मुंबई : ( Operation Sindoor Book Launch ) युद्धात काय साध्य करायचे हे माहित नसेल तर प्रचंड नुकसान होते आणि देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडते. त्यामुळेच भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर एका निर्धारित लक्ष्यासाठी ठरवले होते, ते लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर भारताने हे ऑपरेशन थांबवले, असे मत राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक नीती अभ्यासनचे, संचालक ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.
सावरकर विचार मंच, नवी मुंबई यांनी आयोजित केलेल्या ब्रिगेडीअर हेमंत महाजन यांच्या ऑपरेशन सिंदूर (बदलता भारत -संयमातून सडेतोड उत्तराकडे) या त्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. वाशीतील गुजरात भवन येथे माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूर अधिवेशनातून फोनद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
पुस्तकाचे लेखक ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर घटना समजावून सांगितली. ते म्हणाले की, कमीत कमी वेळात भारताने आपला उद्देश या ऑपरेशनच्या माध्यमातून साध्य केला. परंतु हे ऑपरेशन सिंदूर पार पडले असले तरी ते पूर्णपणे संपुष्टात आणले गेले नाहीये. ज्यावेळी पुन्हा पाकिस्तान आगळीक करेल तेव्हा पुन्हा ऑपरेशन सिंदूर चालू होईल.
यावेळी त्यांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध स्वीकारलेली मल्टी डोमेन स्ट्रॅटेजी सविस्तरपणे उलगडून सांगितली. सिंधु पाणी कराराचा फेरविचार, आत्मनिर्भर भारताचे शस्त्रसामर्थ्य, भविष्यातील धोके इत्यादी गोष्टींचे सखोल विश्लेषण केले.
कार्यक्रमप्रसंगी 'स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई'चे कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, अजय वाळुंज आणि प्रकाश मोरे उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी वैष्णवी कटारे यांनी सूत्रसंचालन केले तर सावरकर विचार मंचचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी प्रास्ताविक व आभार मांडले.
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.