सोनम वांगचुक यांनी ‘लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या’ म्हणत मागे उपोषण, आंदोलने केली. त्यानंतर प्रकरण खूप चिघळले. लडाखमधील सर्वच लोक सोनम वांगचुक यांचे समर्थक आहेत, असे वरवर दिसत होते. मात्र, आता नुकतेच ‘बुद्धिस्ट संघटन’चे पूर्व महासचिव स्कारमा नामताक यांनी ‘राज्याचा दर्जा द्यावा, ही मागणी लडाख आणि इथल्या बौद्धांच्या विरोधात आहे,’ असे म्हटले आहे. या संपूर्ण घटनेचा या लेखात घेतलेला आढावा...
अनेक शतकांपूर्वीची घटना आहे. लडाखमध्ये बौद्ध धम्माचा पगडा होता. पण राजा अली शेर खान आंचन याने, लडाखवर हल्ला केला. बौद्ध मंदिर कलाकृतींची अतोनात हानी केली. इथल्या जामयांग नामग्याल राजाला आणि सैनिकांना बंदी केले. पण, जनतेचा विरोध कायम होता. मग अली शेर खानने धूर्तपणे, राजा नामग्यालला पुन्हा सिंहासनावर बसवले. इतकेच नाही, तर त्याने स्वतःची मुलगी ग्याल खातून हिचा विवाह, राजा जामयांग नामग्याल याच्याशी लावला. सत्तेवर येताच राजा नामग्यालने पुन्हा राज्यात बौद्ध परंपरा समृद्ध केली, पण शेर खानने खेळी खेळली होती. ग्याल खातून ही राणी झाल्याने तिच्या माहेरचे लोक तिच्यासोबत असावेत, म्हणून अली शेर खानने शेकडो मुस्लिमांना, सुफी संतांना लडाखमध्ये आणून वसवले. या लोकांसाठी मग मशिदी आणि इतर मुस्लीम सोपस्कार, लडाखमध्ये सुरू झाले. राणी स्वतःच मुस्लीम असल्याने, या सगळ्याला अभय मिळाले. लडाखमध्ये धर्मांतरणाचे काम जोरात सुरू झाले. धर्मांतरणामुळे मुस्लीम लोकसंख्या वेगाने वाढू लागली आणि राज्यात शिया-सुफी पंथाचे प्राबल्य वाढले. लडाखमध्ये इस्लामने अशा प्रकारे पाय रोवला होता, हे लडाखचे बौद्धधर्मीय विसरले असतील का?
आता हा सगळा इतिहास आठवण्याचे कारण की, नुकतेच ‘बुद्धिस्ट संघटन’चे पूर्व महासचिव स्कारमा नामताक यांनी लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध केला आहे. ते म्हणाले की, "लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला चांगथांग, जंस्कार, नुबरा, शाम आणि आर्यन वैली भागातले लोक प्रखर विरोध करत आहेत. ही मागणी लडाख आणि बौद्धांच्या विरोधातली आहे.” त्यांच्या मते, लडाखला राज्याचा दर्जा मिळावा, यासंदर्भात ज्या संघटनांनी मसुदा तयार केला, त्यात बौद्ध समाजाचे पूर्णतः प्रतिनिधित्वच नाही. कारगिलच्या जंस्कार आणि आर्यन वैलीचे प्रतिनिधित्व यामध्ये नाही. तसेच ’लेह अपेक्स बॉडी’ या संघटनेत तीन बौद्ध आणि चार मुस्लीम सदस्य आहेत, तर ‘कारगिल डेमोेेक्रेटिक अलायन्स’मध्ये, सातपैकी केवळ एक बौद्ध सदस्य आहे. त्यामुळे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारसेाबत संवाद साधणार्यांमध्ये, लडाखचा बहुसंख्य असलेल्या बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्वच नाही.
त्यामुळेच या मागणीला आमचा विरोध असून, ही मागणी लडाखच्या बौद्धांविरोधात आहे. स्कारमा नामताक यांच्या या विधानाला महत्त्व आहे. कारण मागेच सोनम वांगचुक यांनी ‘लडाखला राज्याचा दर्जा द्या’ आणि त्याला सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करा, असे म्हणत उपोषण, आंदोलन सुरू केली होती. सोनम आणि त्यांच्या समविचारी लोकांनी लडाखच्या जनतेला सांगितले होते की, "आपण काश्मीरसोबत होतो, तेव्हा ‘कलम ३७०’ लागू होते. त्यामुळे आपल्या जमिनी-वन-पाणी सुरक्षित होते. बाहेरचे लोक (देशातील इतर प्रांतांतील लोक) लडाखमध्ये येऊन, जमिनी विकत घेऊ शकत नव्हते. आता केंद्रशासित प्रदेश झाल्याने लडाखमध्ये बाहेरचे लोक येतील, आपल्याला लुटतील, आपल्या संस्कृतीचा नाश होईल.” जल-जमीन-जंगल आणि संस्कृती वारसा याची भीती दाखवत, आजही देशात अनेक ठिकाणी समाजविघातक शक्ती लोकांना भडकवत असते. पुढे सोनम यांनी नेपाळ अरब राष्ट्रांमध्ये जशी सत्तापालट झाली, तशी सत्तापालट करण्याचे आवाहनही केले. त्यानंतर काहीच वेळा लडाखमध्ये प्रचंड हिंसा झाली, त्यात चार लोक मृत्युमुखी पडले, तर ८० लोक जखमी झाले. त्यांना जनतेत असंतोष माजवण्याच्या आरोपाखाली अटकही झाली आहे.
त्यानंतर लडाखचे दोन मुख्य समुदाय बौद्ध आणि मुस्लीम यांनी, पारंपरिक वाद सोडून दिले आणि ते लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी एकत्र आले आहेत. असे मत लडाखला राज्याचा दर्जा द्या, असे म्हणणारे नेतेमंडळी मांडू लागली. त्यात अर्थातच काँग्रेस आणि आपचे नेते पुढे होते. याचबरोबर बौद्ध -मुस्लिमांची एकी आहे, हे दाखवण्यामध्ये तथाकथित पुरोगामी आणि निधर्मी लोक भराभर पुढे आले. पण ‘लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या,’ म्हणणारे लडाखच्या बौद्धांचे प्रतिनिधित्व डावलतात, हे स्कारमा नामताक यांच्या म्हणण्यातून दिसून येते, असो!
या सगळ्यामध्ये देशविघातक शक्तींचा मागोवा घेणेही गरजचेे आहे. दुर्गम प्रदेश उर्वरित भारताशी जोडण्यासाठी, समृद्धी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चीनला शह देण्यासाठी, केंद्र सरकारच्या अनेक परियोजना लडाखमध्ये सुरू आहेत. चांगथांग येथील सौरपवन परियोजनेमुळे, लडाखच्या लाखो घरांमध्ये पर्यावरणाची हानी न करता वीज पोहोचणार आहे. तसेच लडाखचे श्योक टनेल. सैन्याची सुरक्षा आणि सैन्य रसद पुरवणे, यासाठी हे टनेल म्हणजे मैलाचा दगड आहे. पण या सगळ्या योजना यशस्वी झाल्या, तर लडाखमध्ये सुबत्ता येईल, इथल्या लोकांना देशाविरोधात चिथावता येणार नाही, तसेच लडाखमध्ये षड्यंत्र रचून बौद्ध समाजाला अल्पसंख्याक करताही येणार नाही, हे समाजविघातक शक्तींना कळाले.
त्यामुळेच देशभरात ज्या प्रकारे ते विकासात्मक कामाला विरोध करतात, अगदी तसेच त्यांनी लडाखमध्येही पर्यावरणाच्या नावावर, जनजातीच्या संस्कारसंवर्धनाच्या नावावर त्यांनी योजनांना विरोध सुरू केला आणि लोकांना भडकावणे सुरू केले. पण लडाखच्या जनतेला विकास आणि सुरक्षा हवी आहे. दुसरीकडे त्यांनी अनुभवले होते की ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’च्या घटना असू दे की, बौद्ध-मुस्लीम संघर्षाची आणखी काही कारणे या सगळ्यांमध्ये योजनांना विरोध करणारे, केंद्र सरकारला विरोध करणारे लोक कधीही बौद्ध समाजाच्या बाजूने उभे राहिले नाहीत. त्यात आता लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या शिष्टमंडळामध्ये, मुस्लिमांचे प्राबल्य आहे. त्याबाबतही बौद्ध समाजाची ते बाजू मांडत नाहीत. त्यामुळेच इथला बौद्ध समुदाय या विघातक शक्तीचे समर्थन करताना दिसत नाही. लडाखचा बौद्धसमाज आपल्या हक्कासाठी जागा आहे. यावरून वाटते की, भूतकाळात राजा नामग्याल यांनी ग्याल खातूनशी विवाह झाल्यानंतर, लडाखमध्ये सुरू झालेले धर्मांतरण आणि त्याद्वारे होणारे बौद्ध धर्माचे नुकसान याबाबतचे सत्य ओळखले नव्हते. पण आजचा लडाखमधील बौद्ध समाज सत्य ओळखताना दिसतो. ‘ओम मणि पद्मे हुम्’ म्हणत, ते बौद्ध धम्माचे पालन आणि रक्षण करताना अग्रेसर आहेत. कारण लडाखचा बौद्ध समाज इतिहास विसरला नाही.