कवी यशवंत दि. पेंढारकर यांच्या वरील काव्यपंक्ती मातृप्रेमाची महती विशद करणार्या. मूल कितीही मोठं झालं, तरी आईसाठी ते लहानच असतं. पण, मुलं जशी मोठी होत जातात, तशी आपापल्या कामात, वैयक्तिक आयुष्यात इतकी गुरफटून जातात की, त्यांना बरेचदा आईसाठीच वेळ नसतो आणि आताच्या डिजिटल आणि ‘एआय’च्या जगात संपूर्ण जग जवळ आलं असलं, तरी नाती एकमेकांपासून काहीशी दुरावली आहेत. अशीच काहीशी आगळीवेगळी आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी गोष्ट आपल्याला ‘उत्तर’ या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. दि. १२ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे अशा कसदार कलाकारांमुळे हा चित्रपट अधिकच खुलला आहे.
उमा भालेराव (रेणुका शहाणे) आणि निनाद भालेराव (अभिनय बेर्डे) ही मायलेकराची जोडी. निनाद म्हणजेच चित्रपटातला नन्या, ज्याचे वडील हे बालपणीच देवाघरी गेले. आईने एकटीनेच त्याचा आणि घराचाही सांभाळ केला. अर्थात, दोघांचंच हे कुटुंब असल्याने आईसाठी तिचं मूल हेच तिचं विश्व. त्याच्यासाठी तिने इच्छा असूनही दुसर्या लग्नाचा विचार कधीही मनात आणला नाही. अशी एकंदरीतच कथेला सुरुवात होते.
उमा ही आकाशवाणी, पुणे येथील निवेदिका, तर लहानसा नन्या आता इंजिनिअरिंगचं आणि त्यातही ‘एआय’चं शिक्षण घेत असतो. उमाला आपल्या मुलाविषयी अफाट प्रेम. त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तिला माहीत असतात. पण, ‘जेन-झी’चे प्रतिनिधीत्व करणारा निनाद त्याच्या विश्वातच गुरफटलेला असतो. आईचे सततचे फोन आणि तिची काळजी कुठेतरी त्याला जास्तीची वाटत असते. क्षीप्रा (ऋता दुर्गुळे) ही निनादची बालमैत्रीण. दोघेही एका महाविद्यालयात शिक्षण घेत असतात. पुढे निनादला महाविद्यालयात एक प्रोजेक्ट करायचा असतो आणि तोही ‘एआय’ तंत्रज्ञान वापरुन. यावेळीच अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे या माय-लेकाच्या नात्याला एक वेगळं वळण लागतं आणि एक अतिशय भावनिक कहाणी प्रेक्षकांना हळवं करून सोडते.
या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन तसेच गीतकार म्हणून क्षितीज पटवर्धन यांनी ही धुरा सांभाळली आहे. लेखक आणि गीतकार म्हणून परिचित असलेल्या क्षितीजने पहिल्यांदाच दिग्दर्शनात नशीब आजमावलं आहे, हे विशेष. आपल्या उत्कृष्ट लेखन कौशल्याप्रमाणेच दिग्दर्शक म्हणूनही क्षितीजने या चित्रपटातून आपली छाप सोडली आहे. ‘आईला सगळं माहीत असतं’ हे गाणं तर चित्रपटात आहेच, पण अनेक दृश्यांमध्ये दिग्दर्शनातूनही हीच भावना उत्तमरित्या मोठ्या पडद्यावर चितारली आहे. आईच्या जगण्यातलं सौंदर्यच क्षितीजने ‘उत्तर’मध्ये खुलवलेलं दिसतं. त्यामुळे दिग्दर्शकाला अपेक्षित असलेली भावनांची गुंतागुंत अगदी १०० टक्के प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे, असे नक्कीच म्हणता येईल.
चित्रपटातील कहाणी अगदी वेगाने पुढे सरकते. तसेच चित्रपटाची गोष्ट इतकी हळवी असताना, त्याला तितक्याच भावनोत्कट गीतांची जोड मिळाली असती, तर या चित्रपटाचा प्रभाव अधिक खोलवर जाणवला असता. मात्र, तरीही दिग्दर्शकाने कथा सुंदररित्या मांडली आहे, याबद्दल कौतुक करायलाच हवे. याशिवाय, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेली ठिकाणे. खर्याखुर्या ठिकाणी चित्रीकरण केल्याने हा चित्रपट पाहताना आणखीनच आपलासा वाटतो. मग ते पुण्यातील लहानसं वन-बीएचके असो किंवा कोकणातलं लहानसं गाव.
चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे, निर्मिती सावंत अशी उत्तमोत्तम कलाकारांची फळी आहे. कलाकारांची अशी समर्पक आणि सुयोग्य निवड हेच खर तर या चित्रपटाचे मोठे यश. आईच्या भूमिकेत रेणुका शहाणे अगदी १०० टक्के खर्या उतरल्या आहेत. तसेच निनादची भूमिका अभिनयने सुंदररित्या वठवली आहे. दुसरीकडे ऋता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत या अगदी कमी काळासाठी पडद्यावर दिसत असल्या तरी, त्यांच्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखा त्यांनीही चोख पार पाडल्या आहेत. निर्मिती सावंत यांची अगदी लहान भूमिका कथेला अतिशय भावनिक वळण देऊन जाते. त्यामुळे कलाकारांनी आपलं काम सुंदररित्या निभावलं आहे.
‘एआय’ आणि ‘आई’चं हे कनेशन नेमकं काय आहे, हे तर चित्रपटातच पाहावं लागेल. पण, आपल्या आयुष्यातल्या ‘आई’ या महत्त्वाच्या नात्याला, व्यक्तीला ‘एआय’ किंवा अन्य कोणीच बदलू शकतं का, याचं ‘उत्तर’ हा चित्रपट नक्कीच देईल. चित्रपट सुरू असताना काही दृश्ये पाहून तुमच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच पाणावतील आणि चित्रपटगृहाच्या बाहेर पडताना जड अंतःकरण घेऊनच पडाल. अशी ही कुटुंब आणि नात्यांची गोड आणि तितकीच हळवी गोष्ट पाहायची असेल, तर हा चित्रपट नक्कीच पाहा.
लेखन, दिग्दर्शन आणि संवाद : क्षितीज पटवर्धन
कलाकार : रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे, निर्मिती सावंत