पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या हिलाल अहमदला अटक

पाकिस्तानी हँडलर्सना सुरक्षा संबंधित माहिती पुरवल्याचा संशय

Total Views |
Hilal Ahmed
 
मुंबई : ( Hilal Ahmed ) पाकिस्तानी हँडलर्ससाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली जम्मू- काश्मीरमधील एका २६ वर्षीय तरुणाला अरुणाचल प्रदेशमध्ये अटक करण्यात आली. हिलाल अहमद असे या संशयित गुप्तहेराचे नाव असून तो पश्चिम सियांग जिल्ह्यातील आलो मार्केटमध्ये ब्लँकेट विक्रेता म्हणून वावरत होता.
 
याबाबत पश्चिम सियांगचे एसपी कर्डक रिबा यांनी घटनेचा दुजोरा देत सांगितले की, हिलाल मुळचा जम्मू- काश्मीरमधील आहे. मागच्या महिन्यांत हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या नाझीर अहमद मलिक आणि साबीर अहमद मीर या दोघांच्या संपर्कात हिलाल अहमद असल्याचे आढळल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
 
त्यांनी पुढे सांगितले की, इटानगर पोलिसांकडून आलो मार्केट येथे हेरगिरी करणारा एक व्यक्ती आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार तात्काळ एक पथक सक्रिय करण्यात आले. स्थानिक मशीदींच्या चौकशी करण्यात आल्या. त्याआधारे मिळणाऱ्या दुव्यातून हिलाल अहमदचा शोध घेण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.
 
हेही वाचा : Osman Hadi : बांग्लादेशातील कट्टर इस्लामवादी उस्मान हादीवर अज्ञातांकडून हल्ला
 
ब्लँकेट आणि कपडे विक्रीचा बहाना
 
२२ नोव्हेंबर रोजी इटानगर इथल्या गंगा गावातून नाझीर अहमद मलिकला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून अबोटानी कॉलनीतून साबीर अहमद मीरला अटक करण्यात आली. हे दोघे कपडे विक्रेत्यांच्या वेशात राज्यभर फिरले होते. त्यातच आता अटक करण्यात आलेला हिलाल अहमद देखील ब्लँकेट विक्रीचा बहाना करत होता. त्यामुळे असे विक्रेते आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.