राष्ट्रपतींनी फेटाळला दयेचा अर्ज; २ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची फाशी अटळ!

    15-Dec-2025   
Total Views |

President Droupadi Murmu accepts Jagdeep Dhankhar

नवी दिल्ली : (President Droupadi Murmu rejects mercy plea)
महाराष्ट्रात २०१२ साली एका दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी फेटाळून लावली आहे. ही माहिती राष्ट्रपती भवनाच्या कार्यालयाकडून जाहीर केली आहे. २०२२ रोजी राष्ट्रपतिपदाची कार्यभार स्वीकारल्यानंतर मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका आहे.
 
नेमकं प्रकरण काय आहे? 
 
सदर प्रकरणामधील आरोपीचे नाव रवी अशोक घुमारे, असे असून त्याने ८ मार्च २०१२ रोजी दोन वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यातर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली होती. ही घटना जालना शहरात इंदिरानगर भागात घडली होती. या घटनेनंतर १६ सप्टेंबर २०१५ रोजी घुमारे याला स्थानिक न्यायालयाने त्याच्या नृशंस कृत्याबद्दल फाशीची शिक्षा ठोठावली होती. ही फाशीची शिक्षा पुढे जानेवारी २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. यावर घुमारे याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असताना न्यायालयाने याचिका फेटाळत ३ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. 
 
विद्यामान सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची २०१९ मध्ये सुनावणी केली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवताना न्यायमूर्ती सूर्य कांत व न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरिमन यांनी निकालपत्रात घुमारे याच्या कृत्याला कोणतीही माफी नाही, असे स्पष्ट करत लैंगिक भूक शमवण्यासाठी सर्व नैसर्गिक, सामाजिक, कायदेशीर मर्यादा घुमारेने ओलांडल्याचे स्पष्ट केले होते. आरोपीने मुलीचे फुलण्यापूर्वीच आयुष्य निष्ठुरपणे संपवले. त्या मुलीला वडीलकीचे प्रेम, आपुलकी, संरक्षण देण्याऐवजी वासनेचा बळी बनवले गेले. हे प्रकरण विश्वासघाताचे, सामाजिक मूल्यांच्या ऱ्हासाचे, गलिच्छ व विकृत मनोवृत्ती दर्शवणारे क्रूर प्रकरण आहे, असे न्यायालयाने म्हटले.


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\