कल्याण : ( BJP Panel 7 Hosts Grand Orchestra in Kalyan ) भारतीय जनता पक्ष पॅनल क्रमांक 7 च्या वतीने नागरिकांसाठी कल्याण येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात दोन दिवसीय मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गाण्यांचा भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, हेमलता पवार, शामल गायकर आणि भारती गायकर यांच्या माध्यमातून या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. एकाच दिवशी एका वेळेत सर्व नागरिकांना बसण्याची सोय उपलब्ध नसल्याने आयोजकांनी दोन दिवसांच्या 4 सत्रांमध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. आणि या दोन्ही सत्रांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 21 फडके मैदान, 22 बेतुरकर पाडा, 28 काळा तलाव, 29 ठाणकर पाडा आणि प्रभाग क्रमांक 32 सिद्धेश्वर आळी येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या जुन्या-नव्या हिंदी, मराठी चित्रपट गीतांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विविध दशकांतील सुरेल गाणी, सुमधुर लाईव्ह संगीत आणि कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. यावेळी माजी भाजप आमदार नरेंद्र पवार, मंगेश गायकर,डॉ. दीपक तेलवणे, माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, हेमलता पवार, शामल गायकर, प्रिया शर्मा, भारती गायकर, अनिल पंडीत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण डोंबिवलीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. तर सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर यांनीही येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांनी योग्य आणि शहरासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रमात भाजपचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर, हेमलता पवार, शामल गायकर आणि भारती गायकर यांच्या सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या चित्रफिती उपस्थितांना दाखवण्यात आल्या. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा आयोजकांकडून शाल आणि तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान येत्या काळामध्ये भाजपतर्फे अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांसह पॅनल क्रमांक 7 मध्ये विशेष स्वच्छता अभियान, मोफत चष्मे वाटप आदी सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.