नाव अनपेक्षित वा ओळखीचे वाटत नसले, तरी त्या व्यक्तीने पक्षासाठी केलेल्या कार्याची आणि त्याच्या क्षमतेची पूर्ण कल्पना पक्ष नेतृत्वाला असते.
 
किंबहुना, पक्षासाठी निरलसपणे मात्र पूर्ण जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करणार्‍या सर्वच कार्यकर्त्यांचा सन्मानच अशा निर्णयाने करण्याचे भाजपचे हे धोरण निश्चितच स्वागतार्ह आहे. नितीन नबीन हे बिहार भाजपमधील एक प्रमुख नेते आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे बिहारमध्ये भाजपच्या विस्तारालाही फायदा होईल. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील राजकीय रणनीतीच्या दृष्टीनेही हा निर्णय तितकाच महत्त्वाचा ठरावा. तसेच नितीन नबीन यांच्या माध्यमातून आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठीही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. कारण, नितीन नबीन यांना सत्ता आणि संघटना दोन्हीचा अनुभव आहे. त्यांनी कठोर परिश्रम आणि क्षमतेने आपले स्थान निर्माण केले आहे. नबीन हे भाजपच्या तिसर्‍या पिढीतील नेते असून, स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा नबीन हे ६८ वर्षांचे असतील. त्यांचे सहकारीही सुमारे याच वयाच्या आसपास असतील. म्हणजे तेव्हाही भाजपकडे तुलनेने तरुण नेत्यांची फळी असेल.
 
कोणत्याही पक्षाला काही काळानंतर नव्या नेत्यांची गरज भासतेच. प्रस्थापित नेता जेव्हा काम करण्यास असमर्थ होतो, त्यानंतर नव्या पर्यायाचा शोध घेणे हे कोणत्याही पक्षासाठी क्रमप्राप्तच. त्यासाठी नव्या नेतृत्वाची फळी हाताशी असणे केव्हाही चांगलेच. पण, हे सर्वच पक्षांमध्ये घडत नाही. कारण, भाजप सोडल्यास बहुतेक सर्व पक्ष हे घराणेशाहीवादी पक्ष. त्यामुळे त्यांचे नेतृत्व एकाच घराण्यात कायम राहील, हे स्पष्ट आहे. अशा पक्षांमध्ये कार्यकर्त्याची काम करण्याची क्षमता आणि त्याचा प्रामाणिकपणा यांना दुय्यम महत्त्व मिळते. नेत्याची मर्जी जो सांभाळेल, त्याची पक्षात भरभराट होते. घराणेशाही पक्षात केवळ ‘होयबा’ व्यक्तीच चालते, हे मल्लिकार्जुन खर्गे यांनी दाखवून दिले आहे. बहुतेक पक्षांनी काँग्रेसचीच परंपरा चालविली. परिणामी, या पक्षांची वाढ खुंटली आणि त्यांचा पाया आक्रसत गेला. उलट, भाजपसारख्या पक्षात पुढील काही दशकांचा विचार करून नवे नेते घडविले जातात. दिवंगत सुषमा स्वराज, अरुण जेटली, देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे वगैरे अनेक नेते हे विद्यार्थीदशेपासून पक्षात सक्रिय राहिले होते. त्यामुळे भाजपमध्ये घराणेशाही नव्हे, तर गुणवत्ता हीच महत्त्वाची असल्याचेही नबीन यांच्या नियुक्तीनेही अधोरेखित केले आहे. खर्‍या समर्पणाने आणि प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणार्‍या व्यक्तीलाही भाजप अध्यक्ष म्हणून सन्मानित केले जाऊ शकते, हेच भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केले.
 
नितीन नबीन यांची जडणघडण संघ आणि भाजपच्या विचारसरणीतील. नितीन यांचे वडील नबीन किशोर सिन्हा जनसंघातून भाजपमध्ये सामील झाले. ते पाटण्यातून सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. वडिलांच्या निधनानंतर नितीन यांनी वडिलांचा वारसा हाती घेतला, परंतु कधीही घराणेशाहीचा कलंक लागू दिला नाही. नितीन नबीन यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ‘अभाविप’मधून केली आणि नंतर ते भाजप युवा मोर्चात सामील झाले. आज नबीन यांच्या नियुक्तीमुळे पक्षात ‘जनरेशन नेस्ट’चे युग सुरू झाले आहे. नबीन हे तरुण, आक्रमक नेते असून त्यांना नवीन पिढीची भाषा समजते. एकूणच नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याचे भाजपचे हे दीर्घकालीन धोरण असून, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री नेमतानाही पक्षाने नव्या फळीतील कार्यकर्त्यांना मोठी संधी दिली होती.
 
मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक झाल्यावर भाजपच्या सर्व नवनियुक्त आमदारांचा समूह फोटो काढण्यात आला, तेव्हा मोहन यादव हे त्यात मागे तिसर्‍या रांगेत उभे होते. तरीही, त्यांच्यासारख्या तरुण आणि चाकोरीबाहेरील व्यक्तीची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करून भाजपने वेगळेच संकेत दिले. असेच निर्णय राजस्थान, ओडिशा, हरियाणा आणि छत्तीसगढच्या मुख्यमंत्रिपदावर नियुक्ती करताना घेण्यात आले. त्याची सुरुवात गुजरातपासूनच झाली होती. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दीड वर्षे आधी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अचानक राजीनामा घेण्यात आला आणि त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. भूपेंद्र हे पटेल समाजातील होते, हे एक कारण तर होतेच. पण, ते तेव्हा पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. तरीही, त्यांची मुख्यमंत्रिपदावर नियुक्ती करून भाजपने सर्वांना धक्का दिला.
 
तेव्हा पटेल यांच्या मंत्रिमंडळातही अनेक नवे चेहरे दिसले होते. इतकेच कशाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाली, तोपर्यंत स्वत: मोदी यांनी कोणतीही निवडणूक लढविली नव्हती वा कोणत्याही सरकारी पदावर ते नव्हते. तोपर्यंत त्यांनी पक्षसंघटनेतच काम केले होते. तरीही, पक्षाने त्यांची कोणतीही जबाबदारी तडीस नेण्याची आणि प्रामाणिकपणे काम करीत राहण्याची वृत्ती अचूक हेरली. मोदी यांनीही आपल्यावरील हा विश्वास सार्थ ठरविला. इतकेच नव्हे, तर पंतप्रधानपदाची जबाबदारीही त्यांनी ज्या ताकदीने पेलली आहे, त्यावरून त्यांनी एक अपवादात्मक उदाहरण जगापुढे सादर केले.
 
मोदी गेली सुमारे २५ वर्षे सलग मुख्यमंत्री वा पंतप्रधान पदावर आहेत. पण, या काळात त्यांनी एक दिवसही सुटी घेतलेली नाही.
त्यामुळे पक्षाचे काम किंवा दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने पार पाडणे हे भाजपमध्ये नेतेपदाचे निकष आहेत. कार्यकर्त्यावर नेतेपदाची जबाबदारी सोपविण्यापूर्वी त्याने कसलीही अपेक्षा न बाळगता पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडलेली असली पाहिजे, ही पहिली कसोटी असावी. नितीन नबीन यांनी आजवर कसलाही गाजावाजा न करता, त्यांच्यावर सोपविलेल्या सर्व जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. भाजपने नितीन नबीन यांना छत्तीसगढचे प्रभारी म्हणून नियुक्त करून एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. तिथेही त्यांनी विशेषतः बूथ-स्तरीय व्यवस्थापन, संघटनात्मक विस्तार आणि निवडणूक समन्वय यावर लक्ष केंद्रित केले. परिणामी, पक्षाने छत्तीसगढमध्ये मोठा आणि निर्णायक विजय मिळवला. २०१८ मध्ये झालेल्या पराभवानंतर, राज्य नेतृत्वाच्या तळागाळात वर्षानुवर्षे सहभागाच्या अभावामुळे भाजप कार्यकर्ते निराश झाले. त्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्षांना विश्वासात घेतले आणि ‘मोर आवास, मोर अधिकार’ मोहीम राबविली, जी काँग्रेस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख योजनेपासून वंचित ठेवलेल्या सुमारे १.८ दशलक्ष कुटुंबांपर्यंत पोहोचली.
 
भूपेश बघेल यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाला प्रतिसाद म्हणून त्यांनी मनसुख मांडविया यांच्यासोबत ‘महतारी वंदन योजने’ची संकल्पना मांडली. ही मोहीम छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वाचा टप्पा ठरली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला छत्तीसगढमध्ये बळकटी देण्यासाठीही त्यांनी दौरे सुरू ठेवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे छत्तीसगढमध्ये भाजपचा १०-१ असा दणदणीत विजय झाला. अशाप्रकारे कार्यकर्ते आणि प्रशासकीय व्यवस्था यांना सांभाळून आपले काम करवून घेण्याची हातोटी नबीन यांच्याकडे आहे, हे पक्षाने अचूक हेरले आणि म्हणूनच सत्तारूढ पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
 
विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारण्यापूर्वी काही महिने अमित शाह यांच्या हाताखाली कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. आताही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी पूर्णांशाने स्वीकारण्यापूर्वी नितीन नबीन हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. आज जरी त्यांचे नाव बहुसंख्य भारतीयांसाठी अनोळखी असले, तरी कुणी सांगावे, त्यांच्या कार्यामुळे एक दिवस त्यांचे नावदेखील अमित शाह यांच्यासारखे सर्वतोमुखी होईलही! नितीन नबीन यांचे पुनश्च अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा!