मानवी संस्कृतीचा पुनर्शोध

    13-Dec-2025   
Total Views |
Chhatrapati Shivaji Maharaj Museum
 
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘नेटवर्स ऑफ द पास्ट : अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अ‍ॅण्ड द एन्शंट वर्ल्ड’ हे नवीन दालन शुक्रवार, दि. १२ डिसेंबर रोजी खुले झाले. केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण भारतातील कलाप्रेमींसाठी प्रथमच जागतिक स्तराचे असे भव्य दालन उपलब्ध झाले आहे. यामध्ये सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचे दर्शन प्रेक्षकांना घेता येणार आहे. इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेल्या असंख्य गोष्टी, त्यांच्या मागील कथा, त्यातील सांस्कृतिक अनुबंध, या सार्‍यांचा सुरेख मिलाफ मुंबईच्या वस्तुसंग्रहालयात प्रथमच साकार होत आहे. अशा या प्रदर्शनाचा हा शब्दरूपी धांडोळा.
 
वस्तुसंग्रहालय म्हणजे इतिहास जिवंत करणारी वास्तूच! इतिहासावर मनापासून प्रेम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी या ठिकाणी इतिहास नव्याने उलगडतो. रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. हे युद्ध जितकं आकाशामध्ये क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून लढलं जातं, तितकंच ते जमिनीवरसुद्धा विद्ध्वंस घडवून आणतं. अशा वेळी सीमेलगतचे भाग साहजिकच अधिक संवेदनशील असतात.
 
काही महिन्यांपूर्वी एके ठिकाणी युक्रेनच्या एका सीमेलगतच्या शहरामध्ये बॉम्बहल्ला सुरू झाला. सीमा पार करून काही टोळ्या नासधूस करण्यासाठी शहरामध्ये प्रवेश करू लागल्या. त्यावेळी लोक बचावासाठी सगळीकडे पळू लागले. अशातच काहीजण तिथलं वस्तुसंग्रहालय वाचवण्यासाठी धावपळ करत होती. या परिस्थितीमध्येसुद्धा ती वास्तू वाचवण्यासाठी झटणारी माणसं होती. याबद्दल आपला अनुभव सांगताना काही लोक म्हणाले की, "हा आमचा वारसा आहे आणि आमच्या वारशाशिवाय आम्ही काहीच नाही.” इतिहासाशी माणसाचं नातं हे इतकं खोलवर जोडलेलं असतं.
 
भारतासारख्या देशामध्ये तर ‘इतिहास’ ही काल घडून गेलेली गोष्ट नसते. इथल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासाची छाया वर्तमानावर उमटलेली दिसते. त्यातून रोज नवनवीन चर्चा, विचारमंथन घडत असते. इंग्रजांच्या विरोधातील स्वातंत्र्यलढा असो किंवा आणीबाणीची काळी रात्र, या सार्‍या घटितांचा समाजमनावर असा एक खोल ठसा उमटलेला आहे, ज्यातून त्या त्या समाजाच्या जगण्याची एक चौकट तयार झाली. अशा परिस्थितीमध्ये ‘इतिहास’ या विषयाकडे बघताना किती गांभीर्याने बघायला हवं, याचा विचार समाजघटकांनी करणे आवश्यक आहे.
 
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये सातत्याने यासंदर्भात नवनवीन प्रयोग केले जातात. भारताच्या लोकसंस्कृतीचा जागर असो किंवा मुंबईचा शहर म्हणून सर्वांगाने घेतलेला आढावा असो, या शोधाच्या माध्यमातूनच नवीन गोष्टी लोकांसमोर मांडल्या जातात. ‘नेटवर्स ऑफ द पास्ट : अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अ‍ॅण्ड द एन्शंट वर्ल्ड’ या प्रदर्शनाचा म्हणूनच विचार करणे आवश्यक ठरते.
 
प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करताना, सिंधू संस्कृती, चिनी संस्कृती, इजिप्तमधली संस्कृती या सगळ्या वैभवाचा धांडोळा या प्रदर्शनामध्ये घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी प्राचीन जगामध्ये व्यापार कसा सुरू होता, यावेळी संवादाची माध्यमं कशी होती; धर्म, कला, संस्कृती यांच्या प्रादेशिक स्तरावर कल्पना काय होत्या, याची उत्तरं उलगडून सांगितली आहेत. प्रदर्शनाची सुसूत्र विभागणी, आशय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूरक आहे. आधुनिकतेची जोड लाभल्यामुळे ही प्रदर्शनं खर्‍या अर्थाने आपल्यासमोर जिवंत होतात. यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ऐतिहासिक उपक्रमात भारत, इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस आणि चीन तसेच अविभाजित भारताच्या प्रांतांमधील संस्कृतींच्या कथा सांगणार्‍या सुमारे ३०० निवडक पुरातत्त्वीय वस्तूंचा समावेश आहे. सर्वप्रथम इतक्या मोठ्या प्रमाणात वस्तूंचा शोध घेणे, त्यांना एका जागी आणून ठेवणं, त्यासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे ही खरं तर एक क्लिष्ट प्रक्रिया. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने हे आव्हान यशस्वीपणे पूर्णत्वास आणले आहे. गेल्या चार वर्षांपासून राबविलेल्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नाला ‘Getty’च्या ‘शेअरिंग कलेक्शन्स प्रोग्राम’चे सहकार्य लाभले. त्याचबरोबर इंग्लंडपासून ते कुवेत, अथेन्स इथल्या वस्तुसंग्रहालयाच्या सहकार्यामुळे हे स्वप्नवत प्रदर्शन सत्यात उतरले.
 
भारत सरकारचा सांस्कृतिक विभाग, पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग ( ASI ), राष्ट्रीय संग्रहालय - नवी दिल्ली, अलाहाबाद संग्रहालय - प्रयागराज, महाराष्ट्र शासनाचे पुरातत्त्व व संग्रहालय विभाग, इंडियन म्युझियम- कोलकाता, बिहार संग्रहालय - पाटणा, शासन संग्रहालय - मथुरा आणि राज्य संग्रहालय - लखनौ या संस्थांच्या समृद्ध संग्रहातील बहुमूल्य प्राचीन वस्तूंचाही या प्रदर्शनामध्ये समावेश आहे. इथे आपल्याला हजारो वर्षांपूर्वीची बुद्धाची मूर्ती जशी दिसते, तशी मथुरेतील कार्तिकेयाची मूर्तीसुद्धा दिसते. वेगवेगळ्या शिलालेखांच्या माध्यमातून आपल्याला एका बाजूला राजांचे फर्मान कळतात, तर दुसर्‍या बाजूला प्राचीन काळात वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वापरली जाणारी धूपदाणीसुद्धा आपले लक्ष वेधून घेते. संस्कृतीचा हा जागर होत असताना, हडप्पा संस्कृतीच्या शहराची एक प्रतीकात्मक रचना (मोडल) वस्तुसंग्रहालयाच्या मध्यभागी असावी, ही कौतुकस्पाद आणि अभिमानास्पद गोष्ट.
 
वर्तमानकाळात इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. एका बाजूला काही विशिष्ट घटनांवर तंटे-बखेडे होत असताना, इतिहासाच्या भव्यतेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, याचा विचार आता होणे गरजेचे आहे. वर्तमानकालीन अनेक प्रश्नांना सामोरे जात असताना, आपल्याला त्यासाठी लागणार्‍या उत्तरांची उकल भूतकाळातूनच होते. अशा परिस्थितीमध्येही वस्तुसंग्रहालये केवळ वस्तू जतन करणारी ठिकाणं राहात नाहीत, तर ते संवादाचे एक समृद्ध केंद्र म्हणून आपल्यासमोर येतात. आज अशा पद्धतीच्या संवादाची नितांत आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर संस्था एकत्र आल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो, हे आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रत्यक्षात अनुभवायला मिळते. या पद्धतीचे प्रदर्शन येणार्‍या काळामध्ये खर्‍या अर्थाने इतिहासाचे शिक्षण रुजवणारे असेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.