नर्मदा नदीच्या किनार्यावर वसलेले आणि ‘मध्य भारतातील वाराणसी’ असे नावलौकीकप्राप्त महेश्वर ही होळकर साम्राज्याची राजधानी होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महेश्वरमध्ये मंदिरे, दगडी घाट उभारले, जे आजही अगदी सुस्थितीत आहेत. महेश्वरमध्ये अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ बांधलेल्या अहिल्येश्वर शिवमंदिराविषयी आज जाणून घेऊया...
नर्मदा... भारताच्या सर्वात प्राचीन, पवित्र आणि मातृहृदयासारख्या शांत नद्यांपैकी एक. तिच्या प्रवाहात एक विलक्षण गंभीरता आहे. हिमालयातून नव्हे, पर्वताच्या उंचींच्या गर्वातून नव्हे, तर पृथ्वीच्या अंतःकरणातून जन्म घेणारी ही नदी. अशी नदी ज्या भूमीला स्पर्श करते, त्या भूमीत शंकराचार्यांसारखे जगद्गुरु साधना करतात. महेश्वर ही अशीच भूमी, जिथे नर्मदेचा हळुवार नाद, शांत वारा, घाटांची भव्य शिस्त आणि दगडात कोरलेल्या शिवभक्तीचा सुगंध सदैव दरवळत असतो.
महेश्वर म्हणजे अवंतिकेचे प्राचीन प्रतिबिंब. इतिहासात ‘महिष्मती’ म्हणून ओळखले जाणारे हे स्थान, रामायण-महाभारतातील उल्लेखांमुळेही पवित्र मानले गेले आहे. परंतु, या पवित्र नगरीला तिचे खरे दिव्य वैभव मिळाले ते एका अद्भुत स्त्री-पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या हातून! त्यांनी महेश्वरला केवळ राजकीय केंद्रच बनवले नाही, तर भारतीय धर्म-संस्कृतीचे ध्रुवतारे म्हणून गावाचा पुनर्जन्म घडवला. या पुनर्जन्माचा मुकुटमणी म्हणजे अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ बांधलेले अहिल्येश्वर शिवमंदिर आणि त्याच्या पायथ्याशी नाजूकपणे पसरलेले दगडी घाट.
अहिल्येश्वर मंदिराची पहिली छाप म्हणजे, त्याचे विलक्षण सौंदर्य. राजवाड्याच्या मार्गाने आपण पायर्यांच्या जवळ येतो, आकाशाशी स्पर्धा करणारे शिखर आणि प्रचंड पसरलेली नदी आपल्याला दिसते. मंदिराचे स्थापत्य मध्ययुगीन मराठा आणि प्राचीन नागर शैलीच्या सुंदर मिश्रणातून जन्मलेले आहे. मोठे शिखर, त्याखाली लहान शिखरांची रचना जणू पर्वताच्या लहरी वरच्या दिशेने उंचावत आहेत आणि त्याच्या मधोमध उभे असलेले गर्भगृह, ज्यात शिवलिंग शांततेत विसावलेले. त्या शांततेत नर्मदेचा नाद मिसळतो-एक आंतरिक, आध्यात्मिक संगीत निर्माण करत. अहिल्येश्वर मंदिरात प्रवेश करताना जाणवते की, हे मंदिर ‘शिवतत्त्वाचे’चे भव्य रूप आहे, पण ते कोणताही कोलाहल निर्माण करत नाही.
अहिल्याबाईंचा इतिहास म्हणजे, स्त्रीशक्ती, धर्मनिष्ठा आणि प्रचंड दूरदृष्टीचा अतुलनीय संगम. त्या राज्यकर्त्या होत्या, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मातृत्वाची उब, साधनेची तीव्रता आणि कलावैचारिक दृष्टी अविश्वसनीयरीत्या एकत्र नांदत होती. महेश्वर त्यांचे हृदय होते. नर्मदेच्या किनार्यावरच त्यांनी आपला राजप्रासाद उभारला. राजवाड्याच्या खिडकीतून दिसणारी नर्मदा त्यांच्यासाठी केवळ नदी नव्हती-ती जीवनधारा होती, शक्तीचा स्रोत होता, ध्यानाचा सहचर होता. अहिल्याबाईंचे एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या दृष्टीत भारतातील सर्व मंदिरांचे संगोपन हाच राजधर्म होता. काशीविश्वनाथाचे सुप्रसिद्ध पुनरुज्जीवन त्यांच्याच कारकिर्दीत संपन्न झाले. बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, रामेश्वरम, सोमनाथ, गया, उज्जैन- अशी असंख्य तीर्थक्षेत्रे त्यांच्या संरक्षणाखाली नव्या तेजाने उजळून निघाली.
परंतु, महेश्वरच्या मंदिरांना त्यांनी दिलेले प्रेम विशेष होते. नदीकाठावर उभ्या असलेल्या प्रत्येक देवालयाचा, प्रत्येक दगडी घाटाचा आणि प्रत्येक सभामंडपाच्या रचनेचा आत्मा म्हणजे अहिल्याबाईंची भक्ती! अहिल्याबाईंनी फक्त मंदिरांना पुनरुज्जीवितच केले नाही, तर स्थानिक कला - हातमागदेखील जगावला. त्यावेळी कारागिरांना एकत्र आणून सुरू केलेला प्रयोग आजही सुरू आहे. अतिशय सुप्रसिद्ध ‘महेश्वरी साडी’ ही तिथेच हातमागावर बनवली जाते.
महेश्वरची सर्वात खुणखूणीत गोष्ट म्हणजे त्याचे घाट. सकाळचे कुंद धुके नदीवर पसरलेले असताना दिसणारी घाटांची रचना - ती लय, ती शिस्त, त्या सरळसोट पायर्या, नाजूक कमानी आणि त्यांच्यामधून दिसणारा निळसर नदीचा पृष्ठभाग, हे सर्व एकत्र आले की, जणू संपूर्ण विश्वच शांततेने भरून जाते.
नर्मदेचा प्रत्येक लाटेचा आवाज या घाटांवर मृदू स्वर बनून येतो. घोड्यांची टाप, पुजार्यांच्या मंत्रोच्चारांचा गंभीर स्वर, आरतीचे घंटानाद आणि पाण्यात उतरलेल्या पायांचे मंद थपक, या सर्वांचे मिश्रण महेश्वरला एक अनोखे आत्मसंगीत प्रदान करते. कदाचित म्हणूनच आजही तिथले होळकर घराण्याचे गुरुजी रोज मातीची सहस्त्रलिंग तयार करतात, पूजा करतात आणि नर्मदेला अर्पण करून टाकतात. ज्या ठिकाणी आपल्या घरातल्या गणपतीचे विसर्जन होळकर करायचे त्याला सहस्त्रधारा म्हणतात. शांत वाहणारी नदी हजारो अजस्त्र दगडांच्या कानाकोपर्यात प्रवेश करते आणि उग्र रूप धारण करते. उत्पत्ती आणि लय यांचा अनुभव तिथे येतो.
घाटांवरून अहिल्येश्वर मंदिराकडे पाहताना, त्याच्या शिखरांची मऊ सावली नदीवर पडते आणि नदी पुन्हा ते सौम्यपणे परत आकाशाकडे परावर्तित करते. मंदिर आणि नदी यांच्यातील हा अद्भुत, अव्यक्त संवाद महेश्वरच्या सौंदर्याचा गाभा आहे. महेश्वरला गेलेला प्रत्येकजण एकच गोष्ट जाणतो-ही भूमी केवळ पाहण्याची नाही, ही भूमी अनुभवण्याची आहे. घाटावर बसून नर्मदेच्या प्रवाहाकडे पाहताना, अहिल्येश्वराच्या शिखरावरून पडणारी सावली पाहताना आणि मंदिरातील दिव्य शांतता अनुभवताना एकच गोष्ट जाणवते-
काही ठिकाणे काळाने नाही, तर भक्तीने अमर होतात.
महेश्वर हे त्यापैकीच एक!
आणि त्याच्या हृदयात कोरलेले अहिल्येश्वर मंदिर-
अहिल्याबाईंच्या हृदयाचेच दगडी रूप!
- इंद्रनील बंकापुरे