शिक्षणाच्या पावित्र्याचा आणि बंधाचा पुनर्विचार आवश्यक

    11-Dec-2025
Total Views |
 
education
 
गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनी देश अक्षरश: गहिवरला आणि हादरलाही. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची कारणे भिन्न असली तरी त्याचे मूळ हे शिक्षण व्यवस्थेतच आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणूनच शिक्षणाच्या पावित्र्याचा आणि बंधाचा पुनर्विचार करण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी हा लेखप्रपंच...
 
ही दिवसांपूर्वीच मुंबईत महाविद्यालयात शिकणार्‍या अर्णव खैरे या विद्यार्थ्याचा रेल्वेप्रवासात अपमान झाल्याने त्याने आत्महत्या केली. त्यानंतर आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या तुषार वांगड या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. जालना येथील आठवीच्या वर्गात शिकणार्‍या आरोही बिडलान या १३ वर्षीय विद्यार्थिनीने तिसर्‍या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. याचदरम्यान, दिल्लीस्थित अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या ल्युटन्स दिल्लीतील ‘सेंट कोलंबस’ स्कूलमध्ये शिकणार्‍या शौर्य पाटील नावाच्या दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या सर्व घटना अगदी अलीकडच्या आहेत. यातील जालना आणि दिल्ली येथील घटनेला शाळा आणि शिक्षकांची असंवेदनशीलता कारणीभूत असल्याचा आक्षेप पालकांनी नोंदवला. एकीकडे प्रचंड प्रतिष्ठित असलेल्या शाळा आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांशी असंवेदनशीलतेचे वर्तन हे सारे चिंताजनकच म्हणायला हवे.
 
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील बंध हरवत असल्याचे दिसते. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शिक्षणाच्या बाजारीकरणाला वेग आला. वर्तमानात शिक्षण संस्थांकडे समाज, माणूस, राष्ट्र घडवण्याचा मार्ग म्हणून पाहिले जात नाही. शिक्षण संस्था या पैसा मिळवण्याचे मार्ग बनले आहेत. अनेक ठिकाणी तर शाळा, महाविद्यालयाला धंद्याचे स्वरूप आले आहे.त्यामुळे नात्याचा बंध उरलेला दिसत नाही. ‘खाऊजा’ संस्कृतीचा प्रभाव शालेय शिक्षणावर होतो आहे. त्यामुळे शिक्षणातून माणसे घडवतो आहोत का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. या सर्वच घटनांचा विचार केला जात असताना, शिक्षणासारख्या क्षेत्रात गेली काही वर्षे सातत्याने आत्महत्यांचा आलेख उंचावतो आहे.आपले वर्तमानातील शिक्षण नेमके विद्यार्थ्यांचे जीवन घडवते की, मुलांना मृत्यूच्या खाईत लोटत आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. देशात शेतकर्‍यांच्या आत्महत्येपाठोपाठ शिक्षणक्षेत्रातील आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे या आत्महत्या चिंताजनक म्हणायला हव्यात. या आत्महत्यांचा गंभीरपणे विचार करत योग्य उपाययोजना केल्या नाही, तर उद्या शिक्षणक्षेत्र म्हणजे निराशा पेरणारे, आत्महत्येची वाट दाखवणारे क्षेत्र, असा दृष्टिकोन निर्माण होण्याचा धोका आहे.
 
मुळात विद्यार्थी आत्महत्या का करतात? मध्यंतरी कोटा या ठिकाणी झालेल्या आत्महत्यांच्या लक्षणीय संख्येमुळे सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. पालकांच्या विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर गुणांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शिक्षणाच्या गुणवत्तेचा संबंध केवळ गुणांशी जोडला जात आहे. रात्रंदिन विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यास करावा. अभ्यास म्हणजे चिंतन, मनन, संदर्भ पुस्तकांचे वाचन असं काही नाही. पाठ्यपुस्तकांपेक्षा विद्यार्थ्यांना बाजारात मिळणार्‍या नोट्स घेऊन घोकंपट्टीची वाट चालणे पसंत करावे लागत आहे. आकलन, समज, विवेक, शहाणपणाचा विचार नाही. शिक्षणाचा संबंध जीवनात बदल घडवण्याच्या दृष्टीने केला जात नाही. शिक्षणामुळे जीवन समृद्ध व्हावे, अशी अपेक्षा फारशी पालकांमध्ये नाही. शाळांनादेखील ‘मागणी तसा पुरवठा’ करण्यात रस. त्यांना पैसा हवा आहे.
 
पैशासाठी पालकांच्या मागणीप्रमाणे विद्यार्थ्यांना गुणांच्या स्पर्धेचे घोडे बनवले जात आहे. फक्त लिहिणे म्हणजे अभ्यास झाला आहे. या अभ्यासात विविध बाजारू नोट्स आणि सध्या आंतरजालावर असलेल्या विविध सुविधांचा आधार घेत, उत्तराचा शोध घेतला जातो. तो उतरण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास, इतकाच तो अर्थ उरला आहे. त्यामुळे ‘विचार करणे’ हे शिक्षणात घडतच नाही. मुळात विचारांची पेरणी होणार नसेल, तर आपण काय करतो आहोत, याच्या आकलनाची शक्यता नाही. त्यामुळे चांगल्या-वाईटाची जाणीव निर्माण होत नाही. सद्सद्विवेकबुद्धी विकसित करण्याची वाट चालणे घडत नाही. विद्यार्थ्यांमध्ये असलेली ऊर्जा खर्च करण्यासाठी मैदान नाही. निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी कला, क्रीडा, कार्यानुभवासारखे विषयांचे तासही फारसे होत नाहीत. त्यामुळे तणाव कमी करण्याचे जे मार्ग आहेत; ज्यातून आनंद मिळत असतो, तेच नेमके घडत नाही. त्यामुळे बौद्धिक गुणांसाठी या तासिकांकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होताना दिसत नाही.
 
शिक्षणाचा अर्थ सांगताना म्हटले जाते की, हाताला काम, हृदयाला भाव व मस्तकाला विचार देतात, ते शिक्षण! आपले शिक्षण यांपैकी नेमके काय करते, याचा शोध घेण्याची गरज आहे. मुळात आपल्या शिक्षणात हाताला काम देण्याची क्षमता गमावणे घडते आहे.देशात पदवीधारकांची संख्या वाढते आहे. बेकारीचा आलेखही उंचावतो आहे. विविध सर्वेक्षणानुसार, देशातील पदवीधारक असणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त पदवीच्या अपेक्षित क्षमता प्राप्त नाहीत. भारताच्या अर्थमंत्र्यांनीदेखील यासंदर्भाने भारतीय संसदेत प्रतिपादन केले आहे. मात्र, एकीकडे हे वास्तव आणि दुसरीकडे भावनिक विकासाचे मोठे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गोष्ट यशासाठी, प्रत्येक टप्प्यावर फक्त वरचा क्रमांक हवा. जेथे असू, तेथे प्रथम क्रमांक हवा; ही महत्त्वाकांक्षा चिंताजनक आहे. त्यातून अपयश पचवणे कठीण होते आहे.
 
विद्यार्थ्यांची समाजमाध्यमांवरील भटकंती वाढली आहे. आंतरजाल, विविध प्रकारचा ‘स्क्रीन टाईम’ अधिक झाला आहे. त्याचा परिणाम अधिकाधिक होत असल्याचे समोर आले आहे. संशोधनानुसार, ‘स्क्रीन टाईम’ जितका वाढत जाईल, तितक्या मोठ्या प्रमाणावर ताणतणावात भर पडत आहे. हा परिणाम केवळ विद्यार्थ्यांवर नाही, तर शिक्षक, पालकांवरदेखील होतो आहे. त्यामुळे त्यांच्याही ताणतणावाच्या समायोजनाचे आव्हान आहे. शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती- तंत्रज्ञानाची विविध साधने वापरली जात आहेत. त्याचा परिणाम सातत्याने समोर येतो आहे. जगातील अनेक देशांनी आता शालेय शिक्षणातील माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अलीकडे अनेक देशांनी बालवयात विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल पडू नये, त्यादृष्टीने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातून जे काही समोर येते आहे, त्याचा धोका पत्करणे आता नको झाले आहे. त्यामुळे उद्या होऊ पाहणार्‍या विपरीत परिणामाला आळा घालायचा असेल, तर आजच निर्बंध घालायला हवेत.
 
वर्तमानात शिक्षणामुळे पालक, शिक्षक आणि समाज यांच्याशी असणारा संवाद तुटत चालला आहे. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासावर काम करण्याची गरज आहे. शिक्षणातून समग्र विकासाची प्रक्रिया अपेक्षित आहे. शिक्षणाच्या व्याख्याही आता आदर्शवादी वाटू लागल्या आहेत. आपले शिक्षण समग्र विकासाच्या दिशेचा प्रवास करण्याऐवजी केवळ एकांगी स्वरूपाचा विचार करते आहे. पालकांना बौद्धिक विकास हवा आहे. त्यामुळे शिक्षणाचा समग्र विचार कोणीच करत नाही. बौद्धिक विकासाचा पाठलाग केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनातील मैदान हरवले आहे. आनंदाच्या वाटा लुप्त झाल्या आहेत. संवादही हरवला आहे. सध्या विद्यार्थी-पालकांच्या अपेक्षांचा आलेखही उंचावता आहेत. गुणांची स्पर्धा तीव्र बनते आहे. शिकण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि शिकवणीचे दडपण वाढत चालले आहे. शिक्षण म्हणजे चार भिंतीच्या आतली श्रवणभक्ती बनली आहे. केवळ ‘ऐकणे’ एवढाच विचार दृढ होत चालला आहे. शिक्षण संवादमुक्त होऊ लागले आहे. विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी नाही. त्यांना कोणताही आवाज उरलेला नाही. त्यांचे भावनिक दमन होते आहे. त्याचा परिणाम, विद्यार्थी जीवनाची सकारात्मकतेची वाट चालण्यापेक्षा मृत्यूला कवटाळताना दिसत आहेत. हे सारे चिंताजनक आहे.
 
शाळा-विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील वीणदेखील सैल होत चालली आहे. तेथील नाते ग्राहक-विक्रेत्यासारखे बनू लागले आहे. त्यातून विद्यार्थ्यांशी असलेली बांधिलकी हरवत चालली आहे. कधीकाळी शिक्षक हे विद्यार्थ्यांचे पालकच होते. पालकांपेक्षा अधिक काळजी शिक्षक घेत होते. त्यांच्या वेदना शिक्षक ऐकून घेत होते. त्यांच्याशी निखळ, मोकळा संवाद घडत होता. या नात्यात एक विश्वास होता. अलीकडे या नात्यातील गोडवा आणि बंध हरवत चालले आहेत. विद्यार्थी व्यक्ती आहे, हे लक्षात घेत नाहीत. ‘त्याला काय कळते?’ असे म्हणून त्याचे ऐकून न घेणे, त्याच्या भावनांना वाट मोकळी करू न देणे, विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाकडे दुर्लक्ष होणे, यातून चिंता करावी अशी परिस्थिती निर्माण होते आहे. मुळात शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहताना शिक्षणशास्त्र पदवीची गरज आहे का? असा प्रश्न केला गेला, तर शिक्षक म्हणून या पदवीची खरंच किती गरज आहे, यापेक्षा सर्वाधिक महत्त्वाची गरज म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांवरती प्रेम करता यायला हवे. हा एकच गुण असेल, तर विद्यार्थ्यांचे शिकणे आपोआप होण्यास सुरुवात होईल, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ गिजुभाई बधेका यांनी केले होते. दुर्दैवाने शिक्षणातील नाते, बंध हळूहळू सैल होत चालले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यांना समजावून घेण्यात शिक्षक, पालक कमी पडत आहेत. क्षमतांचा विचार न करता, अपेक्षांचे ओझे लादले जात आहे. त्यामुळे शिक्षणाच्या मूलभूत विचारांच्या पातळीवर प्रवास घडण्याची गरज आहे. त्याशिवाय, आत्महत्येच्या विचारापासून कोणी परावृत्तच होणार नाहीत. गरज आहे, शिक्षणाच्या पावित्र्याचा आणि बंधाचा विचार करण्याची. आता हीच वेळ आहे, शिक्षण योग्य दिशेने घेऊन जाण्याची!
 
- संदीप वाकचौरे