राष्ट्रवादी दृष्टिकोनातून केलेले विवेचन

    14-Dec-2025
Total Views |
Eksha
 
समाजमाध्यमीय लेखन हे सामान्यतः प्रतिक्रियात्मक आणि म्हणूनच तात्कालिक असते. त्यावर कोणतेही संपादकीय संस्कार झालेले नसतात. त्यामुळे त्या लेखनात तथ्य किती आहे हेही ठरवणे कठीण असते. मात्र, अशाही व्यासपीठाचा काहीजण सयुक्तिक उपयोग करतात, जेणेकरून दर्जेदार लेखन अनेकांपर्यंत पोहोचावे. दत्ता जोशी हे अशांपैकीच एक. दीडएक दशक ते पत्रकारितेत सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी स्वतःस पुस्तक लेखनाला वाहून घेतले. मूलतः जोशी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे पदाधिकारी. याचेच प्रतिबिंब संघाच्या शताब्दीचे औचित्य साधत प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘एकशः सम्पत’ या पुस्तकात उमटले आहे. समाजमाध्यमांवर त्यांनी वेळोवेळी केलेल्या लेखनातील निवडक लेखांच्या पुस्तकाचा घेतलेला आढावा...
 
एकशः सम्पत हे या पुस्तकाचे शीर्षक म्हणजे, संघशाखेत दिली जाणारी एक आज्ञा आहे. त्या आज्ञेशी परिचय असणार्‍यांना त्याचे वैशिष्ट्य समजू शकेल, पण इतरांना कदाचित नाही. त्यामुळे लेखकाने सुरुवातीसच शीर्षकामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ते इष्ट. ही आज्ञा येताच आपले पद, अधिकार, धनिक स्थिती, वय हे सगळे विसरून, स्वयंसेवक म्हणून सगळेजण एका रांगेत उभे राहतात. संघाने केलेला समतेचा-समरसतेचा हा संस्कार असल्याचे लेखक लिहितो. हे शीर्षक संघाचे मर्म अधोरेखित करते. लेखांच्या विषयानुसार पुस्तकात काही विभाग करण्यात आले आहेत. पहिला विभाग हा लेखक ज्या संघप्रचारकांच्या सान्निध्यात आले, त्यांच्या आठवणींचा आहे. नुकतेच निवर्तलेले मधुभाई कुलकर्णी हे मूळचे कोल्हापूरचे. विक्रीकर खात्यातील नोकरीला रामराम ठोकत, १९६२ मध्ये ते प्रचारक म्हणून कार्यरत झाले.
 
पुढे ते गुजरातचे प्रांत प्रचारकही झाले. मधुभाईंच्या आठवणी जागवताना लेखक, एक प्रचारक कसा असंख्यजणांच्या आयुष्याला गंधित करू शकतो, याचे अनुभव कथन करतो. अशा संन्यस्त वृत्तीच्या प्रचारकांचे स्वतःचे म्हणून कुटुंब नसते; तेव्हा त्यांच्या मागून रडणार कोण? या प्रातिनिधिक प्रश्नाला व शंकेला लेखकाने उत्तर दिले आहे की, त्या प्रचारकाने ज्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला, असे हजारोजण हळहळतील. मात्र, संघ रडणारी माणसे तयार करीत नाही, तर लढणारी माणसे तयार करतो असे विधान करून, लेखक संघाच्या अविरत चालू राहणार्‍या कार्याचे मर्म विशद करतो. सव्वा रुपयाच्या बिस्कीट पुड्यावर दिवस काढणारे अतुल कारखानीस यांची, ‘मी काय तेथे पोट भरायला जातो का?’ ही त्यावरील प्रतिक्रिया, प्रचारकांच्या कष्टप्रद पण ध्येयवादी जीवनाचा मंत्र सांगणारी. डाव्या विचाराचा कन्हैय्या कुमार आलिशान हॉटेलमध्ये जेवल्यानंतरच समाज उत्थानाचे भाषण करतो, हे उदाहरण देऊन लेखक हा विरोधाभास नेमका टिपतो. सुरेशराव केतकर, ‘अभाविप’च्या तत्कालीन प्रदेशमंत्री वर्षा पवार यांच्या आठवणी अंतर्मुख करणार्‍या आहेत. फाटया, झिजलेल्या चपलांचा जोड तसाच वापरत राहण्याची पवार यांची आठवण, ज्या माणसांच्या खांद्यावर आताची इमारत उभी आहे, त्यांच्या त्यागाची, हालअपेष्टांची, समर्पित वृत्तीची व ध्येयवादाची जाणीव करून देणारी.
 
पुढील भागात लेखकाने काही राष्ट्रीय समस्यांच्या अनुषंगाने लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. ‘अभाविप’ने आयोजित केलेल्या ‘चलो काश्मीर’ किंवा १९९२च्या राम जन्मभूमी आंदोलनात लेखक स्वतः सहभागी असल्याने त्या घटनांवरील भाष्य प्रत्ययकारी झाले आहे. काश्मीरविषयक लेख हे पीडीपी-भाजप आघाडी, रद्दबातल झालेले ‘कलम ३७०’, कठुआ बलात्कार प्रकरण अशा घडामोडींशी निगडित आहेत. लेख मर्यादित शब्दसंख्येचे असून देखील, त्या विषयांशी निगडित अनेक कंगोरे त्यांनी उलगडून दाखविण्याचा प्रयत्न अवश्य केला आहे. २०१७ मध्ये ‘जम्मू-काश्मीर स्टडी सेंटर’तर्फे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत लेखक सहभागी झाले होते, तेव्हाच जम्मूचे इस्लामीकरण होत असल्याचा अनुभव आल्याचेही लेखक नमूद करतो. १९८९ मध्ये ना. य. डोळे, पन्नालाल सुराणा व जगन फडणीस हे काश्मीरच्या दौर्‍यावर गेले होते व तेथे सर्व आलबेल असल्याचा अहवाल त्यांनी, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांना दिला होता. त्यानंतर काहीच महिन्यांत हजारो काश्मिरी पंडितांना काश्मीर खोर्‍यातून पलायन करावे लागल्याची आठवण, लेखक आवर्जून नमूद करतो आणि एका अर्थाने समाजवाद्यांच्या आकलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. याच अनुषंगाने दिवंगत साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या शिष्या सहना विजयकुमार यांच्या, काश्मीर दाहक वास्तव कथनावर बेतलेल्या पुस्तकाचा परामर्श लेखक घेतो. तोच सांधा धरून लेखक अन्य एका लेखात भैरप्पा यांच्या साहित्याचा आपल्याला झालेला परिचय व नंतर त्यांचे साहित्य आपण झपाटून कसे वाचले, याचा अनुभव लिहितो.
 
पर्यटनाशी निगडित विभागात काश्मीर, अंदमान, पूर्वांचल अशा भागांचा समावेश आहे. पर्यटन करताना आपल्याला वर्तमानाचे दर्शन घडत असले, तरी प्राचीन भूतकाळ सतत डोक्यात येत राहतो, असे सांगून लेखक त्या त्या स्थळांच्या आताच्या वैशिष्ट्यांची नोंद घेतानाच, काश्मीरमध्ये इस्लामी दहशतवाद्यांनी घातलेला हैदोस, पूर्वांचलात ब्रिटिश राजवटीपासून ख्रिस्ती मिशनर्‍यांनी केलेले धर्मांतरण, अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा झालेला अनन्वित छळ या सगळ्याची आठवण करून देतो. विशेषतः पूर्वांचलात भय्याजी काणे यांच्यासारख्यांनी राष्ट्रवादी कार्याची केलेली पायाभरणी, विवेकानंद केंद्रातर्फे सुरू असलेले कार्य याचेही लेखक संदर्भ देतो. १९९९ मध्ये त्रिपुरात ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या चार प्रचारकांचे झालेले अपहरण व नंतर त्यांची झालेली हत्या याची आठवण करून देऊन, संघ कार्यकर्त्यांनी किती पराकोटीचा त्याग केवळ मातृभूमीच्या कल्याणाच्या ध्येयाने केला आहे, याची जाणीव लेखक करून देतो.
 
अन्य काही लेख हे अगदी त्रोटक असले, तरी त्यांत लेखकाने नेमया मुद्द्यांची पखरण केली आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालयातील सेवावृत्तीचे डॉक्टर किंवा संघाच्या शिबिरांत घराघरातून पोळ्या जमा करण्याची रीत का आहे? अशा काही मुद्द्यांना अनुसरून संघ संस्कार, संघकार्याची शैली यांवर लेखक प्रकाश टाकतो. ‘भटके विमुक्त विकास परिषदे’चे पूर्णवेळ कार्यकर्ते उमाकांत मिटकर हे संभाजी ब्रिगेडकडून संघाकडे कसे वळले, हा एका लेखातील अनुभव वाचनीय. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या एका विधानाची मीमांसा करणारा एक लेख हिंदी भाषेतील आहे. तो मूळचा हिंदीतील असला, तरी पुस्तकात त्याचे भाषांतर दिले असते तर ते सयुक्तिक ठरले असते. पुस्तकातील शेवटचा विभाग हा लेखकावर आणि मुख्यतः त्यांच्या ‘तुमी बी घडाना’ या पुस्तकावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, राजेश मंडलिक व धनश्री बडेकर यांच्या मनोगतांचा आहे.
 
पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली आहे. दत्ता जोशी यांचे हे लेख सकारात्मक, हृदयाला भिडणारे व राष्ट्रविचारांशी सूक्ष्म धागा जोडलेला असल्याचा अभिप्राय त्यांनी दिला आहे, तो खराच. पुस्तकातील सर्वच लेख लेखकाने पोटतिडकीने लिहिले असून, जेथे राष्ट्रविघातक काही आढळले तेथे लेखकाने सात्विक संतापाने लिहिले आहे. जेथे राष्ट्रवादी, हिंदुत्वाचा गौरव होणारे काही आहे, तेथे अभिमानाने लिहिले आहे; तर जेथे त्याग व समर्पण आहे, तेथे भावुकतेने लिहिले आहे. याच ओघात लेखकाने एका बदलाची दखल घेतली आहे, तीही महत्त्वाची. राष्ट्रीय विचार, हिंदुत्व यांचीच मांडणी करणारे, पूर्वीही आणि आताही ठामपणे पण सौम्यपणे मांडणी करतात. नव्याने कथित हिंदुत्ववादी झालेले मात्र, त्यांच्यापेक्षा मोठ्या आवाजात ते मांडतात. हे लेखकाचे शल्य नोंद घेण्याजोगे.
 
पुस्तकातील सर्वच लेख हे संघ-हिंदुत्व या मुद्द्यांशी निगडित आहेत. ते छोटेखानी असले, तरी समाजमाध्यमांचा विवेकी वापर करून राष्ट्रवादी दृष्टिकोनातून लिहिलेले आहेत, हे त्यांचे वैशिष्ट्य.
 
पुस्तक : एकशः सम्पत
 
लेखक : दत्ता जोशी
 
प्रकाशक : द कॅटॅलिस्ट, छत्रपती संभाजी नगर 
 
पृष्ठसंख्या : १२६
 
मूल्य : रुपये २००
 
- राहूल गोखले