लक्ष दीप हे उजळले जगी...

    11-Dec-2025
Total Views |
 
Diwali
 
दिवाळीला ‘युनेस्को’च्या यादीत मिळालेले स्थान दीपोत्सवाला आंतरराष्ट्रीय ओळख, तसेच मान्यता प्रदान करणारेच. ‘तिमिरातून तेजाकडे’ संदेश देणारा हा सण आता जगभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. या सणाच्या लोकप्रियतेवर उमटलेली ही जागतिक मान्यतेची मोहोर म्हणजे भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचाच एक प्रकाशमान अध्याय!
 
भारताची समृद्ध परंपरा आणि संस्कृती ही जगाच्या सांस्कृतिक नकाशावर आज आणखीन ठळकपणे उमटली. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा, रीतिरिवाज, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे भारतीय सण हे जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना दिसतात. या परंपरांमध्ये दिवाळी हा सर्वात महत्त्वाचा, सर्वात प्रिय उत्सव. दिवाळी हा सण केवळ धार्मिक नाही; तर तो प्रकाशाचा, आशेचा, नव्या प्रारंभाचा आणि मानवी संबंधांतील चांगुलपणाचा उत्सव. ‘तिमिरातून तेजाकडे’ या भावनेने साजरा केला जाणारा, या दीपोत्सवाला आता ‘युनेस्को’ने ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ यादीत स्थान देऊन भारतीय संस्कृतीला जागतिक दर्जा दिला आहे. हा क्षण सन्मानाचा आहेच; त्याशिवाय तो भारताच्या सांस्कृतिक शक्तीच्या झपाट्याने वाढणार्‍या प्रभावाचाही आहे. दिवाळी हा दीपोत्सव आता अयोध्या, काशी, मुंबई आणि चेन्नईपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो लंडनच्या ‘पार्लमेंट स्क्वेअर’वर, न्यूयॉर्कच्या ‘टाईम्स स्क्वेअर’वर, दुबईच्या आकाशरेषेवर आणि अगदी अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’च्या प्रांगणातही तेजाने झळकत आहे. भारतीय सणांचा होत असलेला हा जागतिक विस्तार, सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याबरोबरच, भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चेही प्रतिनिधित्व करतो, हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
 
‘युनेस्को’च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळीचा झालेला समावेश हा भारतासाठी एक ऐतिहासिक टप्पा. या यादीत अशा परंपरा समाविष्ट होतात, ज्या जतन करण्यासारख्या, शतकानुशतके टिकून राहिलेल्या आणि समाजाला जोडणार्‍या असतात. दिवाळीचे दीपदान, पूजा, कुटुंबाचे एकत्रित क्षण साजरे करणे, समाजातील संवाद, अनुष्ठान आणि आनंद हे सर्व या वारशाचा अविभाज्य असाच भाग. भारताचे १५ सांस्कृतिक वारसे यापूर्वीच या यादीत आहेत. योग, गरबा, दुर्गापूजा, कुंभमेळा, वैदिक मंत्रोच्चार यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आता याच यादीत दिवाळीचा झालेला समावेश हा भारतीय सणांच्या सर्वसमावेशकतेचे आणि मानवतेच्या व्यापक भावना प्रतिबिंबित करणार्‍या परंपरांचे जागतिक प्रमाणपत्र ठरणार आहे. दिवाळीवर उमटलेल्या या जागतिक मान्यतेने भारताला सांस्कृतिक महासत्ता म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे.
 
दिवाळी हा सण भारतापुरता मर्यादित नाही. जिथे जिथे भारतीय आहेत, जिथे जिथे भारतीय संस्कृतीचे अनुयायी आहेत, तिथे तिथे दिवाळीचा सण प्रचंड उत्साहात साजरा केला जातो. जगात भारतीयांची संख्या आणि प्रभाव दोन्हीही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा सण जगभरात साजरा होत आहे. अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’मध्येही दिवाळी साजरी केली जाणे, हे आज भारताच्या जागतिक प्रभावाचे सर्वात मोठे उदाहरण ठरावे. त्याठिकाणी दिवे लावले जातात, भारतीय समुदायाला आमंत्रित केले जाते, नृत्य-संगीताचे कार्यक्रम होतात, राष्ट्राध्यक्ष स्वतः दीपज्योत प्रज्वलित करतात. दिवाळीनिमित्त खास फराळाचे आयोजन केले जाते. हा कार्यक्रम सांस्कृतिक आहेच; त्याशिवाय तो राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा असाच. कारण, उत्सव हे देशांच्या राजनैतिक संबंधांमध्ये आता समानतेचा, सहिष्णुतेचा आणि परस्पर आदराचा सेतू बनत आहेत. न्यूयॉर्कमध्ये दिवाळीला अधिकृत शालेय सुटी जाहीर केली गेली, हा प्रसंग जागतिक संस्कृतीत भारतीय परंपरेने घडवलेला एक मोठा टप्पा म्हणावा लागेल. न्यूजर्सी, कॅलिफोर्निया, टेसास, इलिनॉयस यांसह अनेक राज्यांमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी नगरपालिका आणि सरकारे अधिकृत कार्यक्रमही आयोजित करतात. ही सुटी भारतीय समुदायाच्या वाढत्या सामाजिक सामर्थ्याचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे.
 
दिवाळीचा आर्थिक प्रभाव हा भारतात तर प्रचंड असाच. किरकोळ बाजारात याच काळात वार्षिक व्यापाराचा मोठा हिस्सा आहे. हा फक्त भारतापुरता नाही, तर विदेशातील बाजारपेठांतही मोठ्या प्रमाणात तो वाढत आहे. भारतात दिवाळीच्या कालावधीत तब्बल सहा लाख कोटींची उलाढाल झाली; यावरून दिवाळी अर्थकारणाला किती चालना देते, हे समजून येते. यामुळे संपूर्ण वर्ष परिश्रम करणार्‍या लाखो छोटे-मोठे उद्योजक, कारागीर आणि कामगारांना दिवाळीचा हंगाम हा आर्थिक दिलासा देतो. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, कॅनडा, मलेशिया, आखाती देश येथे दिवाळीच्या भेटवस्तू, कपडे, सजावट, मिठाई यांची मोठी बाजारपेठ आहे. विदेशातील दिवाळी बाजारपेठ १०-१२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचत असल्याचा अंदाज आहे. हा पैसा कुठे जातो? तर भारतीय कंपन्या, दुकानदार, खाद्य-उद्योग, हस्तकला आणि भारतीय अल्पसंख्याक व्यवसायांपर्यंत. यातूनच अर्थव्यवस्थेला बळ मिळते.
 
आज जगभरात दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत आहेत. यात ‘हार्ड पॉवर’ आणि ‘सॉफ्ट पॉवर’ यांचा उल्लेख करावा लागेल. ‘हार्ड पॉवर’ म्हणजे आर्थिक शक्ती, सैन्य आणि तंत्रज्ञान; तर ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणजे संस्कृती, परंपरा, जीवनमूल्ये, कला, संगीत, भाषा, सण व सामाजिक मूल्ये. आता यानिमित्ताने दिवाळी ही भारताची सर्वात प्रभावी ‘सॉफ्ट पॉवर’ ठरली आहे. कारण, हा सण केवळ एका धर्माशी मर्यादित नाही, तर तो सर्वमान्य मानवी मूल्ये शिकवतो. तो आनंद, एकता, चांगुलपणा, पर्यायाने मानवी आशा या सार्वत्रिक भावना व्यक्त करतो. जगभरातील नागरिक दिवाळीचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात, तिच्या परंपरा स्वीकारतात. भारतीय समाज जगभरात सकारात्मक, सुसंस्कृत, शांतताप्रिय आणि आध्यात्मिक म्हणून ओळखला जात आहे.
 
२०१४ पासून भारताने आपली सांस्कृतिक उपस्थिती जगभरात मोठ्या प्रमाणात वाढवली. योग दिवसाला संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळवणे, महाकुंभाचे जागतिक पातळीवर प्रदर्शन घडवणे, भारतीय समुदायाशी साधलेला संपर्क या सर्वांचा भारताच्या सांस्कृतिक, राजनैतिक सामर्थ्यावर प्रचंड परिणाम झाला. या काळात सात भारतीय परंपरांना ‘युनेस्को’च्या यादीत स्थान मिळाले. गरबा, दुर्गापूजा, नवरोज, योग यांसह अनेक सांस्कृतिक वारशांचा जागतिक स्वीकार वाढला. दिवाळीचा या यादीतील प्रवेश हा या प्रयत्नांचाच नैसर्गिक निष्कर्षच म्हणावा लागेल. दिवाळीचे जागतिकीकरण हा भारताचा अभिमान आहे. मात्र, सांस्कृतिक वारसा टिकवणे ही जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. दिवाळी ही आता फक्त दिवे आणि सजावटीची राहिलेली नाही, तर ती भारताच्या वाढत्या प्रभावाची, जपलेल्या परंपरांची आणि जगाला दिलेल्या संदेशाची ओळख बनली आहे. भारतीय म्हणून हा सर्वस्वी अभिमानाचाच क्षण...