एजेंटिक एआय ते अजेंडिक नाटक

    14-Dec-2025
Total Views |
 
The Role of Agenda in Children
 
एका साहित्यातील अजेंडा हा आजकालचा सर्वात चर्चेला जाणारा विषय. मात्र, त्यात भारतीय संस्कृतीची उकल करणारी, त्याची गाथा अभिमानाने सांगणारी कथानके देखील अजेंड्याचा भाग म्हणूनच पाहिली जातात. आज ‘एआय’मधून मिळालेल्या माहितीवर निकोप दृष्टीने विश्वास ठेवणारी नवी पिढीही, इतिहासाकडे अजेंडा म्हणून बघताना दिसते. मात्र, इतिहासातून सत्य मांडणे हा अजेंडा नसून, सत्य प्रसाराचे कार्य ठरते. बालनाट्यातून याचा कसा प्रसार होतो आणि कशी मूल्ये शिकवली जातात, याचा घेतलेला आढावा...
 
नाट्यसंवादातूनच आजचा बालरंगभूमीवरचा लेख सुरू करते. हा संवाद माझ्या आणि माझ्या मुली अंतरामधला आहे. अंतरा आता १८ वर्षांची आहे. तिचं बालपणातलं असं एकही वर्ष नसेल, ज्यावर्षी तिने बालनाट्यात भाग घेतला नाही, नाटक केलं नाही. आमच्या घरात, घराबाहेर, दिवस असो वा रात्र, असा एकही दिवस जात नाही, ज्यात आम्ही नाटकाबद्दल बोलत नाही. आमच्या घरी उठता-बसता, खाता-झोपता नाटक, सिनेमा, बालनाट्य हाच विषय असतो. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय या सगळ्याच गोष्टींचं बीज पेरण्याचं काम आमच्या घरात होत असल्याकारणाने मला तर वाटतं, आमची वास्तूसुद्धा नाटकातले बोल बोलू लागेल, असो! तर अंतरा आणि माझ्यातला संवाद असा होता.
 
अंतरा: आई, माझ्या मैत्रिणीची मैत्रीण विचारत होती की, ‘तू सियावर रामचंद्र की जय’, ‘राजे शिवबा’ अशीच नाटकं का बसवत असतेस?
 मी: मग तू काय सांगितलंस?
 अंतरा: असं नाही.
 मी: अंतरा तुला आठवतं, आपण याच वर्षी सहा एकांकिका एकाच दिवशी सादर केल्या होत्या, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुणे येथे? ७५ मुलांना घेऊन. त्यात हलकी-फुलकी नाटकं होती. मुलांनी नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं होतं. फार विचार करायला न लावणार्‍या बालनाट्य एकांकिकाही होत्या.
 
अंतरा: हो आई. ‘मुंगळे ४’ या एकांकिकेत, चार लहान मुंगळ्यांची गोष्ट आहे. मुंगळे रोज शाळेत जातात आणि एक दिवस, त्यांना एक कोळी मुंगळा म्हणून भेटतो. त्याला त्यांच्या पूर्ण परिवाराला फस्त करायचं असतं. त्यांच्या कुटुंबाला आणि समस्त मुंगळ्यांना धोका निर्माण करणार्‍या कोळ्याला, सगळे मुंगळे एकत्र येऊन हरवतील का? ‘सेफ झोन’मध्ये असलेले फुलपाखरू पोलीस मदत करू शकतील का? शाळेतले मजेदार मास्तर काय बरं करतील? अशी सगळी धम्माल मजा, या नाटकात बघायला मिळते.
चिऊ बाळाने संक्रांतीच्या दिवशी आईबाबांकडे गोडाचा हट्ट करून त्यांना नदीपलीकडे जाऊन गोड घेऊन यायला भाग पाडलं खरं; पण अवेळी आलेल्या पावसामुळे आईबाबा संकटात पडतील का? बहिणामावशी चिऊ बाळाचे पंख तर नाही ना मोडणार? कमळा मावशी एकट्या चिऊ बाळाची मदत करू शकेल? गरुड काका हिरो बनून काय पराक्रम करतील? हे सगळं घडत असताना, मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवताना आईवडील कसे संकटात येऊ शकतात, यावर भाष्य करणारी ‘चिऊ बाळाची गोष्ट’ ही अतिशय गोड एकांकिका आहे.
 
टीरा ही केनियामधील मसाई मारा जंगलातील, एक वेगळी दिसणारी पोलका डॉट्स असलेली झेब्रा आहे. ती वेगळी दिसत असल्यामुळे एकीकडे तिला झेब्रा समाजात स्वीकार केलं जात नाही, तर दुसरीकडे पर्यटकांची गर्दी तिला बघायला जमत आहे. मलिष्का सिंहिण तर वाटच बघत आहे की, कधी एकदा टीरा १५ दिवसांची होईल आणि जंगलाच्या नियमानुसार तिला खाता येईल. चंपू बंदर मलिष्काला उचकवण्यात कुठलीही कसर सोडत नाही. तर अशा या वेगळ्या दिसणार्‍या टीराला, झेब्रा आपली राणी म्हणून स्वीकार करतील का? मलिष्काला टीरा हरवू शकेल? अतिशय संवेदनशील अशा मांडणीची ही सुंदर एकांकिका आहे.
तुम्हाला मॅगी आवडते का? आवडतच असेल. बर्गर, चॉकलेट, बिस्कीट असं सगळं जंक फूड आवडतं का? मुलांनाही फार आवडतं. वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर वगैरे मुळमुळीत जेवण, अजिबात विचारू नका. नाटकातल्या सोनूला रोज जंक फूड हवं असतं. आईने नाही म्हटल्यावर स्वप्नात पाहिलेल्या फूड पार्टीमध्ये, सात्त्विक आणि जंक फूडमध्ये लढाई होऊन कोण बरं जिंकतं? सोनूला सात्विक जेवणाचं महत्त्व कळतं का? ‘आई मला भूक लागली’ या नाटकाद्वारे मुलांना सहज एक छान संदेश दिला आहे.
 
राजू भैय्याने अतिशय प्रेमाने वेगवेगळे पतंग तयार करुन, संक्रांतीच्या वेळेला विकले आहेत. आँखेदार, गोला, चांददार रॉकेट, भिंगरी असे अनेक पतंग त्यात होते. पण त्याने बनवलेली सर्वांत बलाढ्य पतंग म्हणजे, ढढ्ढा पतंग आणि सर्वांत सुंदर पतंग म्हणजे चिंगरी. दोघी बहिणी, पण ढढ्ढाला आपल्या ताकदीचा गर्व चढून ती इतर पतंगांशी वाईट वागते. आँखेदारशी पेच लढल्यावर ढढ्ढा हरेल की चिंगरी येऊन तिला वाचवेल? तिला तिची चूक लक्षात येईल का? पतंगांद्वारे अतिशय सुंदर असा संदेश ’कटी पतंग’ या एकांकिकेद्वारे दिला आहे.
 
चिनूचे आईवडील कोरोनामध्ये देवाघरी गेल्यावर ती भाजी विकते आणि तिची ताई रेणुकाबरोबर राहते. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या ‘विष्णूजी की रसोई’मध्ये लहान मुलांच्या पाककला स्पर्धेत चिनूला सहभाग मिळाल्यामुळे, तिथे आलेल्या श्रीमंत मुलांना काय वाटेल? तिला स्वीकार केलं जाईल? ती स्पर्धा जिंकून, तिच्या आवडत्या शेफबरोबर सेल्फी घेऊ शकेल? समाजातल्या अशा त्रुटींवर आणि एका लहान मुलीच्या जिद्दीमुळे ती काय काय करू शकते, यावर वाच्य करणारी ‘सेल्फी’ नावाची सुंदर अशी एकांकिका.
 
मी: हो बरोबर, पण काही नाटकं ही खूप मोठा विचार घेऊन येतात. त्यांना खूप महत्त्वाचा संदेश द्यायचा असतो, त्यांचं काहीतरी म्हणणं असतं, त्यांना खूप बोलायचं असतं. अभिनेत्याला द्यायचं असतं.
अंतरा: म्हणजे तुला ऐतिहासिक, सामाजिक आणि संस्कारक्षम नाटकं, सांस्कृतिक वारसा जपणारी अशी नाटकं म्हणायचं आहे का?
मी: अगदी बरोबर! शेवटी नाटक म्हणजे काय? तर नाटक म्हणजे विचार, विचारांतून उत्पन्न होणारे भाव आणि त्यातून जन्माला आलेल्या कलाकृतीचं सादरीकरण, प्रकटीकरणसुद्धा म्हणू शकतो; कारण त्याला जिवंतपणा आहे. लेखक विचार मांडतो, दिग्दर्शक त्यातले भाव ओळखतो, त्यांना योग्य दिशा देतो आणि अभिनेत्याच्या माध्यमातून तो ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. त्याला साजेसे नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना येते; जी भावार्थ पोहोचवायला मदतनीस ठरते. एकूण बघता, नाटकाला प्रेक्षकांशी थेट संवाद साधायचा असतो, प्रभाव पाडायचा असतो प्रेक्षकांच्या मनावर, बुद्धीवर आणि प्रेक्षागृहातून बाहेर पडल्यावर त्यांच्या चालण्या-बोलण्यावर. हे सगळं घडत जातं अगदी कळत-नकळत. याचा प्रभाव कोणावर कसा होईल, याचा काही मापदंड नाही. त्याचे मोजमाप करणे अवघडच.
 
अंतरा: असं जर आहे, तर मग विचार महत्त्वाचा. छोटा का मोठा, हे आपण कसं ठरवणार?
मी: तेही बरोबरच आहे. मग आपण असं म्हणूया का, की काही नाटकांचं उद्दिष्ट्य मोठं असतं. विषय समकालीन नसला, तरी कालबाह्य होत नाही.
अंतरा: एवढा सगळा विचार करून नाटक लिहिणं, ते बसवणं, सादर करणं म्हणजे कलाशक्तीचं प्रदर्शनच नाही, तर आताच्या भाषेत ‘सॉफ्ट स्किल्स’चा विकास आहे. आई, तुला माहीत आहे, तू ही सगळी जी नाटकं लिहिली आहेस, ती आता ‘एआय’सुद्धा जनरेट करू शकतो.
मी : अरे वा! पण ते कसं काय?
अंतरा: चॅटजीपीटी तुला माहीतच आहे. पण एक सॉफ्टवेअर आहे, ज्यात दोनजण मिळून एकत्र संहिता लिहू शकतात. तो फॉरमॅट सेट करतो, तो माईंड मॅपिंग करतो. आणखीही बरेच फीचर्स त्यात आहेत त्यात, जसं की एजेंटिक ‘एआय.’ ज्यात तुम्ही तुमचा अजेन्डा सांगायचा आणि त्यावरून ‘एआय’ तुमच्याकरिता सारं काही जनरेट करतो.
 
मी: काय गंमत आहे बघ, एजेंटिक ‘एआय’ला मान्यता आहे, पण तुझ्या मैत्रिणीच्या मैत्रीच्या भाषेत सांगायचं झालं तर अजेंडा असलेले नाटक, जसे की ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘राजे शिवबा जी’ आपल्या मातीशी जोडलेली आहेत, या आपल्या गोष्टी आहेत, त्यांच्याबद्दल सांगायला गेलो, शिकवायला गेलो की स्पष्टीकरण मागतात. इथपर्यंत ठीक आहे पण, जेव्हा रामाचा विषय आहे, तो फक्त रामनवमीला करा. रामाचा विषय आहे, म्हणून नाटकाचा प्रयोग विकत घेता येणार नाही. शिवाजी महाराजांवर नाटक आहे, म्हणून ते मराठीतच करा याचा आग्रह धरतात, तेव्हा मला वाईट वाटतं. अरे केवळ बालनाट्य आहे, म्हणून तुम्ही त्याकडे का बघू शकत नाही? उद्या नाट्यपूजा करताना दिवा लावू नका, ते फार धार्मिक होतं, असं कोणी म्हटलं नाही म्हणजे मिळवलं! ही सद्य परिस्थिती आहे.
 
अंतरा: हे म्हणजे आताच्या ‘एआय’ला लक्षात ठेवा आणि आपल्या पोटच्या ‘एआय’ला विसरा असं सांगणं झालं!
मी: हाहाहा! त्यामुळे तुझ्या मैत्रिणीच्या मैत्रिणीला, पुढच्या वेळेस काही सांगायला जाऊ नकोस. आपण आपल्या विचारांचं नाटक करायचं आणि त्यातूनच उत्तर द्यायचं. बाकीच्यांना करू दे विचार. आपण बालरंगभूमीशी प्रामाणिक राहायचं आणि हे करत असताना, आपल्या मातृभूमीचं स्मरण करायचं.
अंतरा: आणि माझी आई अजेंडिक नाटकाची अजेंटिक ‘एआय’ आहे, असं जरी म्हटलं, तरी योग्य!
 
- रानी राधिका देशपांडे