लग्नाच्या स्मृती अन्‌‍ स्मृतीचे लग्न...

    15-Dec-2025
Total Views |

अभिनेते असू दे किंवा खेळाडू, त्यांच्या खासगी आयुष्यातही त्यांच्या चाहत्यांना रस हा असतोच. त्यामुळेच त्यांच्या विवाहासारख्या खासगी प्रसंगाचीही इतकी चर्चा रंगते. जशी ती संसाराचा डाव रंगण्याची होते, तशीच ती डाव अर्ध्यावर मोडल्याचीही होते. नुकतेच स्मृती आणि पलाश यांच्या निर्णयानंतर क्रीडाक्षेत्रातील गाजलेल्या विविध नात्यांचा घेतलेला आढावा...

नाट्य, चित्रपट तसेच क्रीडा क्षेत्रातील एखादी व्यक्ती अचानक देशभरात खूप लोकप्रिय होते, आणि लोकांच्या हृदयावर अभिराज्य गाजवायला आरंभ करते. तेव्हा सर्वसाधारणतः त्या लोकप्रिय व्यक्तीला इंग्रजीतील ‌‘नॅशनल क्रश‌’ या संज्ञेने संबोधलं जातं. नुकतीच अशी एक क्रीडांगणावरील ‌‘नॅशनल क्रश‌’ चर्चेत आहे. त्या ‌‘नॅशनल क्रश‌’चे नाव आहे स्मृती श्रीनिवास मानधना! सांगलीच्या माधवनगर येथील अर्जुन पुरस्कार विजेत्या या खेळाडूचे नाव सध्या क्रीडाप्रेमींच्या मुखात आहे. स्मृती ही महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची उपकर्णधार. विश्वचषक पटकावल्या पटकवला त्या विजयाने ती जितकी चर्चेत आली, तितकीच किंबहुना त्याहून अंमळ काकणभर अधिक चर्चेत राहिली, ती तिच्या संगीतकार पलाश मुच्छल याच्या विवाहाच्या चर्चेमुळे. त्या दोघांच्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना, अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्मृती मानधनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक महत्त्वाची घोषणा करत, पलाश मुच्छलसोबतचा तिचा विवाह सोहळा रद्द झाल्याचे जाहीर केले.

खेळाडूंचे विवाह हे त्यांच्या ‌‘सेकंड हाफ‌’बरोबर चर्चेत आलेले आपण बघत असतो. अनेकांची लग्नं ही त्यांच्या नियोजित ‌‘सेकंड हाफ‌’बरोबर, शेवटपर्यंत यशस्वी झालेली दिसतात. अनेकजण आधी वाग्दत्त वधू-वर होतात, पण त्यातील काही वाग्दत्तच्या पुढे जात नाहीत. काही वाग्दत्तच्या नंतरची ‌‘शुभमंगल सावधान‌’ची सप्तपदीची पावले चालत आपल्या वैवाहिक जीवनातील पहिल्या इनिंगची खेळी यशस्वी करतात, तर काहीजण आपली ‌‘सेकंड इनिंग‌’ही पूर्ण करून यशस्वी होतात. अनेकजण विवाह, कौटुंबिक जीवन, स्त्री-पुरुष संबंध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक-भावनिक गुंतागुंतीचे प्रभावी चित्रण, आपल्या विचारांतून विविध माध्यमांतून सादर करताना आढळतात. यात लग्न हा एक महत्त्वाचा विषय असतो.खेळाडूंचे विवाह हे नेहमीच समाजासाठी चर्चेचे विषय असतात, ज्यात क्रिकेटपटूंचे अभिनेत्रींशी लग्न, इतर खेळाडूंसोबत विवाह, तसेच अलीकडेच स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांसारख्या जोडप्यांनी लग्न रद्द केल्याच्या घटनांचा समावेश असतो.

विराट कोहली-अनुष्का शर्मा या जोडीसारख्या के. एल. राहुल, हरभजन सिंग, युवराज सिंग यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केले आहे. काही खेळाडू त्यांच्या सहकारी खेळाडूंसोबतच विवाह करतात. जसे की भुवनेश्वर कुमारने, नुपूरसोबत लग्न केले आहे. काही क्रिकेटपटूंनी घटस्फोटानंतर दुसऱे लग्न देखील केले आहे. खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यात, विशेषतः त्यांच्या विवाह सोहळ्यांमध्ये चाहत्यांना खूप रस असतो आणि त्यावर माध्यमांमधून चर्चाही होते. खेळाडूंचे विवाह हे त्यांच्या कारकिदइतकेच चाहत्यांसाठी मनोरंजक असतात आणि त्यात अनेक प्रकारच्या जोड्यांचाही समावेश असतो. यातून त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक बदल दिसून येतात.

अनेक खेळाडूंच्या आयुष्यात विवाह आणि घटस्फोटांचे प्रसंग घडले आहेत, जिथे काही खेळाडूंनी घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्न केले, तर काहींनी त्यांच्या कारकिदच्या उत्तरार्धात यशस्वी भागीदारी केली. पण काही खेळाडू घटस्फोटांमुळे कायमच चर्चेत राहिले. शिखर धवनने पहिल्या पत्नीशी घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्न केले, याची बरीच चर्चा झाली होती.

गेल्या दशकात समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे, खेळाडूंना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बातम्या लपवणे खूप कठीण झाले आहे. अलीकडेच टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलचा घटस्फोट झाला, ज्याची गेल्या एक वर्षापासून सतत चर्चा सुरू होती. दिनेश कार्तिक हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाजांपैकी एक मानला जातो. 2024च्या ‌‘आयपीएल‌’ हंगामानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. त्याची पहिली पत्नी निकिता वंजाराचे, टीम इंडियाचा माजी खेळाडू मुरली विजयसोबत प्रेमसंबंध असल्याची बातमी समोर आली, तेव्हा त्याचे वैयक्तिक आयुष्य चर्चेचा विषय बनले होते. त्यानंतर कार्तिकने त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. कार्तिकने 2015 मध्ये भारतीय स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकलशी लग्न केले आणि आता त्यांना जुळी मुले आहेत.

मोहम्मद अझरुद्दीन हा भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी फलंदाज. मैदानाबाहेरील त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चा झाली. त्याने दोनदा लग्न केले, त्याची पहिली पत्नी नौरीन ही होती. तिला घटस्फोट दिल्यानंतर, त्याने 1996 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. हे लग्न 14 वर्षे टिकले आणि त्यांनी संगनमताने घटस्फोट घेतला. माजी भारतीय वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ हा सुद्धा, सर्वोत्तम भारतीय गोलंदाजांपैकी एक. त्याने 1999 मध्ये ज्योत्स्नासोबत लग्न केले आणि 2007 मध्ये परस्पर संमतीने दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर श्रीनाथने 2008 मध्ये पत्रकार माधवी पत्रावळीशी लग्न केले.

विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकिदत अनेक चढ-उतार आले असले, तरी त्याचे वैयक्तिक जीवनही असेच होते. कांबळीचे पहिले लग्न हॉटेल रिसेप्शनिस्ट नोएला लुईसशी झाले होते; परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही. या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कांबळीने 2006 मध्ये मॉडेल ॲण्ड्रिया हेविटशी लग्न केले. हेही लग्न तुटण्याच्या मार्गावरच होते; परंतु ॲण्ड्रिया हेविटने नंतर घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला.

माजी भारतीय खेळाडू अरुण लाल यांनी 2022 मध्ये, शाळेतील शिक्षिका बुलबुल साहा हिच्याशी लग्न केले. त्याची दुसरी पत्नी बुलबुल साहा ही त्याच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान होती. वयाच्या 66व्या वष त्यांनी हा विवाह केला. त्याची पहिली पत्नी रीनाची तब्येत बिघडल्यामुळे, दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालने, सात वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला शांततेत पूर्णविराम दिला. वैयक्तिक वाढ आणि परस्पर सामंजस्य राखण्यासाठी, तिने पती पारूपल्ली कश्यपपासून जुलै 2025 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

भारतातील दिग्गज बॉक्सिंगपटू मेरी कॉमने आपल्या 18 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर 2023 मध्ये, पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मेरी कॉमला तीन मुले आहेत आणि एक मुलगी दत्तक घेतली आहे. प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झानेही तिच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतर, शेवटी शोएब मलिकपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी एकमेकांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे वैयक्तिक आयुष्यही वादळी ठरले आहे. त्याने हसीन जहांसोबत 2014 मध्ये लग्न केले होते मात्र, हसीन जहांने शमीवर कौटुंबिक हिंसाचार, आर्थिक फसवणूक आणि विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केले. त्यानंतर शमी आणि हसीन जहां यांच्यात फार मोठा वाद झाला. त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती, 2018-19 दरम्यान पुढे आली होती.

हे सारेच वादग्रस्त विवाह बघितले की, त्यांच्या तुलनेत सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर, कपिल देव अशा क्रिकेटवीरांचे सुखात चाललेले विवाह, गुण्यागोविंदातले संसार बघून खेळाडूंमधेच किती फरक आहे ते कळते. सचिन तेंडुलकरचे लग्न सहा वर्षांनी मोठी असलेल्या डॉ. अंजली (पूवची मेहता) यांच्याशी झाले. त्यांची पहिली भेट 1990 मध्ये मुंबई विमानतळावर झाली होती. या जोडप्याला मुलगी सारा आणि क्रिकेटपटू मुलगा अर्जुन अशी दोन मुले आहेत. सुनील गावस्करने मार्शनील मेहरोत्राशी लग्न केले े. एका चाहत्याने ऑटोग्राफ मागितला आणि त्यातूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. नंतर त्यांचे रुपांतर लग्नात झाले. सुनील गावस्करचा मित्र आणि क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथने गावस्करच्या बहिणीशी, कविता यांच्याशी लग्न केले. ज्यामुळे ते दोघे ‌‘साडू-मेहुणे‌’ बनलेले आहेत.

कपिल देवच्या लग्नाचा किस्सा त्यानेच एका मुलाखतीत सांगितला होता. कपिल देवची बायको रोमी यांची ओळख, एका कॉमन मित्राने करून दिली होती. ओळख झाल्यानंतर रोमीला प्रपोज करण्यासंदर्भात बोलताना कपिल म्हणाला होता, ‌’तेव्हा मुली बोल्ड नव्हत्या, बोलणे तर व्हायचे, मात्र प्रेमासंदर्भात कुणीही बोलू शकत नव्हते. आज परिस्थिती बदलली आहे. संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या वापराने प्रेम व्यक्त करणे आता सोपे झाले आहे. आमच्या काळात हे सर्व एवढे सोपे नव्हते.‌’ 1978ला रोमी आणि कपिल देव महाविद्यालयीन विद्याथ होते. एकदा महाविद्यालयाच्या सहलीला गेले असताना, कपिलने रोमीला प्रपोज केले होते. या विषयावर बोलताना रोमीने सांगितले होते की, ‌’तेव्हा कपिल फार लाजाळू होता. आज त्याच्यात दिसणारा आत्मविश्वास तेव्हा दिसत नव्हता.‌’ त्यांचं लग्न ठरवतानाचा किस्सा कपिल देवने सांगितला. त्यावेळी क्रिकेट खेळणं याकडे करिअर म्हणून पाहिलं जात नव्हतं. ज्यावेळी कपिल देवचे लग्न ठरत होतं, त्यावेळी रोमी यांच्या घरी त्यांच्या आजोबांना कपिलबाबत सांगितलं. यावेळी रोमी यांच्या आजोबांनी विचारलं की, “मुलगा काय करतो?” रोमीच्या वडिलांनी मुलगा “क्रिकेट खेळतो” असं सांगितलं. त्यावेळी आजोबा म्हणाले की, “ते सर्व ठीक आहे, पण कमावण्यासाठी काय करतो?” असा भन्नाट किस्सा कपिल देवने एका मुलाखतीत सांगितला होता.

जीवनातील कोणत्याही प्रकारच्या मैदानात उतरायचे ठरवल्यावर, तो खेळाचा डाव पूर्ण करायचा असतो. त्यात कोणी हरतो, तर कोणी जिंकतो. असे असले तरी खरा खेळाडू तोच असतो की, जो डाव पूर्ण करतो. गीत ना. घ. देशपांडे यांचे, संगीतकार राम फाटक व गायक सुधीर फडके या त्रयीचे लोकप्रिय गीत मला जाताजाता याप्रसंगी आवर्जून आठवते,

काढले मी तुझे नाव तू देखिले
आणि माझे पुढे नाव तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको
खोडू नको, डाव मोडू नको|


‌‘डाव मांडून भांडून मोडू नको‌’ या प्रेमाच्या संवादातच, प्रत्येकाच्याच संसाराचा डाव मांडलेला आहे. हा गीतसंवाद पूर्णतः नायकाकडूनच होत असला, तरी गाण्यातील शब्दांमध्ये स्त्रियांच्या मनाचे पैलूही दिसतात. तो तिला सारे काही प्रेमाने सांगत आहे. एक तर मला खेळायला घेऊ नकोस आणि घेतलेसच, तर आपला मनासारखा मांडलेला (संसाराचा) डाव मोडू नको, हे तो लटक्या प्रेमाने सांगत आहे. हा संवाद एकपात्री असला, तरी तो दोघांचा वाटतो. खरं म्हणजे तिचे मौन या शब्दांत बोलके झाले आहे, असे वाटतं. बाबूजी आपल्या सगळ्यांच्या हृदयात या भावना उतरवतात. भारतीय संस्कृती सांभाळून गायलेले संस्कारक्षम गाणे, आपल्यासारख्या हळव्या मनाच्या लोकांत प्रिय झालेले आहे. हे भावगीत आजच्या बदलत्या जमान्यात, विविध प्रकारचे खेळ खेळणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या मनात येत असेल का? हा आज अनेकांना पडलेला प्रश्न आहे.

- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)