‘काहे दिया परदेस’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा गाजलेल्या मराठी मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. पण, आज अभिनय क्षेत्रात मनस्वी रमणार्या सायलीने राज्यशास्त्राची पदवी घेतली असून, तिला पक्षीय राजकारणापेक्षा राजकीय विश्लेषक व्हायला आवडेल, असे ती आवर्जून सांगते. त्यानिमित्ताने पडद्यावर विविध भूमिकांमध्ये झळकणार्या सायलीबरोबर तिचा आजवरचा अभिनय क्षेत्रातील प्रवास आणि राजकारणाची आवड याविषयीचा हा दिलखुलास संवाद...
सायली, तुझं शिक्षण राज्यशास्त्राचं. मात्र, तू करिअर म्हणून अभिनयाची वाट निवडलीस. तेव्हा, हे नेमके कसे घडले?
माझं संपूर्ण शिक्षण-संपूर्ण म्हणजे ‘बीए पॉलिटिकल सायन्स.’ मी २०१३ साली राज्यशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर मला ‘एमए’, ‘पीएचडी’ही करायची होती. मी ‘एमए’साठी प्रवेशदेखील घेतला आणि ‘काहे दिया परदेस’ माझ्या नशिबात आलं. ‘आटपाडी नाईट्स’सारखा चित्रपटही नंतर वाट्याला आला. त्यामुळे मला ‘एमए’ करता नाही आलं. अभिनय करता करता माझा राज्यशास्त्राचा अभ्यास मागे राहिला. नंतर २०२२ मध्ये मी ‘एमए’ पहिलं वर्ष उत्तीर्ण केलं, पण ‘झिम्मा’ आणि इतर चित्रीकरणामुळे दुसर्या वर्षाची परीक्षा देऊ शकले नाही. अभिनय आणि राज्यशास्त्र हे दोन्ही माझे आवडीचे विषय आहेत. मला वाटतं, राज्यशास्त्र हे आजच्या पिढीसाठी उत्तम करिअर आहे आणि देश बदलण्याची ताकद त्यात आहे. निवडणुकीचे आकडे, विश्लेषण हे सगळं पाहायला मला आजही खूप आवडतं, म्हणून मी हा अभ्यास पुढे चालू ठेवला आहे.
पण, महाविद्यालयीन शिक्षणानंतर अभिनयाकडे तू नेमकी कशी वळलीस?
महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर एकांकिका स्पर्धेसाठी एका भूमिकेसाठी स्त्री अभिनेत्री हवी होती आणि अनेकांना काही ना काही अडचणी असल्यामुळे मग मी ती भूमिका स्वीकारली. त्या स्पर्धेत प्रवीण तरडे, स्मिता तांबे परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी मला रंगमंचावर पाहून सांगितलं की, ‘तू स्क्रीनवर छान दिसशील, नक्की ऑडिशन दे!’ यानंतर मी ऑडिशन देत गेले आणि तसंच ‘आटपाडी नाईट्स’ हा चित्रपटही वाट्याला आला. मग सोशल मीडियावरून ‘काहे दिया परदेस’साठी ऑडिशनची संधी आली. नशिबात असलेल्या गोष्टी आपल्याला कुठूनही शोधतात, असं मला वाटतं. नाशिकमध्ये बसूनही मला ही संधी मिळाली आणि तिथूनच माझा अभिनय क्षेत्रातील प्रवास खर्याअर्थाने सुरू झाला.
अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी कुटुंबीयांचा पाठिंबा, आधार हा साहजिकच महत्त्वाचा. तू अभिनय क्षेत्रात करिअर करणार म्हटल्यावर, तुझ्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती?
या क्षेत्रात माझी किंवा माझ्या कुटुंबीयांची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. काही नातेवाईकांच्या अनुभवांमुळे माझ्या आई-वडिलांना असं वाटत होतं की, हे छंद म्हणून ठीक, पण करिअर म्हणून योग्य नाही. नातेवाईकांकडूनही हे क्षेत्र चांगलं नाही, असे सल्ले मिळत होते. पण, नशिबाने मला चित्रपटसृष्टीत खूप चांगले लोक भेटले. आई-वडिलांनी स्वतः हे क्षेत्र पाहिलं, तेव्हा त्यांना जाणवलं की, इथे वाईट लोक नाहीत. कोणाच्या एखाद्या वाईट अनुभवावर अंधविश्वास ठेवू नये; म्हणून त्यांनी मला माझा मार्ग निवडू दिला. ‘काहे दिया परदेस’ आणि ‘आटपाडी नाईट्स’नंतर तर त्यांनी कधीही ‘तू काय करत आहेस,’ असा प्रश्नही मला कधी विचारला नाही.
अशोक सराफ यांच्याशी तुझं खूप छान नातं आहे; ते तुला मुलीसारखंच मानतात. तुमची पहिली भेट कधी झाली आणि अशोकमामांबरोबर हे नातं कसं बहरत गेलं?
‘काहे दिया परदेस’चे जेव्हा प्रोमो आले, तेव्हा अशोक पप्पांनी-अशोक सरांनी ते बघितले आणि आमची तेव्हा भेट नव्हती झाली, आमची ओळखही नव्हती. पण, माझा एक मित्र आहे, जो त्यांच्याबरोबर एका चित्रपटात काम करत होता. त्या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च होतं आणि अशोक सरांनी त्याला सांगितलं की, तिला नक्की घेऊन ये म्युझिक लाँचला, मला भेटायचंय. पहिल्यांदा त्यांनी मला स्क्रीनवरच, ‘काहे दिया परदेस’च्या प्रोमोमध्ये पाहिलं. ज्यात मी अगदी निवेदिता सराफ तरुणपणी जशा दिसायच्या, तशीच दिसते. आजही ते प्रोमो पाहिल्यावर मला स्वतःला जाणवतं की, माझ्यात निवेदिता सराफ यांच्यासारखं थोडंसं साम्य दिसतं. तेव्हा ते खूपच जुळत होतं आणि अशाच छोट्या गोष्टींमुळे मला इंडस्ट्रीत इतकी सुंदर नाती मिळाली.
राज्यशास्त्राची एकूणच आवड लक्षात घेता, तुला पुढे सक्रिय राजकारणात उतरायची इच्छा आहे का? आणि तू राज ठाकरे यांचीही प्रशंसक असल्याचे समजले. त्याविषयी काय सांगशील?
२००८-०९ पासून मला राजसाहेबांची भाषणं ऐकायला आवडू लागली. आठवी-दहावीच्या शालेय वयातच त्यांच्या विचारांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर आपणच केला पाहिजे, तेव्हाच इतरही करतील, हा त्यांचा विचार मला खूप भावला. मी त्यांच्या मोठ्या फॅन्सपैकी एक आहे. त्यांच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडतं. कारण, त्यांना कला, साहित्य आणि इतर अनेक क्षेत्रांचं अप्रतिम ज्ञान आहे. प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन शिकायला मिळतं. माणूस म्हणूनही मी त्यांची प्रचंड चाहती आहे. पण, सक्रिय राजकारणात वगैरे उतरण्याबाबत मी अजूनतरी काही ठरवलेले नाही. पण, हो मला राजकीय विश्लेषक म्हणून काम करायला खूप आवडेल. कुठल्याही एका पक्षात सक्रिय काम करण्यापेक्षा मला संपूर्ण राजकारणाचं विश्लेषण करण्यात, राजकीय विश्लेषकाची भूमिका अधिक आवडेल.
- अपर्णा कड