‘वन्दे मातरम्’च्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त संसदेत परवा वादळी चर्चा रंगली. यादरम्यान, ‘वन्दे मातरम्’चे प्रणेते बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बंकिमदा’ असा केला. बंगालीमध्ये ‘दा’ हा शब्द ‘भाऊ’ या अर्थाने आदरार्थी वापरला जातो. त्यावर लगेचच तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय यांनी आक्षेप नोंदवला आणि त्याऐवजी ‘बंकिमबाबू’ असा मोदींनी उल्लेख करावा, असे निदर्शनास आणून दिले. पंतप्रधानांनीही अगदी मनमोकळेपणाने ती सूचना मान्य करीत म्हटले की, "मी ‘बंकिमबाबू’ असेच म्हणीन. तुमच्या भावनांचा मी आदर करतो, धन्यवाद!” हा विषय खरंतर इथेच संपणे अपेक्षित होते. पण, नाही ; यावरून ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांना बंगाली संस्कृतीची समज नाही, आदर नाही म्हणून भाजपवरच तुटून पडले. बंगाली जनतेच्या मनात भाजपची निर्माण झालेली सकारात्मक प्रतिमा मलिन कशी होईल, यासाठी तृणमूल काँग्रेसने आगामी निवडणुका लक्षात घेता, केलेला हा आणखीन एक थुकरट प्रयत्न...
ज्यावेळी विरोधकांकडे आक्षेप घेण्यासारखा कोणताही मुद्दा नसतो, त्यावेळी मग अशाप्रकारे अस्मितांच्या मुद्द्यांवरुन मानापमान नाट्याचे डाव खेळले जातात. काहीही असंबद्ध बडबडणार्या ममतादीदींचा तर याबाबतीत हातखंडाच. मागेही ‘शांतिनिकेतन’ला गृहमंत्री अमित शाह यांनी भेट दिल्यानंतर, शाह हे रवींद्रनाथांच्या खुर्चीवर बसल्याचा आरोप काँग्रेसच्या अधिरंजन चौधरींनी केला आणि ममतांनीही टीकेची संधी साधली होती. त्यावर शाह यांनी "मी त्या खुर्चीवर कधीही बसलो नाही. उलट, नेहरू आणि राजीव गांधीच यापूर्वी बसले होते,” असे सांगत चौधरींच्या दाव्यातील हवाच शाह यांनी काढून घेतली. खरंतर भाजपनेच बंगाली संस्कृती, तेथील क्रांतिकारी, महापुरुष यांचा विचारवारसा पुनरुज्जीवित केला आहे. मग, सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडित १०० गुप्त फाईल्स सार्वजनिक करण्याचा निर्णय असेल अथवा रवींद्रनाथ टागोरांच्या ‘शांतिनिकेतन’ला २०२३ साली मिळालेला ‘युनेस्को’च्या वारसा स्थळाचा दर्जा असेल, हे मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले. एवढेच काय, तर भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हेदेखील बंगालीच होते. त्यामुळे भाजप आणि बंगालची नाळ ही आतापासूनची नव्हे, तर फार पूर्वीपासूनच जोडलेली, याचा बंगालच्या ठेकेदार म्हणून मिरवणार्यांच्या दीदींनाच विसर पडलेला दिसतो.
बंकिमबाबूंच्या वारशाचे काय?
‘वन्दे मातरम्’ची १५० वर्षे हा साहजिकच राष्ट्रगौरवाचा विषय.त्याला एका विशिष्ट राज्यापुरते मर्यादित ठेवणे तसे योग्यही नाही. परंतु, बंकिमचंद्र चटोपाध्याय हे बंगाली असल्यामुळे साहजिकच बंगालमध्ये त्याचा व्यापक उत्साह दिसून येणे, हे स्वाभाविकच. त्यादृष्टीने तृणमूल सरकारने बंकिमचंद्रांच्या जन्मगावी आणि त्यांनी जिथे ‘वन्दे मातरम्’ची रचना केली, त्या हुगळीतील चिनसुरा या ठिकाणी कार्यक्रमही आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. ममता सरकारने याबाबतीत घेतलेल्या पुढाकाराचे स्वागतच. पण, बंकिमचंद्र कोलकात्यातील ज्या घरात वास्तव्यास होते, त्याच्या दुर्दशेकडे राजधानीत असूनही ममतांच्या सरकारचे दुर्लक्षच झाल्याची गंभीर बाब यानिमित्ताने उजेडात आली आहे.
कोलकात्यातील ‘५, प्रताप चॅटर्जी मार्गा’वरील बंकिमचंद्रांच्या घराला २००६ साली तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी ग्रंथालयात रूपांतरित केले. घराची डागडुजी करून हे ग्रंथालय तिथे नियमितपणे सुरूदेखील होते. पण, ममता सरकार सत्तेत आल्यापासून या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंकिमचंद्रांच्या पाचव्या पिढीतील वारसदार सजल चटोपाध्याय यांनी केला आहे. रविवारच्या दिवशीही ग्रंथालय बंद असते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरा तसाच विखुरलेला. सरकारकडून या वास्तूची स्वच्छताही केली जात नाही. आसपासचे रहिवाशीच वेळ मिळेल तशी ही वास्तू आणि लगतचा परिसर स्वच्छ करतात. काही दिवसांपूर्वीच बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी इथे कार्यक्रम आयोजित केला होता. पण, त्यांना ग्रंथालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे तृणमूल सरकारकडून आपले अपयश झाकण्याचाच हा केविलवाणा प्रयत्न म्हणावा लागेल. एकूणच काय; तर ममतादीदींना बंकिमचंद्रांच्या वारशाची सर्वस्वी चिंता असती, तर त्यांनी या वास्तूची अशी दुरवस्था होऊच दिली नसती. पण, सुवेंदू अधिकारी यांच्या दौर्यामुळे यासंदर्भातले वास्तव जनतेसमोरही आले. म्हणजे प. बंगालच्या राजधानीमध्येच बंकिमचंद्रांचा वारसा हा असा धुळखात पडलेला. पण, ममता सरकारला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. एकूणच बंगालची जनताही ममतांच्या कारभाराला विटलेली आहे. त्यामुळे ‘बिहार तो केवल झांकी हैं, पश्चिम बंगाल अभी बाकी है’ हे दीदींनी ध्यानात घ्यावे!