_202512161844310955_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई : (West Bengal SIR) निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (West Bengal SIR) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पश्चिम बंगालची २०२६ ची प्रारूप मतदार यादी मंगळवारी जाहीर केली. या प्रक्रियेमुळे राज्यातील ५८.२० लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असून, त्यामुळे मतदारसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण (West Bengal SIR) पूर्वी ७ कोटी ६६ लाख ३७ हजार ५२९ असलेली मतदारसंख्या आता ७ कोटी ०८ लाख १६ हजार ६३१ वर आली आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मृत्यू, कायमचे स्थलांतर, नोंदणीकृत पत्त्यावर मतदार न सापडणे, एकापेक्षा अधिक मतदारसंघात नोंदणी आणि गणना फॉर्म न सादर करणे ही प्रमुख कारणे आहेत. आयोगाने वगळलेल्या मतदारांची कारणांसह सविस्तर, बूथनिहाय यादी मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) पश्चिम बंगाल यांच्या अधिकृत संकेतस्थळावर, निवडणूक आयोगाच्या मतदार पोर्टलवर तसेच ईसीआयनेट (ECINET) अॅपवर देखिल प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आकडेवारीनुसार, २४.१६ लाख मतदार मृत असल्याचे आढळले आहेत. जवळपास १९.८८ लाख मतदारांनी कायमचे स्थलांतर केले आहे, तर १२.२० लाख मतदार नोंदणीकृत पत्त्यावर सापडले नाहीत. याशिवाय, १.३८ लाख डुप्लिकेट नावे आणि १.८३ लाख तथाकथित ‘बोगस’ मतदार ओळखण्यात आले आहेत. इतर तांत्रिक अडचणींमुळे ५७ हजारांहून अधिक नावेही यादीतून काढण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, प्रारूप यादी अंतिम नाही. १६ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत मतदार दावे आणि हरकती सादर करू शकतात. वगळण्यात आलेल्या मतदारांसाठी सुनावणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आयोगाने मात्र मतदारांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे.