प्राचीन संस्कृती लाभलेल्या असंख्य राष्ट्रांपैकी एक म्हणजे चीन. आशियातील शक्तिस्थानांपैकी एक असलेल्या या देशाला, प्राचीन संस्कृतीचे वरदान लाभलं होतं. काळाच्या ओघात चीनने जगावर परिणाम करणारी असंख्य स्थित्यंतरं अनुभवली व आपल्या अस्तित्वाने नव्या जगाला आकारसुद्धा दिला. केवळ राजकीय आणि आर्थिक पटलावरच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा चीनमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले. यामुळेच, चीनकडे दुर्लक्ष करून पुढे जाता येत नाही. काही दिवसांपूव चीनच्या चोंगकिंग प्रांतात एका ठिकाणी उत्खनन सुरू असताना, शास्त्रज्ञांना डायनासॉरचे काही अवशेष सापडले. अभ्यासाअंती असे लक्षात आले की, हा ‘तोंगनानलाँग झिमिंगी’ या प्रजातीचा डायनोसॉर आहे. या डायनासॉरची लांबी सुमारे 92 फूट असून, आशियात आतापर्यंत सापडलेल्या सर्वांत मोठ्या डायनासॉरपैकी एक असू शकतो, असा अंदाज आहे. या डायनासॉरच्या खांद्याचे हाड सुमारे सहा फूट लांब आहे. समाजमाध्यमांवरील माहितीनुसार हा डायनासॉर 14 कोटी, 70 लाख वर्षांपूव पृथ्वीवर अस्तित्वात होता. पर्यावरणाच्या दृष्टीने या शोधाचे अनन्यसाधारण महत्त्व असून, यामुळे इतिहासाकडे बघण्याची नवीन दृष्टी आपल्याला लाभणार आहे.
डायनासॉरचा हा सांगाडा खडकांच्या एका थरात सापडला. हा थर 147 दशलक्ष वर्षांपूवचा आहे. तिथल्या गाळावरून असे लक्षात येते की, तिथल्या अर्ध शुष्क प्रदेशाच्या वातावरणात एक सरोवर होते. वारंवार येणाऱ्या पुरामुळे तिथे पाण्यांचे मृतदेह खोलवर गाडले गेले. इतकंच नव्हे, तर या उत्खनानामुळे भौगोलिकदृष्ट्यासुद्धा एका वेगळा विचार समोर आला आहे. या डायनोसॉर्सच्या स्थलांतराचे देखील अनेक सिद्धांत मांडले जातात. शास्त्रज्ञांचा एक युक्तिवाद असा होता की, पूर्व आशियामध्ये डायनासॉर प्राणी वेगळे होते. समुद्राच्या वाढत्या लाटांमुळे हा प्रदेश एकमेकांपासून वेगळा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, आता मात्र चीनमधील ‘तोंगनानलाँग झिमिंगी’मध्ये, आफ्रिकेतील एका विशिष्ट प्रजातीच्या डायनासॉरचीही वैशिष्ट्ये आढळून आली. यावरुन असेही सूचित होते की, त्या काळात जमिनीवरील मार्ग खुले होते. काही शास्त्रज्ञांच्या मते, डायनासॉरची ही विशिष्ट प्रजाती जगभरात आढळून येते.
वास्तविक, चीनमध्ये मागचा काही काळ डायनासॉरच्या अशाच काही सांगड्यांचा शोध लागत आहे. ‘हुशॅनोसॉरस’ नावाच्या दुसऱ्या एका प्रचंड मोठ्या डायनासॉरच्या सांगाड्याचे उत्खननही नुकतेच पूर्ण झाले. हा डायनासॉर दक्षिण चीनमध्ये सापडला असून, तो सुमारे 39 फूट लांब आहे. या डायनासॉरच्या सांगाड्याचा जेव्हा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला, तेव्हा सुमारे दहा कोटी वर्षांपूवच्या निसर्गाची माहिती त्यांना मिळाली. त्यांच्या अभ्यासातून असे लक्षात आले की, दक्षिण चीनमध्ये त्या काळी अतिशय घनदाट वर्षावने होती. डायनासॉरच्या सांगाड्यासोबत ‘लॅरिंग्स’ म्हणजेच आवाजाच्या पेटीचा शोध असो किंवा म्हशीच्या आकाराचा शाकाहारी डायनासॉर असो, जैवविविधतेचा एक नवीन अविष्कारच यामुळे समोर आला आहे. ’पॅलिओंटोलॉजी’ अर्थात ‘जीवाश्मशास्त्र’ अशी एक स्वतंत्र शाखा, विज्ञानामध्ये प्रचलित आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रागैतिहासिक जिवांची उत्पत्ती व पर्यावरणाशी जुळवून घेताना झालेली त्यांची उत्क्रांतीचा, प्रामुख्याने जीवाश्मांच्या मदतीने अभ्यास केला जातो. त्यामुळे अशा पद्धतीचे होणाऱ्या उत्खननामुळे, जीवाश्मशास्त्राकडे करिअर म्हणून बघण्याची संधी मिळते. अभ्यास करून यामध्ये पारंगत झालेले विद्याथ मग अशाच अभ्यासकांची नवी फळी तयार करतील. तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे, अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
चीन आज जगातल्या काही शक्तिशाली देशांमधला एक देश म्हणून ओळखला जातो. त्याची सत्ता ही जितकी राजकीय, आर्थिक, विकासामध्ये दडलेली आहे, तितकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक ज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमध्येसुद्धा आहे. एखाद्या राष्ट्राला जर सर्व स्तरांवर बलशाली व्हायचे असेल, तर नव्या गोष्टींच्या शोधाचा ध्यास घ्यावा लागेल. इतिहासाच्या माध्यमातून भूतकाळात डोकावताना त्यातही संधी शोधावी लागते आणि याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या साऱ्या गोष्टींचा प्रचार-प्रसारही करावा लागतो. येणाऱ्या काळातसुद्धा असे अनेक अविष्कार, चीनच्या माध्यमातून जगासमोर उलगडले जातील. त्यातून शोध आणि बोध अशा दोन्ही गोष्टी आपण स्वीकारायला हव्या, हे नक्की.