गाणपत्य संप्रदायाचे तेजःपुंज ऋषी!

    11-Dec-2025
Total Views |

Ganpati Bappa
 
मोरया गोसावी या संतांचे नाव महाराष्ट्राला परिचित नाही, असे नाही. ‘सिंदूर लाल चढायो’ आणि ‘नाना परिमळ दूर्वा’ या दोन्ही आरत्यांची रचना मोरया गोसावी यांचीच. मोरया गोसावी यांचा संजीवन समाधी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुसार, बुधवार, दि. १० डिसेंबर रोजी संपन्न झाला. यानिमित्ताने मोरया गोसावींची भक्ती आणि त्यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...
 
हिंदू धर्मात पाच मुख्य संप्रदाय आहेत सूर्योपासक, शैव, वैष्णव, गाणपत्य आणि शाक्त. हे पाचही संप्रदाय आपापल्या सांप्रदायिक ईश्वरी विग्रहाला परब्रह्म समजून उपासना करतात. ‘गाणपत्य’ संप्रदाय हा गणपतीलाच मूळ परब्रह्म मानतो. या संप्रदायाच्या गौरवशाली इतिहासातील एक अग्रणी आणि देदीप्यमान ऋषी म्हणजे, चिंचवडचे परमपूज्य श्री मोरया गोसावी. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी हा त्यांचा संजीवन समाधी दिवस. हा दिवस महाराष्ट्राच्या आध्यात्मिक नकाशातील, एक तेजोमय सोहळा आहे. त्यांच्या अलौकिक जीवनाचा आणि समाधी उत्सवाचा अर्थ समजून घेणे म्हणजे, गाणपत्य संप्रदायाच्या मूळ चैतन्याशी जोडले जाण्यासारखेच आहे.
 
श्री मोरया गोसावी यांचा जन्म सुमारे १४व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला; त्यांचे वडील वामनभट आणि आई पार्वतीबाई यांनी त्यांना, बालपणापासूनच धार्मिक संस्कार दिले. लहानपणापासूनच त्यांची वृत्ती ईश्वराच्या भक्तीकडे स्वाभाविकपणे झुकलेली होती. त्यांची कुलदेवता गणपती असल्यामुळे, गणेशावर त्यांची उपजतच निस्सीम भक्ती जडली. बालवयापासूनच त्यांच्यात विलक्षण तेज आणि साधेपणा दिसून येत होता. संसाराचे सोपस्कार पार पाडत असतानाही, त्यांचे चित्त मात्र कायम परमार्थातच स्थिर असे.
मोरया गोसावींच्या जीवनातील भक्तीचे मूळ आणि आधारस्तंभ म्हणजे, मोरगाव येथील श्री मोरेश्वर गणपती. मोरगाव हे अष्टविनायकांपैकी पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, गणेशाचे आद्यपीठ मानले जाते. मोरया गोसावींनी अनेक वर्षे न चुकता, दर संकष्टी चतुर्थीला आणि इतर महत्त्वाच्या तिथींना थेऊरहून मोरगावपर्यंत पायी वारी केली. त्यांची श्रद्धा इतकी प्रगाढ होती की, त्यांना मोरेश्वराने साक्षात दर्शन दिले. त्यांच्या निस्सीम भक्तीमुळे, त्यांच्यासाठी हा प्रवास कधीही शारीरिक लेशाचा ठरला नाही, उलट त्या वारीतून त्यांना अधिक ऊर्जा मिळत असे. अनेक वर्षांच्या कठोर उपासनेनंतर, साक्षात मोरेश्वराच्या कृपेनेच त्यांना थेऊर येथील श्री चिंतामणी गणेशाचे दर्शन घेण्याचा आदेश मिळाला. चिंतामणीने त्यांना पुढील कार्यासाठी चिंचवडला जाण्याचा संकेत दिला. गुरूंच्या आज्ञेनुसार आणि गणेशाच्या कृपेने ते चिंचवड येथे स्थायिक झाले आणि त्यांनी आपल्या तपश्चर्येने या भूमीलाही पावन केले.
 
मात्र, वृद्धापकाळी त्यांना मोरगावला पायी जाणे, शारीरिकदृष्ट्या कष्टदायक होऊ लागले. यामुळे, त्यांचे मनही खिन्न झाले होते. आपली दैनंदिन उपासना खंडित होऊ नये, म्हणून ते अत्यंत तळमळीने मोरेश्वराला प्रार्थना करत असत. त्यांची ही आंतरिक तळमळ बघून, साक्षात मोरेश्वरानेच त्यांना दर्शन देण्याचे ठरवले. एकदा चिंचवड येथील इंद्रायणी नदीच्या डोहात स्नान करताना, मोरया गोसावींना नदीच्या पाण्यात एक मूर्ती प्राप्त झाली. ती साक्षात मोरेश्वराचीच मूर्ती असल्याचा भक्तांचा विश्वास आहे.
या मूर्तीच्या प्राप्तीमुळे, मोरया गोसावींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ही मूर्ती म्हणजे साक्षात मोरेश्वराचे चिंचवडमधील आगमनच होते. त्यांनी या मूर्तीची स्थापना आपल्या राहत्या वाड्यातच करुन, तिची नित्य उपासना सुरू केली. ही मूर्ती आज चिंचवडमध्ये ‘वाड्यातील गणपती’ म्हणून ओळखली जाते. वाड्यातील गणपतीच्या स्थापनेमुळे, मोरया गोसावी यांची मोरेश्वराची भक्ती चिंचवडमध्येच नित्यनेमाने सुरू झाली. त्यांनी या ठिकाणीच गणेशाची भव्य मूर्ती स्थापित केली, जी आज मोरेश्वर देवालय (समाधी मंदिर) म्हणून ओळखली जाते. या घटनेमुळेच मोरया गोसावी, हे महाराष्ट्रातील गाणपत्य संप्रदायाचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र बनले. त्यांच्या भेटीसाठी तत्कालीन संत-महंत आणि राजे-महाराजेसुद्धा येत असत.
 
मोरया गोसावी हे गाणपत्य संप्रदायाचे, महाराष्ट्रातील सर्वांत मोठे उपासक आणि प्रचारक ठरले. त्यांनी गणेशभक्तीला केवळ कर्मकांडापुरते मर्यादित न ठेवता, तिला सामान्य माणसांच्या जीवनाचा आधार केले. मोरया गोसावींच्या परंपरेने गाणपत्य संप्रदायाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या वंशजांनी चिंचवडच्या गादीवर बसून, गणेशभक्तीची ज्योत सातत्याने तेवत ठेवली. म्हणूनच मोरया गोसावींचे स्थान, महाराष्ट्रातील गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ म्हणून अत्यंत आदराने घेतले जाते.
 
श्री मोरया गोसावी यांनी मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी, शके १५११ (इ.स. १५८९) या मंगलमय दिवशी, चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी म्हणजे, योगबलाने जिवंतपणी देहत्याग करणे आणि स्वतःला समाधीमध्ये पूर्णपणे विलीन करणे, ही सिद्धी केवळ परमभक्तांनाच प्राप्त होते. ही घटना त्यांची सिद्धता, योगशक्ती आणि गणेशाप्रति असलेली त्यांची अनन्यसाधारण भक्तीच दर्शवते. याच दिवशी चिंचवडच्या समाधी मंदिरात मोठा उत्सव साजरा होतो. या उत्सवाचा सर्वांत महत्त्वाचा आणि भावपूर्ण सोहळा म्हणजे, श्रींची पालखी मोरगावला जाणे.
 
मोरगाव हे गणेशाचे आद्यपीठ आहे. मोरया गोसावी यांची मूळ भक्ती मोरगावच्या मोरेश्वरावर होती, त्यांचे संपूर्ण जीवन मोरेश्वराच्या वारीमध्ये व्यतीत झाले. त्यामुळे त्यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही त्यांचे चित्त केवळ मोरेश्वराच्या चरणीच लागले आहे, या प्रतीकात्मक भावनेतून दरवर्षी समाधी उत्सवानिमित्त चिंचवडच्या मोरया गोसावींच्या मंदिरातील उत्सव मूर्तीची पालखी मोठ्या भक्तिभावाने मोरगावच्या मोरेश्वराच्या चरणी नेली जाते. हा भेटसोहळा भक्त-देवाचे अलौकिक नाते दर्शवतो. मोरया गोसावी हे मूळच्या गणेशाशी (मोरेश्वराशी) एकरूप झाले आहेत, याचेच हे प्रतीक आहे. या पालखी सोहळ्यामुळे गणेशाच्या कृपेचा अनुभव सर्वांनाच घेता येतो.
मार्गशीर्ष कृष्ण षष्ठीचा हा दिवस भक्ती आणि विरक्तीचा संगम दर्शवतो. हा दिवस मोरया गोसावींच्या भक्तीचा परमोच्च बिंदू आहे, जिथे त्यांनी नश्वर देहाचा त्याग करून ईश्वराशी एकरूपता साधली. यामुळे भक्तांना भक्ती आणि विरक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. समाधी मंदिरामध्ये या दिवशी विशिष्ट धार्मिक विधी, गणेशयाग, अभिषेक आणि कीर्तन-भजन यांचेही आयोजन केले जाते. या संपूर्ण उत्सव काळात, भक्तांना एक प्रकारचे आध्यात्मिक चैतन्य अनुभवण्यास मिळते. मोरया गोसावींचे कृपाछत्र चिंचवडच्या भूमीवर आजही कायम असल्याची प्रचिती, भक्तांना नित्यच येत असते. मार्गशीर्ष कृष्ण षष्ठीचा हा दिवस, महाराष्ट्रातील कोट्यवधी गणेशभक्तांसाठी एक पर्वणीच असतो. चिंचवडच्या समाधी मंदिराचे, त्यांच्या वाड्यातील गणपतीचे आणि मोरगावच्या मोरेश्वराचे एकाचवेळी स्मरण करणे, म्हणजे खर्‍या अर्थाने गाणपत्य संप्रदायाच्या परंपरेचा आणि सिद्धपुरुषाच्या कृपेचा अनुभव घेणे होय!
- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज
(लेखक अध्यात्मिक साधक असून, प्रत्येक मानवाच्या अंतर्गत दडलेल्या चैतन्याला प्रकट करण्यासाठी मार्गदर्शन करणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.)