संस्कृत व्याकरण सोपे करून सांगण्याची हातोटी असणार्या आणि ऐहिक जीवनातील विविध गोष्टींवर आधारित स्वरचित पद्यरचना करणार्या छन्दस्वी संस्कृत अभ्यासक राजेंद्र दातार यांच्याविषयी...
शाळा-महाविद्यालयांत किंवा शिकवणी वर्गामध्ये भाषा शिकताना आणि शिकवतानादेखील आपल्याला काही प्रमाणात अडचणींचा सामना करावाच लागतो. बहुतेक वेळा या अडचणी व्याकरणाशी निगडित असतात. विशेषतः जर संस्कृतसारखा तांत्रिक विषय असेल, तर त्यासाठी पाठांतर आणि सामान्य तर्कशास्त्रदेखील आवश्यक असते. या गोष्टी आपल्याकडे उपजत असल्या, तरी त्याचा योग्य विकास करणे आवश्यक असते. याच विचाराने आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून संस्कृत व्याकरणाचे सखोल आणि चिकित्सकपणे मार्गदर्शन करणारे लेखक म्हणजे राजेंद्र दातार.
राजेंद्र यांचे शिक्षण विज्ञान विषयातील. शाळेत असताना चांगले गुण मिळवण्यासाठी केलेला अभ्यास वगळता, त्यांचा संस्कृतशी फार संबंध कधी आलाच नव्हता. पण, उपनयन झाल्यानंतर ते त्यांच्या गुरुजींकडे प्राथमिक वैदिकी शिकले होते. त्यातूनच संस्कृतची गोडी लागली. ते नियमित स्तोत्रपठण आणि संस्कृत साहित्यवाचन करत असत.
वयाच्या ३०व्या वर्षी ‘संस्कृत भाषा संस्थे’तर्फे आयोजित एका शिबिरात त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांची गणेश करंदीकर यांच्याशी ओळख झाली आणि ‘प्रेरकः सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा| शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः॥’ या वचनाप्रमाणे प्रेरक, सूचक, वाचक, दर्शक, शिक्षक आणि बोधक हे त्यांना एकत्र एकाच गुरूमध्ये लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र यांनी ‘संस्कृत भाषा संस्थे’च्या ‘संस्कृत भाषा साधना’ आणि ‘संस्कृत साहित्य साधना’ आणि ‘भारतीय विद्याभवना’ची ‘संस्कृत कोविद’ या परीक्षा दिल्या.
तत्पश्चात, करंदीकर सरांच्या प्रोत्साहनाने ते शिकवण्या घेऊ लागले. त्यातून राजेंद्र यांना स्वतःलाही खूप शिकायला मिळाले. विद्यार्थ्यांना कठीण जाणारे मुद्दे सोपे करून सांगण्याची त्यांची हातोटी एकदा प्रभाकर भातखंडे यांनी हेरली आणि पुढे त्यांच्याच प्रोत्साहनाने राजेंद्र यांचा एक लेखक म्हणून प्रवास सुरू झाला. राजेंद्र यांनी व्याकरणातील असंख्य क्लिष्ट गोष्टी आपल्या पुस्तकांतून सुलभ करून सांगितल्या आहेत.
तसेच, आपली वृत्त आणि छंद विषयातील विशेष आवड जपत त्यांनी काही स्वरचित पद्यरचनादेखील पुस्तकरूपात प्रकाशित केल्या आहेत. रामरक्षेतील ‘रामो राजमणिः...’ या श्लोकात ज्याप्रमाणे ‘राम’ या शब्दाची सर्व विभक्तिरूपे आली आहेत, त्याप्रमाणे स्वरान्त, व्यञ्जनानि इत्यादी प्रकारांतील एकेक शब्दाची सर्व विभक्तिरूपे एकाच श्लोकात बद्ध करत त्यांनी ‘विभक्ति-वृत्त-नंदिनी’नामक पुस्तकदेखील लिहिले आहे.
राजेंद्र यांची ‘अष्टादशश्लोकी’ ही रचना संस्कृतक्षेत्रात सुप्रसिद्ध आहे. ‘भगवद्गीते’तील १८ अध्यायांचे सार सांगणारा प्रत्येकी एक श्लोक रचत त्यांनी ही रचना केली आहे. तसेच, त्यांनी पसायदान आणि हरिपाठाचेसुद्धा संस्कृत पद्यरचनेत रूपांतर केले आहे.
राजेंद्र यांना पद्यरचना करण्याचा छंदच जडला होता. त्यांनी दैनंदिन जीवनात सामान्यपणे आपल्याला विस्मरण होणार्या सर्व गोष्टी एकत्र श्लोकबद्ध केल्या. गणपतीला वाहायची २१ पत्री, भाषेतील २२ उपसर्ग, विष्णूची २४ नावे, २७ नक्षत्र, १२ महिने, १० दिशा, २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, रसायनशास्त्रातील ११८ मूलद्रव्ये अशा असंख्य गोष्टी त्यांनी पद्यरूपात बद्ध केल्या आहेत.
पूर्वी घेतलेल्या विज्ञानाच्या शिक्षणाशी आपल्या पद्यरचनेच्या कलेची सांगड घालत राजेंद्र यांनी भूमितीतील सिद्धान्त आणि त्यातील सूत्रे सांगणार्यादेखील एकश्लोकी रचना केल्या. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाची व्याख्यासुद्धा त्यांनी श्लोक स्वरूपात मांडली.
श्लोकरचनेचे कसब त्यांच्या अंगी असले, तरी त्यांनी काही दीर्घ पद्यरचनाही केल्या. त्यांनी परशुरामांची आरती रचली; कोजागिरी पौर्णिमा, मकरसंक्रांत अशा सणांविषयी काव्य केले, नववर्ष स्वागतगीतसुद्धा लिहिले. ‘मेघदूत’ काव्याचे मराठीत संक्षिप्त पद्यरूपांतरही केले आहे. तसेच, काही गाण्यांची संस्कृतात भाषांतरे केली. ‘जब दीप जले आना’, ‘दुनिया में हम आए हैं तो जीना ही पडेगा’, ‘एक अजनबी’ अशी काही हिंदी गाणी आणि ‘पंचतुंड नररुंडमालधर’, ‘अवघाचि संसार’, ‘जय शारदे वागीश्वरी’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘प्रथम तुज पाहता’, ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर’ अशी असंख्य मराठी गाणी त्यांनी भाषांतरित केली आहेत.
त्यांचे आतापर्यंतचे बहुतांश संस्कृतकार्य त्यांनी आपल्या ‘संस्कृत-प्रबोधिनी’नामक युट्यूब चॅनेलवर जगाला उपलब्ध करून दिले आहे. सध्या ते अनुस्वाराचा आणि विसर्गाचा अचूक उच्चार कसा करावा, याविषयी साहित्यनिर्मिती करत आहेत. विसर्गाचा उच्चार प्रत्येक वेळी ‘ह’, ‘हा’, ‘हि’, ‘ही’ असा ‘ह’च्या बाराखडीसारखा करायचा नसतो. अनुस्वाराच्या बाबतीत विचार करता; पंखा, पंजा, पंढरी, पंत, पंप यातील प्रत्येक अनुस्वाराचा उच्चार वेगवेगळा का होतो, यामागे काय शास्त्र आहे, ते सांगण्याचा राजेंद्र प्रयत्न करतात. त्याचबरोबर ‘ज्ञ’ या अक्षराचा उच्चार ‘द’पासून सुरू होत नसून, ‘ज’पासून सुरू होतो. याचे व्याकरणिक, शास्त्रशुद्ध कारणही राजेंद्र आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून देतात.
राजेंद्र यांची संस्कृत भाषेवरील पकड आणि प्रतिभेच्या बळावर त्यांना ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तक मंडळाचेदेखील काम करण्याची संधी मिळाली. तसेच, ‘महाराष्ट्र सेवा संघा’कडून त्यांना ‘संस्कृत भाषाप्रसार पुरस्कारा’नेही गौरवण्यात आले आहे. राजेंद्र दातार यांचे संस्कृतकार्य उत्तरोत्तर बहरत जावो, या दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप खूप शुभेच्छा.
- ओवी लेले