‘एआय’शी संवाद साधताना : हवं तसं उत्तर मिळवण्याची कला

    14-Dec-2025
Total Views |

AI
 
जगभरात ‘एआय’ भूरळ घातली आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये ‘एआय’ आल्याने सामान्यांपर्यंत त्याचा वापर वाढला आहे. मात्र, आजही अनेकांना ‘एआय’चा वापर कसा करावा, याबाबत संभ्रम आहे. यामध्ये ‘एआय’कडून कशी माहिती मिळवावी, त्यासाठी नेमकी कशा स्वरुपात सूचना द्यावी, याचा आढावा घेणारा हा लेख...
 
मागच्या काही आठवड्यांत आदित्यने जयंतराव, त्यांचे मित्र यांना ’एआय’ने शिक्षण, आरोग्य, शेती आणि अगदी संरक्षण क्षेत्रात कशी क्रांती केली आहे, हे समजावले होते. यावेळी गणपतराव (जयंतरावांचे शेतकरी मित्र) म्हणाले, "आदित्य, तू म्हणालास की ‘एआय’ (उदा. जेमीनी, चॅटजीपीटी) आमच्या शेतीत मदत करतो. मी त्याला एकदा ‘टोमॅटोच्या पिकासाठी उत्तम खत’ विचारले, तर त्याने दहा-१५ वेगवेगळ्या खतांची यादी दिली, जी मला माहीतच नव्हती. मला विचारायचं होतं, माझ्याकडे जे खत उपलब्ध आहे (युरिया) ते कसं वापरावं. ‘एआय’ आणि मला हवं असलेलं उत्तर, यात एवढा फरक का येतो?”
 
आदित्य हसून म्हणाला "काका, तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. इथेच आपली आणि ‘एआय’ची संवाद साधण्याची पद्धत चुकते. ही चूक सुधारण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी नीट समजून घ्याव्या लागतील.” ‘प्रॉम्प्ट’ आणि ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग.’ हे अवजड शब्द ऐकून, जयंतराव आणि त्यांचे मित्र थोडे दचकले.
 
प्रॉम्प्ट (Prompt) म्हणजे काय?
 
‘प्रॉम्प्ट’ म्हणजे काही खूप किचकट किंवा कोड-भाषा नाही. ‘प्रॉम्प्ट’ म्हणजे फक्त, तुम्ही तुमच्या ‘एआय’ मित्राला दिलेली साधी आणि सोपी ‘सूचना’ किंवा ‘विनंती.’
 
असं समजा की, ‘एआय’ ही एक प्रचंड मोठी आणि माहितीने भरलेली खोली आहे. तुम्ही ‘प्रॉम्प्ट’द्वारे म्हणजेच सूचना देऊन ‘एआय’ला सांगता की, मला या खोलीतील नेमया याच कोपर्‍यातली, याच रंगाची आणि याच आकाराची वस्तू हवी आहे.
 
आपल्या दैनंदिन व्यवहारातील ‘प्रॉम्प्ट’ची उदाहरणे:
 
१.स्वयंपायाची सूचना: तुम्ही स्वयंपायाला नुसतं ‘जेवण बनव’ म्हणत नाही. तुम्ही सांगता, गोड नको, तिखट हवंय. वांग्याची भाजी बनव, पण नारळाचा वापर नको.
 
२.वकिलाचा प्रश्न: तुम्ही वकिलाला नुसतं माझी केस जिंकून दे, म्हणत नाही. तुम्ही त्याला केसची संपूर्ण पार्श्वभूमी, तुमचे पुरावे आणि तुमच्या अपेक्षा स्पष्टपणे सांगता.
 
या उदाहरणांमध्ये, नेमकी सूचना देणे म्हणजेच ’प्रॉम्प्ट’ देणे. ‘एआय’च्या जगातही हेच आहे. आता हीच दोन उदाहरणे पाहा:
सामान्य प्रॉम्प्ट: कविता लिहा. ‘एआय’ कोणतीही सामान्य कविता देतो.
 
प्रभावी प्रॉम्प्ट: पावसाची मजा आणि शेतकरी यांचे वर्णन करणारी, ‘बालभारती’च्या पुस्तकांसारख्या सोप्या मराठी भाषेत एक कविता लिहा, जी पाच वर्षांच्या मुलाला समजेल. ‘एआय’ तुम्हाला हवी असलेली, विशिष्ट शैलीतील कविता देतो.
‘एआय’ने तुम्हाला हवं असलेलं आणि अचूक उत्तर देण्यासाठी, तुम्ही जितका स्पष्ट, तपशीलवार आणि नेमका ‘प्रॉम्प्ट’ द्याल, तितका तुमचा फायदा होतो. आणि हे अचूक ‘प्रॉम्प्ट’ लिहिण्याचे कौशल्य म्हणजे ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग.’ ही इंजिनिअरिंगची पदवी नाही, तर स्पष्ट संवाद साधण्याची कला आहे. हे वाय ऐकून जयंतरावांना थोडं हायसं वाटलं.
हा कानमंत्र शिकण्याची गरज काय?
जयंतराव म्हणाले, "पण आदित्य, आम्ही तर गुगल वापरून पण माहिती मिळवतोच की! मग हा नवीन ‘प्रॉम्प्ट’चा किचकट फॉर्म्युला कशाला हवाय?”
 
सामान्य माणसासाठी ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’चे तीन मोठे फायदे :
 
१. ‘एआय’कडून मिळणार्‍या उत्तरांच्या दर्जावर परिणाम: तुम्ही अचूक ‘प्रॉम्प्ट’ लिहिला, तर ‘एआय’ तुम्हाला १०० टक्के तुमच्या गरजेनुसार उत्तर देतो. यामुळे तुम्हाला उत्तरामध्ये बदल करण्याची गरज पडत नाही.
 
२. कामाची गती: नोकरी करणारे लोक किंवा छोटे व्यावसायिक ‘एआय’चा वापर करून एका क्षणात मार्केटिंगच्या कल्पना, ईमेल किंवा रिपोर्ट बनवू शकतात. योग्य ‘प्रॉम्प्ट’मुळे कामाची गती वाढते आणि कामाचा तणाव कमी होतो.
 
३. उत्तम सल्लागार - ‘एआय’ची खरी ताकद वापरु शकतात. ‘एआय’ केवळ माहिती देत नाही, तो आरोग्य, कायदेशीर सल्ला, हवामान अंदाज आणि अगदी संरक्षण क्षेत्रातही मदत करतो. तुम्ही त्याला जितका चांगला ‘प्रॉम्प्ट’ द्याल, तितका तो अधिक प्रभावी सल्लागार म्हणून काम करतो.
 
थोडयात, ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’मुळे तुम्ही केवळ ‘एआय’ वापरत नाही, तर ‘एआय’ला आपल्या फायद्यासाठीही वापरता.
 
मूलभूत संकल्पना : प्रभावी प्रॉम्प्टचे ‘४C’
 
ठीक आहे आदित्य, मग एक चांगला ‘प्रॉम्प्ट’ नक्की कसा लिहायचा, याचा फॉर्म्युला दे. अप्पांनी आग्रह केला. आजोबा, कोणताही प्रभावी प्रॉम्प्ट तयार करण्यासाठी चार ‘C’ लक्षात ठेवा. हे चार उ तुमच्या ‘प्रॉम्प्ट’ला ‘सामान्य’वरून ‘उत्कृष्ट’ बनवतील.
 
१. स्पष्टता (Clarity): तपशीलवार सूचना :
तुम्ही ‘एआय’ला जे सांगणार आहात, त्यात अस्पष्टता नसावी. काय अपेक्षित आहे, हे अगदी स्पष्ट करा.
अस्पष्ट प्रॉम्प्ट: विम्याबद्दल माहिती दे.
स्पष्ट प्रॉम्प्ट : मी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे. माझ्या व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचे आगीपासून विमा संरक्षण आवश्यक आहे? त्याचे फायदे-तोटे एका तक्त्यामध्ये स्पष्ट करा. येथे तुम्ही ‘विम्याचा प्रकार’ आणि ‘उत्तराचे स्वरूप (तक्ता)’ स्पष्ट केले आहे.
 
२. संदर्भ (context): पार्श्वभूमी देणे : ‘एआय’ला तुमच्या प्रश्नाची पार्श्वभूमी द्या. तुम्ही कोणत्या भूमिकेत प्रश्न विचारत आहात, हे कळल्यास उत्तर अधिक वैयक्तिक (personalized) होते.
उदा. : मी ७५ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे. गेल्या आठवड्यात पाय दुखायला लागला आहे; पण मला डॉटरकडे जायला भीती वाटते. एका आयुर्वेदिक डॉटरच्या भूमिकेतून मला सांगा की, हे दुखणे कमी करण्यासाठी मी कोणते सोपे घरगुती उपाय करू शकतो. येथे वय, समस्या आणि कोणाची भूमिका हवी हे कळल्याने, ‘एआय’ अधिक सुरक्षित आणि योग्य उत्तर देतो.
 
३. मर्यादा (constraint): ‘एआय’ला सांगा की उत्तर किती मोठे असावे, कोणत्या भाषेत असावे आणि कोणते शब्द टाळावेत.
मर्यादेचे प्रकार :
लांबी (length): संपूर्ण उत्तर जास्तीत जास्त १०० शब्दांचे असावे.
स्वरूप (formal): फक्त तीन बुलेट पॉईंट्समध्ये यादी तयार करा.
भाषा : माझी मुलगी चौथीमध्ये आहे. तिला समजेल अशा, लहान वायांमध्ये मराठीतून माहिती द्या.
 
४. भूमिका (persona/role): ‘एआय’ला नोकरी देणे : ‘एआय’ला एक विशिष्ट भूमिका द्या. भूमिकेमुळे उत्तराची शैली आणि माहितीचा दर्जा लगेच सुधारतो.
 
उदाहरणे: एक निष्णात ट्रॅव्हल एजंट म्हणून, मला ६५ वर्षांवरील दहा लोकांसाठी कमी गर्दीच्या ठिकाणी पाच दिवसांचा शांत प्रवासाचा प्लॅन बनवून द्या. एक अत्यंत अनुभवी स्टॉक मार्केट गुरू म्हणून, इत्यादी.
"आदित्य, आता गणपतरावांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं! त्यांना फक्त ‘उत्तम खत’ विचारण्याऐवजी, ‘मी जालन्यात टोमॅटोचे पीक घेतो. माझ्याकडे युरिया खत उपलब्ध आहे. एका कृषितज्ज्ञाच्या भूमिकेत, कृपया युरिया खत वापरण्याची योग्य वेळ आणि प्रमाण सांगा,’ असं विचारायला हवं होतं,” जयंतराव म्हणाले.
”अगदी बरोबर आजोबा,” आदित्य म्हणाला. या चार C'sचा वापर करून तुम्ही, ‘एआय’ला केवळ प्रश्न विचारत नाही, तर त्याला तुमचा वैयक्तिक, अत्यंत हुशार आणि कार्यक्षम मदतनीस बनवता.
- डॉ. कुलदीप देशपांडे
 
(लेखक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना अ‍ॅनेलिटिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रांतील २५ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘एलिशियम सोल्युशन्स’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणार्‍या जागतिक स्तरावरील कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.)