संगीत क्षेत्राचा मुसाफिर

    15-Dec-2025   
Total Views |

बाळकडू लाभलेल्या संगीतक्षेत्रात गायक ते गझलकार अशा रुपात, संगीताच्या विविध प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या डोंबिवलीकर केतन पटवर्धन यांच्याविषयी...

केतन यांचे मूळ गाव कवाड. त्यांचा जन्म डोंबिवलीत झाला. शालेय शिक्षणही डोंबिवलीमधील विष्णूनगरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेत झाले. पुढे केतन यांनी मॉडेल महाविद्यालयातून ‌‘बीकॉम‌’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर, ‌‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट‌’मधून केतन यांनी फायनान्समध्ये ‌‘एमबीए‌’ पदवी संपादन केली. केतन वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय गाणं शिकत होते. केतन यांच्या वडिलांकडूनच त्यांना, संगीत कलेचा वारसा लाभला होता. केतन यांच्या वडिलांना गायनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेता आले नाही, पण त्यांनी बाबूजींच्या गाण्याचे अनेक कार्यक्रम ऐकले होते. त्यामुळे केतन यांना वडीलांना, बाबूजींची अनेक गाणी मुखोद्गत होती. केतन यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच, शुभदा रानडे यांच्याकडे शास्त्रीय व सुगम संगीत शिक्षणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पं. महेश कुलकण यांच्याकडून ही त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. सध्या ते ठाण्यात पंडित सुरेश बापट यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. केतन यांनी संगीतात विशारद पदवी प्राप्त केली. व्यवसाय प्रशिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर, केतन यांनी सहा वर्षे एका आंतरराष्ट्रीय बॅंकेत नोकरी केली. नोकरी करत असतानाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. त्यांना ‌‘झी मराठी सारेगमप‌’च्या सातव्या पर्वात, स्पर्धक म्हणून गायनाची संधी मिळाली. आपल्या गानकलेच्या जोरावर ‌‘सारेगमप 2009‌’ या पर्वाच्या अंतिम फेरीपर्यंत, केतन यांनी धडक मारली.

नामवंत कवी वैभव जोशी, ज्ञानेश पाटील यांच्या संपर्कात आल्यामुळे, केतन यांचा गझलच्या व्यासपीठावर नवीन प्रवास सुरू झाला. त्यातूनच त्यांनी स्वतःच्या संगीत रचनांच्या ‌‘रे सख्या‌’ या कार्यक्रमाची निर्मिती केली. 2013 साली, स्वतः संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा ‌‘रे सख्या‌’ नामक त्यांचा पहिला अल्बम प्रकाशित झाला. हा अल्बम काढण्यासाठी केतन यांना, वैयक्तिक कर्जदेखील काढावे लागले होते. त्यानंतर ‌‘रे सख्या‌’ नावानेच मराठी गझल आणि कवितांच्या संपूर्ण नवीन रचनांचे सांगीतिक प्रयोग ते सध्या करत आहेत. या कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना, गायक आणि संगीतकार अशा तिहेरी भूमिका, केतन यांनीच समर्थपणे सांभाळल्या आहेत. ‌‘रे सख्या‌’चे आतापर्यंत मुंबई आणि पुणे मिळून 18 यशस्वी प्रयोग झाले आहेत. यानंतर केतन यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रवास, आजदेखील अविरतपणे चालू आहे. त्यांनी ‌‘राजश्री सोल‌’ या युट्यूब वाहिनीच्या वाहिनीप्रमुख पदाची जबाबदारीही सक्षमपणे संभाळली. एका संगीत वाहिनीचे, वाहिनी प्रमुखम्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले आहे. ते सध्या ‌‘टी सिरीज‌’मध्ये, वरिष्ठ ए आणि आर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच केतन आकाशवाणी-ऑल इंडिया रेडिओचे मान्यताप्राप्त गायक-संगीतकारही आहेत.

केतन यांनी ई-टीव्ही स्वरसंग्राम, सह्याद्री महाराष्ट्र संगीत रत्न यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी, 100 हून अधिक रचना संगीतबद्ध केल्या आहेत. ‌‘सह्याद्री वाहिनी‌’वरील म्युझिक ट्रेक कार्यक्रमात, नवोदित तरुण संगीतकार म्हणून केतन यांची मुलाखत प्रक्षेपित करण्यात आली होती. ‌‘शतजन्म शोधिताना‌’, ‌‘शिवरूदचे दिग्विजयी तांडव‌’, ‌‘जगणेच गाणे असावे‌’ यासारख्या अनेक दर्जेदार संकल्पना असलेल्या कार्यक्रमामध्ये, गायक म्हणून केतन यांनी सहभाग घेतला आहे. केतन यांच्यामध्ये गायक आणि गझलनिर्मितीसोबतच, लेखनाचीदेखील कला आहे. शब्दांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी, अनेक कविता शब्दबद्ध केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी गझल रचनाही लिहिल्या आहेत. डोंबिवलीत झालेल्या ‌‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना‌’चे संमेलन गीतही, केतन यांच्या लेखणीतूनच साकार झाले होते. केतन यांनी गायलेले अथर्वशीर्ष, गणपतीस्तोत्र अनेक घरात ऐकले जाते. ‌‘प्रभू श्रीरामला घातलेली एक आर्त साद‌’ या पारंपरिक रचनेचे गायनही, केतन यांनी तितक्याच आर्त भावनेने केले आहे. संगीतकार कमलेश भडकमकर हे महाराष्ट्रभर फिरत असताना त्यांना अनेक गुणी, होतकरू गायक-गायिका गवसले. त्यांच्या ‌‘मनसा संस्थे‌’तर्फे ‌‘शतसूर मराठी‌’ उपक्रमांतर्गत 100 गुणी गायकांचे ध्वनिमुद्रण करून, त्यांना व्यावसायिक क्षेत्रात चांगले स्थान मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नरत होते. यामध्ये केतन यांचाही समावेश होता.

‌’डिजिटल माध्यम आव्हानात्मक आहे. सध्या कलाकार हाच निर्माता झाला आहे. गाण्यापेक्षा त्याच्या व्हिडिओकडे जास्त लक्ष द्यावे लागते. त्याच्या निर्मितीनंतर ते एका व्यावसायिक कंपनीकडे जाऊन, त्यांना ते डिजिटल माध्यमांसाठी द्यावे लागते. एवढं सगळं केल्यानंतरही, आपण काही ठराविक लोकांपर्यंतच पोहोचतो. त्यामुळे आपला श्रोता तयार करणे हे खरेच एक आव्हान आहे. स्वतःच्या रचनांच्या कार्यक्रमाला मयार्दित रसिकांची उपस्थिती असते. प्रायोजकही कमी मिळतात. या सर्व आव्हानांवर मात करून संगीत समर्थपणे रसिकांपर्यंत पोहोचवावं लागते,‌’असे केतन सांगतात. केतन यांच्या या संगीत क्षेत्रातील मुशाफिरीला दै.‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून हार्दिक शुभेच्छा.