बिबट्याचे जीवशास्त्र
बिबट्या हा मांजरकुळातील प्राणी आहे. तो निशाचर म्हणजेच रात्रीला जास्तीत जास्त सतर्क राहणारा, रात्री बाहेर पडून शिकार करणारा प्राणी आहे. मादी बिबट्याच्या गर्भधारणेचा काळ 90 ते 105 दिवसांचा आहे. मादी बिबट्या एका वेळेला एक ते चार पिल्लांना जन्म देते. यांचा जीवनकाळ 15 ते 17 वर्षांचा असतो. दुधाचे दात 26 आणि पक्के दात 30 असतात. या प्राण्याची पूर्णतः वाढ तीन वयोमर्यादेपर्यंत होते. जन्मास आल्यानंतर पिल्लू साधारण नऊ ते 11 दिवसानंतर डोळे उघडते. 45 ते 60 दिवसापर्यंत रांगण्यास सुरुवात करते व नंतर चालायला लागते. आईच्या दुधावर ही पिल्ले साधारण 80 ते 90 दिवसांपर्यंत अवलंबून असतात. त्यानंतर ते खाद्य (मांस) खाण्यास सुरुवात करतात. त्यांच्या अंगावर पोकळ ठिपके असतात त्याला ’रोजेट् पॅटर्न‘ म्हणतात. प्रत्येक वैयक्तिक बिबट्यामध्ये हे ठिपके वेगवेगळ्या आकाराचे असतात. बिबट्याला पुढील पायाला प्रत्येकी पाच, तर मागील पायाला चार अशी मिळून एकूण 18 नखे असतात. बिबट्या उत्तमरित्या झाडावर चढू शकतो. तसेच या प्राण्याला पोहणेसुद्धा चांगले जमते. पाळीव मांजराप्रमाणेच लोळणे, अंग घासणे, लपून बसणे इ. त्याच्या सवयी असतात. हा प्राणी परिस्थितीशी खूप जुळवून घेणारा आहे. त्यामुळेच तो मानवासोबत इतक्या सहजगत्या सहजीवन करतो. तो घाबरट प्राणी आहे. ऐकायला अजब वाटत असेल. परंतु, तो घाबरट नसता तर रोज एक मानवी हल्ला झाला असता.
बिबट्या उसाच्या शेतात
बिबट्या हा पूर्वीपासूनच जंगल व मानवी वस्ती यामधील दुवा धरून राहणारा प्राणी आहे. या प्राण्याचा इतिहास पाहिला, तर हा प्राणी मनुष्यवस्ती व जंगल दोघांच्या सीमारेषेवर अधिवास करत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे आपल्याला हा प्राणी आपल्या क्षेत्रात आल्यासारखा वाटतो. मुळात आपण केलेल्या जंगलतोडीमुळे व आपल्याकडून हरित पट्ट्यांमध्ये झालेल्या हस्तक्षेपामुळे आपणच त्याच्या क्षेत्रात एका अर्थी घुसखोरी केली आहे. जंगल नष्ट होऊन मानवाने शेती व घरे बांधण्यास सुरुवात केली. त्यातच उसाचे पीक हे दाट व भरगच्च असते. तसेच हे पीक एक ते दीड वर्ष राहात असल्याने बिबट्याने उसातच राहणे पसंत केले. राहण्याचा प्रश्न सुटला आणि शेताला पाणी सोडले जात असल्याने पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला. शिवाय, उसाच्या शेताबाहेर पडल्यावर त्याच शेतकर्यांची शेळी, मेंढी, कुत्रा इ. प्राणी खाद्य म्हणून मिळाले. याच कारणामुळे हा बिबट्या आता आपल्या क्षेत्रात नांदतोय. जवळपास गेली दोन दशके बिबट्यांचे यशस्वी प्रजनन उसाच्या रानात होत आहे. बिबट्यांच्या जवळपास तीन ते चार पिढ्या या उसात जन्माला आल्या आहेत. मादी बिबट्याने तिच्या पोटी जन्मास येणार्या पिल्लांना हे उसाचे रान म्हणजेच आपले घर म्हणून बिंबवले आहे. हा एक प्रकारचा जनुकीय बदलच आहे. त्याचादेखील अभ्यास होणे गरजेचे आहे.
बिबट गणनेचा अभाव
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल विभागाने 2024 साली प्रकाशित केलेल्या ‘स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया’ या अहवालानुसार, भारतातील बिबट्यांची संख्या ही 13 हजार, 852 एवढी आहे. या संख्येत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. मध्य प्रदेश हा प्रथम क्रमांकावर असून त्याठिकाणी 3 हजार, 907 बिबटे आहेत. त्याखाली महाराष्ट्रात 1 हजार, 985 आणि कर्नाटकात 1 हजार, 879 बिबटे आहेत. आता तुम्ही म्हणाल, महाराष्ट्रातील केवळ 1 हजार, 985 बिबटे त्रासदायक ठरलेले आहेत का? तर तसे नाही. वर नमूद केलेली संख्या ही केवळ व्याघ्र प्रकल्पामधील (मेळघाट-233, ताडोबा-148, नवेगाव-140, सह्याद्री-135, पेंच-102) आहे. केंद्र सरकारकडून करण्यात येणार्या व्याघ्रगणनेच्या वेळी बिबट्यांची गणनादेखील केली जाते. अशा वेळी केवळ व्याघ्र प्रकल्पामधील बिबट्यांच्ङ्मा संख्येची गणना होते. प्रादेशिक वनविभागातील बिबट्यांची गणना होत नाही आणि खरी समस्या हीच आहे. सध्या महाराष्ट्र वनविभागाकडे प्रादेशिक वनविभागाच्या राखीव जंगलात किती बिबट्यांचे वास्तव्य आहे, याची नेमकी संख्याच उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वप्रथम बिबट्यांची ठोस गणना करून त्यांची नेमकी संख्या ओळखून पुढे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. बिबट्यांच्या गणनेत आपल्याला प्रत्येक बिबट्या वेगळा ओळखता येतो. कारण, त्याच्या शरीरावरील गुलाबाच्या आकाराचे ठिपके (रोजेट् पॅटर्न) निरनिराळे असतात. ठोस संख्या हाती असल्यास नेमक्या कोणत्या क्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या अधिक आहे, याची माहिती मिळू शकेल. अशा बिबट्यांना तुलनेत बिबट्यांची संख्या कमी असलेल्या संरक्षित वनक्षेत्रात म्हणजेच अभायरण्य, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्पांमध्ये स्थानांतरित करता येईल.
रेस्क्यू सेंटरची गरज, मात्र...
राज्यात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात येत्या तीन महिन्यातं नवे रेस्क्यू सेंटर तातडीने उभारण्यात येणार आहेत. सध्या राज्यात असणार्या बिबट रेस्क्यू सेंटरची क्षमता पूर्णपणे भरलेल्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत नवे रेस्क्यू सेंटर बांधल्यास त्यांची क्षमतादेखील येत्या काळात पूर्ण भरण्याची शक्यता आहे. शिवाय, या केंद्रांमध्ये दाखल होणार्या बिबट्यांना पोसण्याचा आवाजावी खर्चदेखील राज्य सरकारच्या माथ्यावर पडणार आहे. त्यामुळे या रेस्क्यू केंद्रांना चालवण्यासाठी दत्तक योजनेअंतर्गत कॉर्पोरेट कंपन्यांकडून निधी मिळवता येत आहे का, याचीदेखील चाचपणी करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, बिबट्यास नैसर्गिक अधिवासामध्येच कशा पद्धतीने स्थानांतरित करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे.
लोकप्रतिनिधींची अशास्त्रीय वक्तव्ये
बिबट्यांच्या संख्येत झालेली वाढ मान्य असून त्यामुळे होणार्या मानवी मृत्यूची दाहकता भीषण आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींची उद्विग्न प्रतिक्रिया येणे साहजिकच आहे. मात्र, या प्रतिक्रिया कायदा, शास्त्र, संसोधन आणि विज्ञान यांना धरून आहेत का, याचा विचार बर्याच वेळा लोकप्रतिनिधींकडून होत नाही. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी विदर्भातील एका आमदाराने बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या, असे विधान केले. हे विधान अशास्त्रीय स्वरुपाचे असल्याचे दिसते. बिबट्यांचा स्वभाव आणि कायद्याचा अंदाज घेता, त्यांनी केलेले हे विधान अपुर्या ज्ञानाचे प्रतीक आहे. तसेच वनविभागानेदेखील बकर्या खरेदी करून त्या जंगलात सोडणार, अशी भूमिका घेतली. या भूमिकेचीदेखील खिल्ली उडवण्यात आली. मानव-बिबट संघर्षाचा सध्या पोहोचलेला उच्चतम बिंदू पाहता, अशा अशास्त्रीय आणि पोरकट विधानांवरून वैज्ञानिक क्षेत्रात लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवली जात आहे.
पुढचा धोका
पुणे जिल्ह्यात झालेल्या बिबट संख्येच्ङ्मा उद्रेकानंतर पुढता क्रमांक हा सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील जिल्ह्यांचा आहे. नाशिकमध्ये बिबट-मानव संघर्षाची परिस्थिती पुणे जिल्ह्यासारखी अजूनतरी चिघळलेली नाही. मात्र, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाच्या शेतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृष्णा, सह्याद्री, अजिंक्यतारा, मरळी रयत, पाली या कराड-पाटणच्या परिसरात उसाची प्रचंड मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. हे या बिबट्यांचे मोठे निवारा केंद्र आहे. कृष्णा-कोयना नदीमुळे मुबलक प्रमाणात पाणी आहे. तसेच विपुल प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे. जेव्हा कोणत्याही वन्यप्राण्यासाठी परिस्थिती अनुकूल असते, तेव्हा त्यांची संख्या झपाट्याने वाढते. तसेच काहीसे सातारा-कोल्हापूर या पट्ट्यामध्ये घडत आहे. कोकणातील बिबट्यांचा वाढता वावर हा निराळ्या पद्धतीचा आहे. याठिकाणी उसाची शेती नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनक्षेत्रात राहणार्या बिबट्यांचा आढळ आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्यात खासगी मालकीचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. हेच जंगल आता एकसूरी लागवड पद्धतीसाठी कापून त्याठिकाणी आंबा-काजूच्या बागायती उभ्या राहात आहेत. याच बागायतींमध्ये आता बिबट्या अधिवास करू लागला आहे आणि सहज खाद्याच्या शोधात तो गावात फिरत आहे.
ही काळजी घ्यावी
- बिबट्या वावर क्षेत्रात वावरताना हातात घुंगराची काठी, टॉर्च आणि मोबाईल किंवा रेडिओवर मोठ्या आवाजात गाणी वाजवावीत. जेणेकरून बिबट्याला तुम्ही येण्याची चाहूल लागेल व त्याचा मार्ग बदलून जाईल. यातून संघर्ष होणार नाही.
- बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात उन्हाळ्यात घराबाहेर, उघड्यावर किंवा अंगणात झोपू नये. (पांघरुणाभोवती जाळीचे बंदिस्त कुंपण घालणे योग्य)
- बिबट्या वावर क्षेत्रात उघड्यावर शौचास जाऊ नये. शौचालयाचा वापर करावा.
- उसाची लागवड करताना ऊस हा घराला अगदी खेटून लावू नये. घर ते ऊस हे अंतर कमीत कमी 50 ते 100 फूट असावे.
- बिबट्याच्या वावर क्षेत्रात लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावे. मुलाला एकटे अंगणात किंवा बाहेर सोडू नये. मुलांसोबत कोणीतरी नेहमी असावे.
- घरासमोरील अंगणाला चारीही बाजूंनी बंदिस्त जाळीचे कुंपण घालावे. त्यामुळे मुलांना खेळता येईल.
- बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रातील घराच्या अवतीभोवती वाढलेले गवत व इतर झुडुपे कापावीत. त्यामुळे बिबट्याला वाढलेल्या गवतामध्ये लपून राहण्यास वाव मिळणार नाही.
- परिसर स्वच्छ ठेवावा. घाणीवर कुत्रे, डुकरे, उंदीर, घुशी इत्यादी प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट्या येतो.
- लहान मुलांनी शाळेत ये-जा करताना समूहाने राहावे. तसेच गाणी किंवा मोठ्याने बडबड करत जावे.
- बिबट्या वावरत असलेल्या घराच्या आजूबाजूस दिवे असावे.
- बिबट्या दिसल्यास पाठलाग करू नये. त्वरित वनविभागाला कळवावे. पाठलाग केल्यास तो परत फिरून हल्ला करू शकतो.
- शेतीची कामे करताना खाली बसून करावी लागतात. बिबट्या बर्याच वेळा खाली बसलेल्या माणसांवर हल्ला करतो. त्यामुळे - शेतीची कामे करताना विशेष काळजी घ्यावी.
- बिबट्यासंदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका.
- बिबट्या वावर क्षेत्रात येणारे मेंढपाळ आणि उसतोडणी कामगार यांनीसुद्धा विशेष दक्षता घ्यावी.
महत्त्वाचे म्हणजे, मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे. बिबट प्रवण क्षेत्रात राहणार्या नागरिकांनीदेखील या जनजागृतीला दुर्लक्षित न करता त्यावर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. बर्याच वेळा या जनजागृती मोहिमांमध्ये बिबट प्रवण क्षेत्रात राहणार्या मुलांना घराबाहेर सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी खेळण्यास सोडू नका, उघड्यावर शौचास बसू नका, अशा उपाययोजना पोटतिडकीने सांगितल्या जातात. मात्र, या गोष्टी प्रत्यक्षात अमलात आणताना गावकर्यांकडून दुर्लक्षित केल्ङ्मा जातात. सद्य स्थितीत घडलेल्या बिबट्यांच्ङ्मा हल्ल्ङ्मात झालेले बालकांचे मृत्यू हे याच प्रसंगात सावधानता न बाळगल्यामुळे झाले आहेत. त्यामुळे बिबट्यासोबत सहजीवन जगणे हे कटू सत्य असले, तरी काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. ती काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.