‘तस्करी’मधून अमृता खानविलकर इम्रान हाश्मीसोबत करणार स्क्रीन शेअर

    15-Dec-2025
Total Views |

मुंबई : 2025 हे वर्ष निरोप घेत असताना अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या चाहत्यांना एकामागून एक खास सरप्राईज दिली आहेत. नव्या वर्षात रंगभूमीवर पदार्पण करण्याची तयारी करत असतानाच, वर्षाच्या शेवटी अमृता थेट डिजिटल विश्वात मोठी झेप घेताना दिसणार आहे. नेटफ्लिक्सवरील एका नव्या कोऱ्या वेब सीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार असून, या प्रोजेक्टमुळे तिच्या करिअरला नवा आयाम मिळणार असल्याचं बोललं जात आहे. चित्रपट, नृत्य आणि टेलिव्हिजननंतर आता ओटीटी आणि रंगभूमी या दोन्ही माध्यमांमध्ये अमृताची दमदार उपस्थिती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

नेटफ्लिक्सवर येणाऱ्या ‘तस्करी’ या वेब सीरिज मध्ये तिची विशेष लक्ष वेधून घेणारी भूमिका बघायला मिळणार असल्याचं कळतंय. तिच्या सोबतीने अनेक बॉलिवूडचे बडे कलाकार देखील तस्करी मध्ये काम करताना दिसणार आहेत. ‘तस्करी’ मध्ये पहिल्यांदा अमृता आणि बॉलिवुड अभिनेता इम्रान हाश्मी यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

अमृताने सोशल मीडिया ‘तस्करी’ चा टीझर शेयर केला असून तिच्या कॅप्शनने लक्षवेधून घेतलं आहे. तस्करीच्या दुनियेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे असं म्हणत तिने हा टिझर सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. इम्रान सोबत तिची काय भूमिका साकारणार? या तस्करीच्या विश्वात अमृताचा काय रोल असणार हे बघण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.

वर्षभर नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अमृता वर्ष संपताना देखील त्यांचं निखळ मनोरंजन करणार यात शंका नाही. तर येणाऱ्या वर्षात प्रेक्षक तिला रंगभूमीवर बघण्यासाठी देखील तितकेच उत्सुक असल्याचं बघायला मिळतंय.