मृत्यूचे रहस्य

    11-Dec-2025
Total Views |
 
mystery of death
 
पुरीच्या बाबाजींची कथा आपण पाहिली. मागील जन्मीचा एक साधक मुक्तीकरिता स्त्रीजन्म घेतो. बंगालचे महान भक्त श्री रामकृष्ण परमहंस म्हणत की, शरीरत्यागानंतर जर जन्म घ्यायचाच असेल तर, मुलीचा जन्म घेऊन बालविधवा होण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे ते जन्मभर भगवान श्रीकृष्णाला पती मानून कृष्णभक्ती करतील. म्हणजे मुक्तावस्थेपूर्वी स्त्रीजन्म घेण्याची इच्छा श्री रामकृष्णांचीसुद्धा होती, असे यावरून दिसते. वर्‍हाडात गुलाबराव महाराज नावाचे एक महान संत होऊन गेले. ते नेहमी स्त्रीवेशात राहून स्वतःला ज्ञानेश्वरकन्यका मानत. या सर्व उदाहरणांवरून मुक्तीकरिता स्त्रीजन्म वा निदान स्त्रीभाव आवश्यक असावा, असे वाटू लागते. खरा साधक मायेच्या वरही सहृदय व कोमल मनाचा असतो. संत ज्ञानेश्वरमाऊलीसुद्धा स्वतःला स्त्री समजूनच परमेश्वराची आळवणी करीत. स्त्रीभावाचे त्यांचे पुष्कळ अभंग व ओव्या आहेत. संत कबीरसुद्धा स्वतःला परमेश्वराची प्रिया मानून दोहे करीत. यावरूनच स्त्रीजन्माची महती सर्वांनीच लक्षात घ्यायला हवी.
 
एक परमोच्च साधक असल्यामुळे बाबाजींचे म्हणणे आम्हाला मानावे लागेल. वैदिक परंपरा शास्त्रशरण असल्यामुळे, येथे अशास्त्रीय कल्पनांना मुळीच थारा नाही. जन्म-मृत्यूची किमया एक खेळ म्हणून ज्या अनामिक महात्म्याने प्रभुत्वपणे हाताळली, त्या श्रेष्ठ साधकाने जन्म-मृत्यूचे दिलेले ज्ञान आम्हाला मानावेच लागेल. सातव्या महिन्यापूर्वी झालेल्या प्रसूतीला गर्भपातच म्हणतात.सातव्या महिन्यापूर्वी जर गर्भ मातेच्या उदरातून बाहेर पडला, तर तो निर्जीव असतो. कारण, शरीर अजून परिपूर्ण न झाल्यामुळे, त्यात बाहेरील जीवात्म्याचा प्रवेश अजून झालेला नसतो. सातव्या महिन्यानंतर झालेल्या प्रसूतीत गर्भ जिवंत राहतो आणि योग्य काळजी घेतल्यास वाचतो, दीर्घकाळ जगतो. याचाच अर्थ स्पष्ट आहे की, सातव्या महिन्यापूर्वी जीवात्मा गर्भात प्रवेश करीत नाही. म्हणजे आपण सातव्या महिन्यात जन्म घेतो; पहिल्या दिवशी नाही. याबाबतीत वेद व उपनिषदे यांचे मतही पुरीच्या बाबाजींसारखेच आहे.
 
स्वभाव व शरीररचना
 
अनेकांची अशी प्रामाणिक कल्पना आहे की, सर्व लहान बालके जन्मतः निष्पाप व निरागस असतात. तद्वत् कसल्याही शरीररचनेचा माणूस असो; त्याला याची देही याची डोळा मुक्ती मिळेल. मात्र शास्त्र असे नाही. आपण पाहिलेच आहे की, जसे गुण वा कर्म तद्वत् जीवात्म्याला मातृगर्भातील शरीर लाभते. याचा अर्थ असा की, मागील जन्माच्या गुणकर्मस्वभावानुसार गर्भावस्थेपासूनच जीवात्म्याला देह मिळत असला पाहिजे. जशी शरीररचना तसा स्वभाव असे तत्त्व मानल्यास, गतजीवनात वाईट कर्मे करून इहजन्मी शरीर धारण केलेले जीव जरी बालकावस्थेत असले, तरी त्यांच्या शरीररचना धर्मानुसार ते वागणारच. त्यांना बाह्य संस्कार पोषणामुळे तसे वागता येत नसेल, हा भाग वेगळा. बालकेसुद्धा जन्मतःच त्यांच्या नियत शरीररचनेमुळे बर्‍या वा वाईट गुणांची असतात, या तत्त्वाकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्यांना लहानपणी चांगले संस्कार दिल्यास त्यांच्या शरीरस्वभावात पुढे फरक पडू शकतो, हेदेखील तितकेच खरे आहे. हे संस्कार करण्याचे काम अशा बालकांच्या मातापित्यांना फार समजूतदारपणे व हळूवारपणे करावे लागते. याप्रकारे संस्कार केल्याने, स्वभावात बदल होऊन मुले नीट वागायला लागू शकतात.
 
हे सर्व करूनही काही समाजकंटक मोठेपणी खून, मारामार्‍या, बलात्कार करतातच आणि याचे कारण त्यांचे गतजन्मातील संस्कार, त्यामुळे प्राप्त झालेला शरीरधर्म, शरीररचना व नंतरच्या जीवनातील संस्कार होय. पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची छायाचित्रे लावली असतात. त्यांच्या चेहर्‍यावरूनच ते गुंड, खूनी असावेत असे कळून येते. या शास्त्राला इंग्रजीत physiognomy असे म्हणतात. म्हणजे चेहर्‍यावरून स्वभाव ओळखायचा झाल्यास, तो चेहरा वा ते शरीर जन्मापासूनच तसे असले पाहिजे हे उघड आहे. हीच गोष्ट अध्यात्मालाही लागू आहे. शरीर हे जीवात्म्याचे उपकरण असल्यामुळे, जसे उपकरण तसाच त्यातून जीवात्म्याचा स्वभावप्रकाश बाहेर पडेल. गीता असेच सांगते,
 
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते|
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्वमित्युत॥
श्लो.११, अ.१४॥
 
अध्यात्मामध्ये या शरीर स्वभावधर्माचा प्रत्यय वारंवार येतो. संस्कृतमध्ये प्रसिद्ध सुभाषित आहे, ‘क्वचित् काणा भवेत साधुः’ याचा अर्थ असा की काणे, वक्र दृष्टीचे लोक साधू होऊच शकत नाहीत. शरीरव्यंग असलेल्याच्या शरीराद्वारे व्यंगात्मकच क्रिया होणार. यावर कोणी असे म्हणेल की, आत्मा जर एक आहे, तर मग शरीराला धरून हा भेद कशाला करायचा? तर्क योग्य वाटू शकतो. पण आत्मा एक असला, तरी त्याचे कार्यरूप उपकरण जर भिन्न, विकृत असेल, तर त्यातून होणारी कार्यनिष्पत्ति तसलीच विकृत होणार. सर्वच उपकरणांतून वाहणारी वीज दोषरहितच असते. परंतु, उपकरणागणिक तिची कार्यनिष्पत्ती भिन्न आणि बरी-वाईट असू शकते. रेडिओतून वाहणारी वीज सुंदर नाद उत्पन्न करते, इस्त्रीमधील वीज उष्णता उत्पन्न करते, तर गॅस पेटविण्याचा स्टार्टर ज्वाला उत्पन्न करतो.
 
तद्वत् आत्मस्वरुप जरी एक असले, तरी त्या आत्म्याचे म्हणजे संस्काररूप जीवात्म्याने जन्मतः ग्रहण केलेलं शरीररूप उपकरण जर भिन्न असले, तर त्यातून उत्पन्न होणारी कार्यनिष्पत्ती भिन्न असणारच. म्हणूनच सर्व श्रेष्ठ योग्यांचे वा पूर्ण पुरुषांचे कार्यरूप उपकरण जे शरीर आहे, तेही त्यांच्या पूर्णत्वाला साजेसेच असते. सर्व श्रेष्ठ आध्यात्मिक पुरुष अतिशय सुस्वरुपच असतात. आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज आदि भावंडे, संत कबीर, तुकाराम महाराज, श्री रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आदि आध्यात्मिक पुरुषश्रेष्ठ देखणेच होते.
 
यातून असा उपप्रश्न उत्पन्न होतो की, ज्यांची शरीरे कुरुप वा दोषपूर्ण असतील, त्यांनी आध्यात्मिक कार्य करू नये काय? अवश्य करावे. त्यामुळे त्यांचा पुढील जन्मीचा मार्ग अधिक सुकर होऊन, त्या जन्मात त्यांना इहजन्मीच्या कल्याणकृत कर्मामुळे उत्तम देह प्राप्त होईल. उत्तमोत्तम कर्मांमुळे उत्तम संस्कारयुक्त जीवात्मा व तसल्या सुसंस्कारयुक्त जीवात्म्यामुळे पुढील जन्मी अधिक सुंदर शरीर प्राप्त होता होता, काही जन्मानंतर तो पूर्ण जीवात्मा बनून, त्याचे उपकरणरूप शरीरसुद्धा पूर्ण म्हणजे सर्वांगसुंदर बनेल. यादृष्टीने अध्यात्माचा एक मंत्र राहू शकतो, सुंदर मी होणार! अंतर्बाह्य सौंदर्य!
- योगिराज हरकरे