एकीकडे भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अजूनही सुरू असून, परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चाही झाली. या वाटाघाटी आणि एकूण भारत-अमेरिका संबंधांमध्ये अमेरिकेचे भारतातील नवनियुक्त राजदूत सर्जिओ गोर यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असणार आहे. त्यानिमित्ताने नेमकी सर्जिओ गोर यांची पार्श्वभूमी आणि त्यांची भारत-अमेरिका संबंधांतील भूमिका यांचा धांडोळा घेणारा हा लेख...
अमेरिकेच्या भारतातील नवनियुक्त राजदूतांचे नाव आहे- सर्जिओ गोर, वय वर्षे ३८. जन्म देश-उझबेकिस्तान. मुत्सद्देगिरीचा (डिप्लोमसी) अनुभव शून्य. मग, भारताचा राजदूत म्हणून ट्रम्प सरकारकडून सर्जिओ गोर यांची नेमणूक कशाकरिता? तर डोनाल्ड ट्रम्प यांचा हा खास विश्वासू माणूस. डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संपर्क करण्याची अनुमती. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांचे हलके कान भरण्यात सर्जिओ गोर हे वाकबगार असू शकतात. पण, त्यांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत असणार्या जवळिकीचा फायदाही करून घेता येऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांना ‘कॉर्पोरेट’ जगताचा अनुभव आहे. त्यामुळे कॉर्पोरेट जगतात वापरले जाणारे ‘फंडे’ डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणात वापरताना दिसतात. सर्जिओ गोर यांना भारताचा राजदूत म्हणून दिलेल्या जबाबदारीव्यतिरिक्त मध्य आशिया आणि दक्षिण आशिया यांसाठीचे ते अमेरिकेचे प्रतिनिधी असतील, असे दिसते.
सन २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काम करणार्या ‘व्हाईट हाऊस’मधील कर्मचारीवर्गाचे प्रमुख म्हणून गोरे यांनी काम केले होते. सर्जिओ गोर यांनी रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांचे प्रवक्ते म्हणूनही काम केले आहे. सन २०१६ मध्ये म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गोर यांना ट्रम्प यांच्या अंतर्गत वर्तुळात प्रवेश मिळाला होता. रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे निवडणूक निधी उभारणीसाठीचे त्यांचे मोठे योगदान होते.
एलॉन मस्क यांनी सर्जिओ गोर यांच्याबद्दल मागे कडवट प्रतिक्रिया दिली होती. एलॉन मस्क यांनी शिफारस केलेल्या माणसाचा पत्ता कापण्यात सर्जिओ गोर यांचा हात असल्याचा एलॉन मस्क यांचा आरोप होता. त्यामुळे एलॉन मस्क यांनी सर्जिओ गोर यांचा उल्लेख ‘सर्प’ असा केलेला होता. थोडयात, डोनाल्ड ट्रम्प यांचे कान भरण्यात सर्जिओ गोर हे एकदम कुशल असावेत.
सर्जिओ गोर यांची भारताच्या राजदूतपदी निवडले जाण्याची एकमेव पात्रता म्हणजे, ते डोनाल्ड ट्रम्प यांचा खास माणूस म्हणून काम करताना दिसू शकतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सर्जिओ गोर यांचा थेट संपर्क असणार आहे. प्रत्येक लहानसहान गोष्टींची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांना दिली जाईल, हे वेगळे सांगायला नको.
नुकतेच अमेरिकेत ज्यांचा मृत्यू झाला, ते कडवे ख्रिस्ती चार्ली कर्क हे सर्जिओ गोर यांचे जवळचे मित्र होते. त्यामुळे सर्जिओ कर्क यांच्या राजदूतपदाच्या शपथविधीसाठी चार्ली कर्क यांची पत्नी एरिका कर्क उपस्थित होती. सर्जिओ गोर यांना ‘व्हाईट हाऊस’च्या ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांनी शपथ दिली होती. चार्ली कर्क यांनी हिंदू धर्मविरोधी विधाने केली होती. हे सर्व येथे सांगावयाचे कारण, म्हणजे सर्जिओ गोर यांचे भारतामधील मिशनरी कामांवर किती लक्ष असणार आहे, हे बघावे लागेल.
सर्जिओ गोर यांच्याकडे भारताशिवाय मध्य आशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशाचीही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. भारताला पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या रांगेमध्ये उभे करण्याची अमेरिकेची पूर्वीपासूनच जुनी वाईट खोड. त्यामुळे सर्जिओ गोर हे वर उल्लेखलेल्या देशांना अधूनमधून भेट देताना दिसणार आहेत.
सर्जिओ कर्क हे भारतात राजदूतपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोणती मोहीम हाती घेतात, हे बघावे लागेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीत त्यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून एकेकाळी काम केलेल्या जॉन बोल्टन यांनी सर्जिओ गोर यांच्या भारतातील राजदूतपदाच्या नियुक्तीवर आणि गोर यांच्या पात्रतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सर्जिओ गोर यांना काडीमात्र अनुभव नसल्याचे विधान जॉन बोल्टन यांनी केले होते. अर्थात, बोल्टन यांचा रोख भारत आणि रशिया यांच्या राजकीय संबंधांकडे जास्त होता. सर्जिओ गोर यांनी त्यांचे लक्ष्य हे भारत आणि अमेरिका यांच्या धोरणात्मक सामरिक संबंधांकडे असेल, असे जाहीर केले होते. अमेरिकेचे भारतातील पूर्व राजदूत एरिक गार्सेटी यांनी किमान अमेरिकेतील लॉस एंजेल्सच्या महापौरपदी काम तरी केले होते. त्यामानाने सर्जिओ गोर हे एकदम अननुभवी आहेत.
सर्जिओ गोर यांनी ऑक्टोबरमध्ये भारताला भेट दिली होती आणि त्यावेळी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटले होते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्त असलेल्या एरिक गार्सेटी यांच्या कार्यकाळातच बांगलादेशातील शेख हसीना यांना अमेरिकेच्या पुढाकाराने सत्तेवरून हटविण्यात आले होते. सध्या अमेरिका आणि भारतामध्ये असलेल्या तणावपूर्ण राजकीय संबंधाच्या काळातच सर्जिओ गोर हे भारतात दाखल होत असल्याने, त्यांना भारतात कोणत्या विशिष्ट कामासाठी पाठविले जात आहे, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
सर्जिओ गोर यांना भारताबद्दलची कितपत माहिती आहे, याबद्दल शंका घेण्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. अर्थात, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार त्यांना वेळोवेळी जी माहिती देतील, त्याच्या आधारावरच ते काम करतील, हे निश्चित. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या प्रारंभीच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांना भारत आणि चीन यांच्या भूभागाच्या सीमा भिडतात, हेच माहीत नव्हते. असो.
सर्जिओ गोर यांचे भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून आगमन होत असतानाच दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाले, हे नजरेआड करणे अवघड आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे असीम मुनीर यांच्या मधुर संबंधांकडे बघता, सर्जिओ गोर त्यांच्या भारतातील राजदूतपदाच्या कार्यकाळात पाकिस्तानला झुकते माप देणार का, हे बघावे लागेल.
सध्या भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ‘मुक्त व्यापार करार’ रखडलेला आहे. संरक्षण साहित्याची आणि विशेषतः फायटर जेट विमानांसाठीच्या इंजिनांची आणि त्यांच्या तंत्रज्ञानाचे भारताला होणारे हस्तांतरण रखडलेले आहे. ’अपाचे’ हेलिकॉप्टरचे भारताने अमेरिकेला पैसे देऊनही सहापैकी चार हेलिकॉप्टरचा भारताला अजूनही पुरवठा करण्यात आलेला नाही. भारताची क्रूड इंधन तेलाची गरज मोठी आहे आणि भारताला रशियाकडून विशेष कमी दरात क्रूड तेलाचा पुरवठा होतो आहे. अमेरिकेने सध्या भारतातून अमेरिकेत आयात होणार्या मालावर ५० टक्के ‘टॅरिफ’ लावला आहे. या पार्श्वभूमीवर सर्जिओ गोर यांचे भारतात आगमन होत आहे.
सध्याच्या ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात, जेव्हा ट्रम्प आणि ब्रिटिश नियंत्रित व्यवस्थेमध्ये तणाव निर्माण झालेला असताना, डोनाल्ड ट्रम्प यांना सगळीकडे त्यांचा स्वतःचा विश्वासू माणूस बसविणे आवश्यक झाले असल्याचे दिसते. तसेच, सर्जिओ गोर अननुभवी असल्याने दोन देशांमधील महत्त्वाच्या व्यक्तींमधील संदेशवहनाची स्पष्टता राखली जाईल, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा हिशोब दिसतो आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्या जवळच्या अनेक व्यक्तींचा त्यांना वाईट अनुभव आल्याने त्यांनी अशा तरुण विश्वासू व्यक्तीवर राजदूतपदाची जबाबदारी सोपविली असावी, असे दिसते.
- सनत्कुमार कोल्हटकर